वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘ईएसजी परिषद औद्योगिक परिवर्तनासाठी - आत्मनिर्भर भारतासाठी ईएसजी’ मुंबईमध्ये होणार‌


कॉर्पोरेट क्षेत्र आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना ईएसजी चौकटीत अधिक उन्नत उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने सुलभीकरण करण्याचा तसेच ईएसजी उपायांचा अधिकाधिक अवलंब होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा ईएसजी परिषदेचा उद्देश

Posted On: 28 NOV 2022 9:15PM by PIB Mumbai

 

पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय आणि भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाअंतर्गत राष्ट्रीय उत्पादकता परिषद ,या स्वायत्त संस्थेने  येत्या 29 नोव्हेंबर 2022 रोजी औद्योगिक परिवर्तनासाठी ईएसजी परिषद - आत्मनिर्भर भारतासाठी ईएसजीचे मुंबईत आयोजन केले आहे. कॉर्पोरेट क्षेत्र आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना ईएसजी अर्थात पर्यावरणीय, सामाजिक व प्रशासन  चौकटीत अधिक उन्नत उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने सुलभीकरण करण्यासाठी तसेच ईएसजी उपायांचा अधिकाधिक अवलंब होण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर  राष्ट्रीय उत्पादकता परिषदेने आज मुंबईत एक प्रस्तावनात्मक वार्ताहर परिषद आयोजित केली होती.

आगामी परिषदेबद्दल प्रसारमाध्यमांना माहिती देताना एनपीसीचे महासंचालक श्री संदीप कुमार नायक (प्रशासकीय अधिकारी) म्हणाले मुंबईतील ही ईएसजी परिषद या मालिकेतील तिसरी परिषद आहे; पहिल्या दोन परिषदा नवी दिल्ली आणि चेन्नईमध्ये पार पडल्या. 2021 साली ग्लासगो इथे झालेल्या कॉप 26 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करण्याबाबतची आणि स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याबाबतची भारताची वचनबद्धता जाहीर केली होती. कॉप 27 मध्ये भारताने आपल्या पथदर्शी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला. जी 20 च्या भारताला मिळालेल्या  अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत आपल्या प्रगतीचे  तसेच उद्योग, पर्यावरण, पायाभूत सुविधा, इत्यादी क्षेत्रांमध्ये बजावलेल्या उल्लेखनीय कामगिरीचे दर्शन घडवेल.’ 

एन पी सी चे महासंचालक म्हणाले की सेबीने भारतातील अव्वल 1000 नोंदणीकृत कंपन्यांना त्यांच्या वार्षिक अहवालाचा भाग म्हणून उद्योग दायित्व  आणि शाश्वतता  अहवाल ( बीआरएसआर )देण्याचे अनिवार्य केले आहे.

हा अहवाल बंधनकारक करण्याच्या सेबीच्या निर्णयामुळे उद्योगांच्या कामगिरीत  सुधारणा होऊन त्यांच्या शाश्वततेत भर पडेल. एवढेच नाही तर त्यांच्या नफ्यात वाढ व्हायला मदतच होईल.

राष्ट्रीय उत्पादकता परिषदेबद्दल बोलताना एनपीसीचे महासंचालक म्हणाले" नव्वदच्या दशकाच्या मध्यापासून एनपीसी पर्यावरण, ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये काम करत आहे. "

 

ईएसजी परिषदेविषयी :

या चर्चासत्रात स्पर्धात्मकता, शाश्वतता आणि लवचिकता यासाठी उद्योग धोरणात ईएसजीचा अंतर्भाव यावर चर्चा होईल. उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि विविध संघटनांमधील ईएसजीची हाताळणी करणारे  वरिष्ठ पातळीवरील अधिकारी यांचा सहभाग अपेक्षित आहे.

औद्योगिक परिवर्तनासाठी ईएसजी परिषद - आत्मनिर्भर भारतासाठी ईएसजीचा  कॉर्पोरेट / उद्योग यांना स्पर्धात्मक, प्रतिकारक्षम , शाश्वत बनण्यासाठी पुढीलप्रमाणे फायदा होण्याची अपेक्षा  आहे:

  •  शाश्वततेबाबतच्या विविध पैलूंबद्दलची संवेदनशीलता
  •  सेबीच्या बी आर एस आर चौकटीअंतर्गत अहवाल आणि अनुपालन
  • संसाधनांची क्षमता, सामाजिक-आर्थिक उपाय, समुदाय विकास, कॉर्पोरेट प्रशासन पद्धती , इत्यादी साठी उत्तम  पद्धती
  •  उद्योगांपुढील आव्हाने/समस्या यावर चर्चा
  •  भारतीय कॉर्पोरेट आणि उद्योग यांना औद्योगिक परिवर्तनासाठी आणि शाश्वततेच्या आधारावर जागतिक अग्रस्थानी येण्यासाठी पुढचा मार्ग दाखवणे
  •  ईएसजी कार्यक्रमाची उद्योग धोरणाशी आणि स्पर्धात्मक फायद्यासाठी सांगड घालणे  

 

ईएसजी परिषदेची पार्श्वभूमी

सतत बदलत्या औद्योगिक वातावरणात एखादा उद्योग जबाबदार तर असावाच त्याचबरोबर  पर्यावरण आणि समाजाच्या दृष्टीने शाश्वत असावा, अशी गुंतवणूकदार आणि इतर घटक पक्षांची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलांशी जुळवून घेताना आणि परिणामांचे उपशमन करताना तसेच शाश्वत विकासाचा पर्याय चोखाळताना जगभरात काही प्रमुख समस्या निर्माण झाल्या आहेत.

नागरिकांचे स्थलांतर, पुराचा धोका, आणि समुद्राची वाढती पातळी, खासगीपण आणि डेटा सुरक्षा यांसारखी  जागतिक शाश्वतता आव्हाने आणि नियामक दडपण यामुळे गुंतवणूकदारांसाठी पूर्वी न बघितलेले असे जोखमीचे घटक निर्माण झाले आहेत. जागतिक स्तरावरच कंपन्यांना अवघड मुद्द्यांचा सामना करावा लागत असताना , गुंतवणूकदारांनी पारंपरिक गुंतवणूक पर्यायांची पुनर्मूल्यांकन करण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय ही ईएसजी संकल्पना कंपन्यांना विविध पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय नियामक जोखमींचे अनुपालन करताना गुंतवणूकदारांसाठी आणि इतर हितसंबंधी घटकांसाठी समग्र दृष्टिकोन ठेवण्यासाठी मदत करेल.

एनपीसीने आमच्या देशभरातल्या ईएसजी मालिकेचा भाग म्हणून आतापर्यंत दोन संमेलने आयोजित केली आहेत. त्यापैकी पहिले हे भारत सरकारच्या सार्वजनिक उद्योग क्षेत्राच्या सहकार्याने 29 जुलै 2022 रोजी नवी दिल्लीत भरवण्यात आले. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना ईएसजी संदर्भात सज्ज करण्यावर यात भर देण्यात आला.

अशाच प्रकारचे एक चर्चासत्र सी आय आय, दक्षिण विभाग यांच्या सहकार्याने 12 सप्टेंबर 2022 रोजी खासगी क्षेत्रासाठी चेन्नईमध्ये घेण्यात आले. या दोन्ही चर्चासत्रांमध्ये केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आणि खासगी कंपन्यांमधील व्यावसायिक, मुद्रित  आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीसह मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

***

N.Chitale/N.Mathure/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1879649) Visitor Counter : 246


Read this release in: English