युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत मुलांच्या गटात गुजरात - छत्तीसगढ संयुक्त संघाने तर मुलींच्या गटात महाराष्ट्र - ओडिशा संयुक्त संघाने विजेतेपद पटकावले
Posted On:
30 NOV 2022 12:48PM by PIB Mumbai
पुणे , दि. 30 नोव्हेंबर
केंद्र सरकारच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाअंतर्गत क्रीडा विभागाने पुण्यात आयोजित केलेल्या एक भारत श्रेष्ठ भारत राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत मुलांच्या गटात गुजरात - छत्तीसगढ संयुक्त संघाने तर मुलींच्या गटात महाराष्ट्र - ओडिशा संयुक्त संघाने विजेतेपद पटकावले .
पुण्यातील बाणेर इथल्या जिल्हा रोल बॉल संघटनेच्या मैदानावर दिनांक 27 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दोन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा पार पडली . मुलांच्या अंतिम फेरीतील सामन्यात गुजरात छत्तीसगढ संयुक्त संघाने मध्य प्रदेश मणिपूर नागालँड संयुक्त संघाचा 7-4 असा पराभव केला तर मुलींच्या गटात महाराष्ट्र ओडिशा संयुक्त संघाने मध्य प्रदेश मणिपूर नागालँड संयुक्त संघाला 5-3 अशा गुणांनी पराभूत केले .

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राणी लक्ष्मीबाई मुलींच्या लष्करी शाळेचे प्रमुख विंग कमांडर एम . यज्ञरामन (निवृत्त) आणि आंतरराष्ट्रीय रोल बॉल संघटनेचे सचिव राजू दाभाडे यांच्या हस्ते पार पडला . यावेळी महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २००१६ साली मांडली.या अंतर्गत विविध खेळांच्या राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जातात व त्यात २/३ राज्यातील खेळाडूंची एक टीम तयार केली जाते आणि अश्याच पद्धतीने तयार केलेल्या दुसऱ्या टीम सोबत खेळ रंगतो असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.याद्वारे विविध राज्यातील खेळाडुंमध्ये परस्पर स्नेह वृद्धिंगत होतो व देशभरातील सर्व खेळाडू एकमेकांशी जोडले जातात. तीन दिवस रंगलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून कोण जिंकले यापेक्षा खेळ भावना जिंकली आणि एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मूर्त स्वरूपात आल्याचे समाधान वाटते असेही खर्डेकर म्हणाले. याच उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .भारतीय रोलबॉल संघटनेच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र रोल बॉल संघटना व पुणे जिल्हा रोल बॉल संघटनेच्या वतीने पुण्यातील जिल्हा रोल बॉल मैदानावर गेल्या 3 दिवसांत या स्पर्धा पार पडल्या .एकंदर दोन टप्प्यात मुले आणि मुली अशा दोन विभागात स्पर्धा घेण्यात आली . देशभरातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड , उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश , अरुणाचल प्रदेश , मणिपूर , नागालँड , मेघालय , गुजराथ , छत्तीसगढ , ओरिसा , कर्नाटक , केरळ आणि यजमान महाराष्ट्राचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते . स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 27 नोव्हेंबर रोजी झाले होते . राष्ट्रीय स्तरावरील या रोल बॉल स्पर्धेला पुणे परिसरातील क्रीडाप्रेमी प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

***
MaheshI/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1879925)
Visitor Counter : 198