माहिती आणि प्रसारण मंत्रालय
‘बिहाइंड द हेस्टॅक्स’ हा ग्रीक चित्रपट 2015 सालच्या स्थित्यंतराच्या आपत्तीतील भयानक वास्तवाला स्पर्श करतो
“सामान्य जनता भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या जाळ्यात कशी अडकत असते याचे प्रतिबिंब या चित्रपटात दिसते”; दिग्दर्शक असिमिना प्रोड्रोऊ
गोवा/मुंबई, 24 नोव्हेंबर 2022
2015 साली ग्रीसमध्ये उद्भवलेल्या स्थित्यंतराच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर ‘बिहाइंड द हेस्टॅक्स’ हा सामाजिक नाट्याने भरलेला चित्रपट घडतो. युरोपातील देशांनी सीमा बंद केल्यामुळे स्थलांतरित आणि निर्वासित यांनी ग्रीसच्या उत्तरेकडील सीमेजवळ गर्दी केली होती, त्या वेळचे भयानक वास्तव चित्रपटात पहायला मिळते. 53व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय प्रीमियर सादर करण्यात आला.
पत्रसूचना कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘इफ्फी टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात बोलताना दिग्दर्शक आणि पटकथाकार असिमिना प्रोड्रोऊ म्हणाल्या की या चित्रपटाची कथा त्यातील कुटुंबातल्या आई, वडील आणि मुलगी अशा तिन्ही मध्यवर्ती पात्रांच्या दृष्टीकोनातून सादर करण्यात आली आहे. या तीन वेगवेगळ्या व्यक्तींना भ्रष्टाचारी यंत्रणांना शरण जावे लागते. “या चित्रपटातील तीन अध्याय म्हणजे एखादी व्यक्ती त्या त्या प्रकारे का वागते आहे याचा घेतलेला शोध आहे,” असिमिना प्रोड्रोऊ यांनी सांगितले. “मला या चित्रपटातील प्रत्येक मुख्य पात्राच्या निकट जायचे होते.चित्रपटाचा शेवट येता येता, या तिन्ही पात्रांच्या वागण्यामागचे उद्देश उघड होत असले तरी सुरुवातीच्या भागात ही पात्रे अशा चमत्कारिक पद्धतीचे वर्तन का करतात याबद्दल प्रेक्षकांना संभ्रमात टाकणे आवश्यक होते.”
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/haystacks-1U5XW.jpg)
हा चित्रपट एका कुटुंबाभोवती फिरतो आणि कुटुंब ही संकल्पना सार्वत्रिक असल्यामुळे, आंतरराष्ट्रीय प्रेक्षक या चित्रपटाशी जोडला जाऊ शकेल असिमिना प्रोड्रोऊ यांना वाटते. त्या म्हणाल्या की निर्वासितांचा प्रश्न चित्रपटाच्या मुख्य पात्रांवर प्रभाव टाकत असल्यामुळे तो या चित्रपटाच्या कथेचा महत्त्वाचा भाग आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/haystacks-2G3TK.jpg)
स्थलांतरितांच्या वेदना या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत तसेच ग्रीक जनतेने स्थलांतरितांच्या समस्येला कसे तोंड दिले, याची देखील कल्पना या चित्रपटातून येते. “त्या संकटात स्थलांतरितांना मदत करणारे लोक होते तसेच त्यांच्याकडून पैसे उकळणारे देखील लोक होते. या सगळ्यात चर्चची देखील एक विशिष्ट भूमिका होती. चर्चचे अधिकारी बहुतांश वेळा पुराणमतवादी विचारांचे होते. स्थलांतरित लोक धोकादायक असतात असेच बहुतेक प्रसंगी त्यांनी स्थानिकांच्या मनावर बिंबवले. हे सर्व चित्रपटात दाखवण्यात आले आहे,” त्यांनी सांगितले. सामान्य जनता दर दिवशी भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या जाळ्यात कशी अडकते याचे प्रतिबिंब या चित्रपटात दिसते.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/haystacks-3UNDP.jpg)
‘बिहाइंड द हेस्टॅक्स’ हा चित्रपट ग्रीसच्या उत्तर सीमेजवळ राहणाऱ्या मध्यमवयीन, कर्जात बुडालेल्या मच्छिमाराची कहाणी सांगतो. अधिक पैशांच्या मोबदल्यात तो सीमेवरील तलावामधून स्थलांतरितांची तस्करी करू लागतो. चर्चवर निस्सीम श्रद्धा असणारी त्याची पत्नी देवाच्या शब्दांवर विश्वास ठेवते तर त्यांची मुलगी स्वतःचे आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करते. कुटुंबात एक दुःखद घटना घडल्यानंतर चित्रपटातील या तिन्ही पात्रांना आपापल्या व्यक्तिगत विरोधाला आणि दोषांना सामोरे जावे लागते. आणि आता आयुष्यात त्यांना प्रथमच स्वतःच्या वागण्याची किंमत चुकवावी लागते.
या चित्रपटात मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री एव्हजेनिया लाव्दा हिचा हा पहिलाच चित्रपट आहे. “जरी मी या चित्रपटात माझ्या वयाच्या पात्राची भूमिका साकारलेली नाही तरीही मी माझ्या भूमिकेत उत्कटता आणण्याचा प्रयत्न केला आहे” ती म्हणाली.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1878651)
Visitor Counter : 231