आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
योग्य माहितीनिशी गोवर विरोधात लढा: आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय ,युनिसेफद्वारा माध्यमांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
देशाच्या आरोग्य विषयक उपक्रमांमध्ये माध्यमे नेहमीच प्रबळ भागीदार राहिली आहेत: अतिरिक्त आयुक्त (लसीकरण), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पत्र सूचना कार्यालयाचे संकेतस्थळ तसेच त्याच्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, विशेषत: पीआयबी फॅक्ट -चेक ला भेट देऊन माध्यमे विश्वासार्ह माहिती मिळवू शकतात : अतिरिक्त महासंचालक, पश्चिम विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सामाजिक स्तरावर एकत्र येऊन लसीकरण वाढवण्यासाठी तसेच लसीकरणाबाबत बाबत संकोच दूर करण्यासाठी तातडीने नियोजन करण्याची गरज: आरोग्य तज्ञ, युनिसेफ इंडिया
Posted On:
16 DEC 2022 6:27PM by PIB Mumbai
मुंबई, 16 डिसेंबर 2022
बिहार, गुजरात, हरियाणा, झारखंड, आणि महाराष्ट्रमधील काही जिल्ह्यांमध्ये अलिकडे गोवर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्त राष्ट्र बाल निधी (युनिसेफ ) च्या भागीदारीने आज 'गोवर, रुबेला आणि नियमित लसीकरणाबाबत 'माध्यमांसाठी कार्यशाळा' आयोजित केली होती.

या सर्व भौगोलिक प्रदेशांमध्ये, प्रभावित मुलांचे कोविड-19 महामारी दरम्यान विविध कारणांमुळे नियमित लसीकरण होऊ शकले नव्हते. लसीकरणात झालेली घट, गोवरवरील देखरेख व्यवस्थेतील दिरंगाई आणि कोविड-19 मुळे लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय आणि विलंब यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात गोवरचे रुग्ण वाढले आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अतिरिक्त आयुक्त (लसीकरण) डॉ वीणा धवन यांनी उपस्थितांना गोवर या जीवघेण्या आजाराची लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार याविषयी माहिती दिली. गोवरबद्दलचा लसीकरण संकोच तसेच त्याबाबतची चुकीची माहिती आणि सांस्कृतिक गैरसमज खोडून काढण्यासाठी समुदाय आणि त्या-त्या भागातील प्रभावशाली व्यक्तींना या कामात सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले.
गोवर हा सर्वाधिक संसर्गजन्य विषाणूंपैकी एक आहे. परंतु लसीकरणाद्वारे त्याला जवळजवळ पूर्णपणे प्रतिबंध घालता येऊ शकतो. नियमित लसीकरणामध्ये मागे पडू नये यासाठी राज्यांनी ‘कॅच-अप’ मोहिमा सुरू केल्या आहेत. देशाच्या आरोग्य उपक्रमांमध्ये प्रसार माध्यमांनी नेहमीच एक चांगला भागीदार म्हणून काम केले आहे, ” असे डॉ धवन म्हणाल्या.
“गोवर निर्मूलनासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. समुदाय, समाजाला जागुरूक, शिक्षित करण्यासाठी आणि मुलांना गोवर प्रतिबंधक तसेच इतर आजारांपासून दूर ठेवणा-या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,” असे त्या पुढे म्हणाल्या.

पीआयबी म्हणजेच पत्र सूचना कार्यालयाच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त महासंचालक,स्मिता वत्स शर्मा, यांनी सांगितले की, प्रसारमाध्यमे पत्र सूचना कार्यालयाचे संकेतस्थळ आणि कार्यालयाच्या विविध समाजमाध्यमांच्या मंचाचा उपयोग, विशेषत: ‘पीआयबी फॅक्ट-चेक’, तथ्यपूर्ण, सत्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि चुकीच्या माहितीला अटकाव घालण्यासाठी करू शकतात.

