वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांना पर्यावरणीय , सामाजिक आणि कॉर्पोरेट प्रशासन (ईएसजी ) या बाबींसाठी आपला स्वतंत्र दृष्टिकोन आवश्यक : सेबीच्या अध्यक्ष


'उद्योग परिवर्तनासाठी ईएसजी परिषद - आत्मनिर्भर भारतासाठी ईएसजी' या परिषदेचे मुंबईत आयोजन

Posted On: 29 NOV 2022 7:55PM by PIB Mumbai

मुंबई, 29 नोव्हेंबर 2022

भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांना पर्यावरणीय, सामाजिक आणि कॉर्पोरेट प्रशासन  (ईएसजी) या बाबींवर त्यांचा स्वतंत्र दृष्टिकोन असणे आवश्यक आहे, असे मत सेबी अर्थात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या  अध्यक्ष माधबी पुरी बुच यांनी आज व्यक्त केले.  पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या राष्ट्रीय उत्पादकता परिषद यांच्यावतीने मुंबईत आयोजित  आत्मनिर्भर भारतासाठी  पर्यावरणीय, सामाजिक, प्रशासन या विषयावरील  राष्ट्रीय परिषदेत  सेबीच्या  अध्यक्ष बोलत होत्या.

ईएसजी मानांकन  हा भविष्यात पत  मानांकनासारखा  बाजारातील महत्त्वाचा पैलू असेल. हे ईएसजी मानांकन भविष्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे त्यामुळे  ईएसजी मानांकन व्यवस्था  चांगल्या नियमन केलेल्या पद्धतीने विकसित व्हायला हवी,हे एक नियामक म्हणून सेबीसाठी  अत्यावश्यक आहे'', असे सेबीच्या अध्यक्षांनी सांगितले.

सर्व संबंधित कंपन्यांनी  पर्यावरणीय -सामाजिक-प्रशासन (ईएसजी) या  दृष्टिकोनातून भविष्यासाठी सज्ज असायला हवे, असे मुंबई  बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा यांनी परिषदेत बोलताना सांगितले. बंदरातून   कार्बन उत्सर्जन अतिशय कमी  रहावे यासाठी मुंबई  बंदराने  विविध पावले उचलली आहेत.बंदर आपल्या दैनंदिन कामकाजात नवीकरणीय  ऊर्जेच्या वापराला  प्रोत्साहन देत आहे असे त्यांनी सांगितले.

"राष्ट्रीय उत्पादकता परिषद नव्वदच्या दशकाच्या मध्यापासून पर्यावरण, ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे", असे राष्ट्रीय उत्पादकता परिषदेबद्दल बोलताना या  परिषदेच्या महासंचालकांनी सांगितले.

स्पर्धात्मकता, शाश्वतता लवचिकता यासाठी व्यवसाय धोरणांमध्ये ईएसजीचा अवलंब करण्यासंदर्भात ईएसजीवरील या राष्ट्रीय परिषदेत चर्चा करण्यात आली.उद्योगाच्या विविध क्षेत्रातील 25 उद्योजकांनी  ईएसजी परिषदेत आपले विचार मांडले. विविध संस्थांमधील ईएसजीशी निगडीत  सुमारे 125 वरिष्ठ पातळीवरील अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. सेबीच्या व्यवसाय उत्तरदायित्व  आणि शाश्वतता अहवाल (बीआरएसआर ) आराखड्याअंतर्गत अहवाल देणे  आणि अनुपालनाविषयी या परिषदेत चर्चा करण्यात आली.

कॉर्पोरेट क्षेत्र आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसई ) यांना ईएसजी चौकटीमध्ये  व्यापक  उद्दिष्टे साध्य करणे  आणि उद्योगांच्या माध्यमातून ईएसजी उपायांचा व्यापक अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे हा 'उद्योग परिवर्तनासाठी ईएसजी परिषद - आत्मनिर्भर भारतासाठी ईएसजीया परिषदेचा उद्देश होता.

ईएसजी परिषदेची पार्श्वभूमी

सतत बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणासह, गुंतवणूकदार आणि हितसंबंधीत केवळ व्यवसायासाठीच नव्हे तर   शाश्वत पर्यावरण आणि समाजासाठी उत्तरदायी असायला हवे . अलिकडच्या वर्षांत, शाश्वत विकासासाठी  हवामान बदलाच्या प्रभावाशी जुळवून घेणे आणि हे परिणाम कमी करणे तसेच संक्रमण या जागतिक स्तरावर प्रमुख समस्या म्हणून उदयाला आल्या आहेत. लोकसांख्यिकीय  बदल, पुराचा धोका आणि समुद्राची वाढती पातळी, गोपनीयता आणि डेटा सुरक्षा आणि नियामक दबाव यासारखी जागतिक शाश्वतता आव्हाने गुंतवणुकदारांसाठी नवीन जोखीमा निर्माण करत आहेत ज्या  कदाचित यापूर्वी त्यांनी पाहिल्याही नसतील. जागतिक स्तरावर कंपन्यांना वाढत्या जटिलतेचा सामना करावा लागत असल्याने,गुंतवणूकदार पारंपरिक गुंतवणूक पद्धतींचे पुनर्मूल्यांकन करू शकतात.यासाठी विविध पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन  नियामक जोखमीचे पालन करताना कंपन्यांना त्यांच्या गुंतवणूकदारांना तसेच भागधारकांना उत्तरदायी राहण्याचा सर्वांगीण दृष्टिकोन समाविष्ट असणे ही ईएसजीची (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) संकल्पना आहे.

 

 

 

 

 

 

N.Chitale/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1879847) Visitor Counter : 188


Read this release in: English