सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी देण्यात आलेल्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील दिव्यांग बंधू आणि भगिनींनी उमटवला ठसा
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य, अकोला जिल्हा आणि औरंगाबादच्या स्वयंसेवी संस्थेचा सन्मान
Posted On:
04 DEC 2022 6:57PM by PIB Mumbai
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे शनिवारी( 3 डिसेंबर 2022) रोजी 2021 आणि 2022 या वर्षासाठी दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. भारतीय संस्कृती आणि परंपरेत ज्ञानप्राप्ती आणि प्रावीण्य मिळवण्यामध्ये अपंगत्वाचा कधीही अडथळा मानला गेला नाही, असे राष्ट्रपतींनी सांगितले. दिव्यांगजनाना अनेकदा विशेष गुणवत्तेचे वरदान लाभल्याचे दिसून येते असे राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्रपतींकडून शनिवारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महाराष्ट्रातील पाच दिव्यांग नागरिकांनीही हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले आहे.
अशोक तुकाराम भोईर
जन्मापासूनच 75% लोकोमोटर अक्षमता असूनही 54 वर्षांचे ठाण्याचे रहिवासी असलेले अशोक तुकाराम भोईर एक क्रीडापटू आहेत. त्यांनी गोळाफेक, भालाफेक या क्रीडाप्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवले आहे आणि 2018 ते 2021 दरम्यान चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. स्वतःच्या पसंतीने निवडलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि सजावट सेवा या क्षेत्रातही त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले असून समाजातील दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
सामाजिक कार्यात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन या श्रेणीत 2021 या वर्षासाठी वैयक्तिक सर्वोत्कृष्टतेसाठी अशोक तुकाराम भोईर यांना सन्मानित करण्यात आले आहे.
विमल पोपट गव्हाणे
42% लोकोमोटर अपंगत्वाला देखील एका महिलेला इतरांच्या आरोग्यविषयक गरजांकडे लक्ष पुरवण्यापासून अडवता आले नाही. 56 वर्षांच्या या महिला पुणे जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महिला आरोग्य कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य विभागात 36 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी लसीकरणामध्ये, पल्स पोलियो मात्रांच्या वितरणात आणि पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात कोविड-19 च्या कालखंडात राबवलेल्या इतर आरोग्यविषयक कार्यक्रमांमध्ये त्यांनी अतिशय उत्तम काम केले आहे.
विमल पोपट गव्हाणे यांना श्रेष्ठ दिव्यांगजन या श्रेणीत 2021 या वर्षासाठी वैयक्तिक प्रावीण्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. शुभम रामनारायण धूत
जन्मापासून 55% हेमोफिलिया(रक्तामधील दोष) या आजाराने ग्रस्त असलेल्या एक आयुर्वेदिक डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्याला वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक सेवा करण्यापासून हा आजार परावृत्त करू शकला नाही. पुण्याच्या या 46 वर्षांच्या डॉक्टरांनी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. रक्तामधील दोष दूर करण्यासाठी त्यांनी रक्तामृत नावाचे जगातील पहिले आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. हेमोफिलिया, ल्युकेमिया, अज्ञात कारणांमुळे हिमोग्लोबिनची कमतरता आणि रक्तपित्त या आजारांवरील उपचारांमध्ये हे औषध उपयुक्त आहे.
आयुर्वेदिक औषधांवरील संशोधनासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. शुभम एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि वयाच्या केवळ 19व्या वर्षी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात निःस्वार्थ सामाजिक सेवा करण्यासाठी तरुण डॉक्टरांच्या संघटनेची स्थापना केली.
डॉ. शुभम रामनारायण धूत यांच्या असामान्य कार्याची दखल घेत श्रेष्ठ दिव्यांगजन या श्रेणीत 2021 या वर्षासाठी वैयक्तिक प्रावीण्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
जयसिंग कृष्णराव चव्हाण
नागपूरचे रहिवासी असलेल्या 43 वर्षांच्या जयसिंग चव्हाण यांना आपले एमबीए(फायनान्स) पूर्ण करण्यात आणि इतर दिव्यांगांचे सक्षमीकरण करण्यात 87% लोकोमोटर अपंगत्वाचा कोणताही अडथळा आला नाही. रंजना उद्योग समूह या नावाने त्यांनी साबण आणि डिटर्जंट उत्पादनाचा उद्योग सुरू केला. 2007 मध्ये त्यांना सर्वोत्तम स्वयंरोजगारप्राप्त दिव्यांग म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी 2016 मध्ये महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2018 मध्ये त्यांना मॅग्नेटिक महाराष्ट्र पुरस्कार( स्टार्ट अप्ससाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार) देखील प्राप्त झाला होता. दिव्यांगजनांच्या स्वयंरोजगारांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात देखील त्यांचा सहभाग असतो.
सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन या श्रेणीत 2022 या वर्षासाठी वैयक्तिक प्रावीण्यासाठी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल जयसिंग कृष्णराव चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दिव्यांगांच्या सक्षमीकरणामध्ये आणि दिव्यांगांना दैनंदिन वापराच्या सुविधा सहजतेने उपलब्ध करून देणारा ऍक्सेसिबल इंडिया कार्यक्रम राबवण्यामधल्या महाराष्ट्राच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेतली गेली. महाराष्ट्राच्या चार प्रमुख शहरांमध्ये एकूण 180 सरकारी इमारतींमध्ये दिव्यांगांच्या वापराच्या सुविधांचे लेखापरीक्षण राज्याने केले आहे. या 180 इमारतींपैकी 142 इमारतींना दिव्यांगाना सुलभतेने वापरण्यायोग्य करण्याचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. 137 इमारतींमध्ये दिव्यांगांना अनुकूल साधनसामग्री बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. 21.67 कोटी रुपये निधीपैकी 19.30 कोटी रुपयांचा वापर केल्याचे प्रमाणपत्र केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले आहे.
औरंगाबादची महात्मा गांधी सेवा संघ ही स्वयंसेवी संस्था देखील दिव्यांग व्यक्तींचे पुनर्वसन करत असल्याबद्दल दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना दिल्या जाणाऱ्या 2022च्या राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
अकोला जिल्ह्याची जिल्हा परिषद देखील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याबद्दल 2021 च्या राष्ट्रीय पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1880823)
Visitor Counter : 241