युनिसेफ इंडियाचे आरोग्य विशेषज्ञ, डॉ आशिष चौहान, म्हणाले, “गोवर हा लसीकरण प्रणालीच्या सामर्थ्याचा ‘ट्रेसर’आहे. जेव्हा लसीकरणाचे प्रमाण कमी असते, तेव्हा गोवर लसीकरण कार्यक्रम वेगाने राबविली तर गोवर टाळता येण्याजोगा रोग आहे.”

डॉ चौहान म्हणाले की, "सामाजिक प्रोत्साहनातूनच लसीकरणाचा प्रसार वाढविण्याच्या दिशेने पावले टाकली पाहीजेत आणि तसेच लस घेण्याबाबत शंका असेल ती घेण्यात संकोच वाटत असेल, तर तो दूर करण्यासाठी तातडीने योजना करण्याची गरज आहे."
कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना, युनिसेफ इंडियाच्या ‘कम्युनिकेशन स्पेशालिस्ट’, अलका गुप्ता म्हणाल्या, “माध्यमांतील व्यावसायिक म्हणून, तुमच्याकडे लसीकरणावरील वस्तुस्थितीवर आधारित संदेशांद्वारे लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची ताकद आहे. त्यामुळे लोकांचा लसीकरणाकडे पाहण्याचा दृष्टीकोण तयार होत असतो आणि यामुळे त्यांच्या वर्तणुकीमध्ये परिवर्तन होते. लसीकरण म्हणजे मुलांसाठी जीवनरक्षक आहे आणि त्याचा मुलांच्या एकूण आरोग्यावर आणि विकासावर परिणाम होतो. आरोग्य आणि विकास करणार्या लसीकरणावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. माध्यमांनी दिलेल्या, समुदायांच्या सकारात्मक कथा इतरांना त्यांच्या मुलांना लसीकरण करण्यास प्रवृत्त करू शकतात."
काही राज्यांमध्ये वाढत्या गोवर रुग्ण संख्येच्या संदर्भात, अतिसंवेदनशील भागात 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील सर्व मुलांना गोवर प्रतिबंधक आणि रुबेलायुक्त लसीची (एमआरसीव्ही ) एक अतिरिक्त मात्रा देण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिला आहे . ही मात्रा निर्धारित 9-12 महिन्यांतील पहिल्या मात्रेच्या आणि 16-24 महिन्यातील दुसऱ्या मात्रेच्या प्राथमिक लसीकरणाच्या व्यतिरिक्त असेल.
ज्या भागात 9 महिन्यांपेक्षा कमी वयोगटातील गोवर रुग्ण एकूण गोवर रुग्णांपैकी 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत अशा भागात 6 महिने आणि 9 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या सर्व मुलांना एमआरसीव्ही लसीची एक मात्रा देण्याचा सल्लाही आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिला आहे
या कार्यशाळेत पत्र सूचना कार्यालयाच्या (महाराष्ट्र आणि गोवा),अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा, गो न्यूजचे माध्यम संपादक पंकज पचौरी, अमर उजालाचे (डेहराडून) माजी कार्यकारी संपादक संजय अभिज्ञान आणि यूएनएनचे संपादक एम.एच. गझाली यांसारखे प्रसिद्ध माध्यमकर्मी एकत्र आले होते.
जागतिक आरोग्य संघटनेचे देखरेख वैद्यकीय अधिकारी डॉ परेश कंथारिया आणि डॉ मीता, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विस्तारित लसीकरण कार्यक्रम संबंधित आरोग्य अधिकारी (एएचओ) डॉ अरुणकुमार मारुती गायकवाड, मध्य प्रदेश सरकारमधील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे लसीकरण संचालक डॉ. एस शुक्ला यांनी सहभागींना संबोधित केले आणि त्यांच्या प्रश्नांना देखील उत्तरे दिली.
S.Kakade/Sushama/Sonal C/Suvarna/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1884242)
Visitor Counter : 167