कृषी मंत्रालय
मानवाच्या कल्याणासाठी भूमातेची जोपासना करण्याची गरज : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
गोवा येथील आयसीएआर संस्थेत “जागतिक मृदा दिन” साजरा
Posted On:
05 DEC 2022 5:40PM by PIB Mumbai
गोवा, 5 डिसेंबर 2022
गोव्यातील आयसीएआर म्हणजेच भारतीय कृषी संशोधन परिषद - मध्यवर्ती किनारी कृषी संशोधन संस्थेत आज ‘जागतिक मृदा दिन’ साजरा करण्यात आला. ‘मृदा: जेथून अन्नधान्य निर्मिती सुरु होते’ ही यावर्षीच्या जागतिक मृदा दिनाची संकल्पना आहे. केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात, उपस्थितांना संबोधित करताना श्रीपाद नाईक यांनी वैज्ञानिकांना सेंद्रिय शेतीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचा कस बिघडू नये यावर अधिक भर देण्याच्या सूचना त्यांनी कृषी शास्त्रज्ञांना केल्या. “माती ही आपली माता आहे, ती आपले पालनपोषण करते. म्हणून शेती करताना कमीत कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करण्यातून मातीचा समतोल बिघडू न देण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. ‘कृषी हवामान विभागा’नुसार पिक पद्धतीचा अवलंब करणे तसेच आंतरपीक पद्धतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या सर्व उपाययोजना परिणामकारक पद्धतीने राबवल्या पाहिजेत,” नाईक म्हणाले.
केंद्रीय कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव तसेच आयसीएआरचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक या कार्यक्रमाला माननीय अतिथी म्हणून आभासी पद्धतीने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी मृदा आरोग्य कार्ड योजनेवर तसेच खतांच्या वापराचा प्रभाव वाढविण्यासाठी कडूनिंब लेपित युरियाच्या वापरावर अधिक भर दिला.मृदा संरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवी दिल्ली येथील आयसीएआर संस्थेचे उपमहासंचालक (नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभाग) डॉ.सुरेशकुमार चौधरी देखील माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी अन्नधान्य उत्पादन प्रक्रियेत मातीच्या भूमिकेचे महत्त्व थोडक्यात विषद केले. मातीचा खालावत चाललेला कस आणि मृदा आरोग्यात सुधारणा याबाबतचे मुद्दे त्यांनी ठळकपणे मांडले. मृदा दिवस कार्यक्रमाअंतर्गत संशोधनामध्ये प्रत्यक्ष सहभागी नसलेले शालेय विद्यार्थी आणि इतर भागधारक यांच्यामध्ये मृदा आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर देखील त्यांनी भर दिला.
आयसीएआर-सीसीएआरआयचे संचालक डॉ.प्रवीणकुमार यांनी त्यांच्या स्वागतपर भाषणात जागतिक मृदा दिन साजरा करण्यामागचा इतिहास कथन केला. मातीच्या महत्त्वावर अधिक भर देत त्यांनी सर्वांसाठी सकस अन्न निर्माण व्हावे याकरिता मातीची सुपीकता उत्तम राखण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमात शंभरहून अधिक शेतकरी प्रत्यक्ष सहभागी झाले होते तर आयसीएआर संस्थेतील तंत्रज्ञानाचे जाणकार, शास्त्रज्ञ अशा देशभरातील सहा हजाराहून अधिक तज्ञांनी आभासी पद्धतीने या कार्यक्रमात भाग घेतला. या प्रसंगी 100 शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्डांचे वाटप देखील करण्यात आले.
पार्श्वभूमी:
कसदार मातीच्या महत्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच मातीच्या साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन करण्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 डिसेंबर या दिवशी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात येतो. वर्ष 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान महासंघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर मातीच्या महत्त्वाचा उत्सव साजरा करण्याची शिफारस केली. थायलंड देशातील राजसत्तेच्या नेतृत्वाखाली आणि जागतिक मृदा भागीदारीच्या चौकटीत, अन्न आणि कृषी संघटनेने जागतिक जागरूकता वाढविण्यासाठीचा मंच म्हणून जागतिक मृदा दिनाच्या औपचारिक सुरुवातीला पाठींबा दिला. जून 2013 मध्ये अन्न आणि कृषी संघटनेच्या परिषदेत जागतिक मृदा दिन साजरा करण्यास एकमताने मंजुरी देण्यात आली आणि संयुक्त राष्ट्रांच्या 68 व्या महासभेत त्याच्या अधिकृत स्वीकाराची विनंती करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने या विनंतीला प्रतिसाद देत डिसेंबर 2013 मध्ये पहिला अधिकृत जागतिक मृदा दिन म्हणून 5 डिसेंबर 2014 हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
* * *
PIB Panaji | N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880988)
Visitor Counter : 191