सांस्कृतिक मंत्रालय
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई परिमंडळातर्फे जागतिक वारसा सप्ताह साजरा
Posted On:
26 NOV 2022 7:00PM by PIB Mumbai
जागतिक वारसा सप्ताह 2022 चा भाग म्हणून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई परिमंडळातर्फे 19 ते 25 सप्टेंबर या आठवड्यात जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या घारापुरी (एलिफंटा) लेणी इथे जागतिक वारसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
स्मारक स्थळाचे जतन आणि सौंदर्यीकरण याबाबत स्थानिक प्रशासनामध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय तसेच स्थानिक पंचायतीमधील मान्यवरांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते.रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या सहकार्याने यावेळी स्मारकस्थळी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागाच्या प्राध्यापक अनिता राणे-कोठारे आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई परिमंडळातील अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या चर्चासत्रात विद्यार्थी आणि अभ्यागतांनी भाग घेतला. या कार्यक्रमात एलिफंटा लेण्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाबाबत व्याख्यानांतून माहिती देण्यात आली.
जागतिक वारसा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कोल्हापूरच्या पन्हाळा गडावरील स्वच्छता अभियान, अलिबागच्या सातखणी बुरुजावर शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा इत्यादी उल्लेखनीय कार्यक्रम या सप्ताहात झाले.एशियाटिक सोसायटी या संस्थेच्या सहकार्याने 20 नोव्हेंबर 2022 रोजी ‘अंबरनाथ येथील मंदिरातील कला आणि स्थापत्य’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जेष्ठ संशोधक आणि अभ्यासक डॉ.कुमुद कानिटकर यांनी या हजार वर्ष जुन्या मंदिराच्या वास्तुरचनेविषयी कार्यशाळेतील उपस्थितांना माहिती दिली.
तसेच, 23 ते 25 नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई परिमंडळातर्फे भारतातील जागतिक वारसा स्थळे आणि त्या स्मारकांचे जतन या विषयावरील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. मुंबई म्युझियम सोसायटीच्या अध्यक्ष डॉ.फिरोजा गोदरेज यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा समकालीन राज्यकर्ता रशियाचा पीटर द ग्रेट यांच्याविषयीचा विभाग हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभाग आणि झेवियर्स महाविद्यालय यांनी संयुक्तपणे या प्रदर्शनाचे आयोजन केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मुंबई परिमंडळातील अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.राजेंद्र यादव यांनी जागतिक वारसा सप्ताहाचे महत्त्व आणि पुरातत्व विभागाने दख्खनच्या परिसरात केलेले कार्य याबाबत माहिती सांगणारे व्याख्यान दिले.
मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात प्रश्नमंजुषा कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांचा सत्कार या उपक्रमांनी या जागतिक वारसा सप्ताहाचा समारोप झाला.
युनेस्कोने जागतिक वारसा सप्ताह साजरा करायला सुरुवात केली आणि भारतीय पुरातत्व विभागातर्फे दर वर्षी 19 ते 25 नोव्हेंबर या काळात हा सप्ताह साजरा करण्यात येतो.जगातील वारसा स्थळे आणि स्मारकांची विविधता आणि त्यांना असलेली असुरक्षितता यांच्याविषयी सर्वांना माहिती देणे तसेच या स्थळांचे संरक्षण आणि जतन यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांविषयी सामान्य जनतेत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याद्वारे आपल्या वंशजांसाठी भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन यांना चालना मिळत आहे.
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879152)
Visitor Counter : 250