संरक्षण मंत्रालय

नौदलाच्या पश्चिम विभागाकडून   20 नोव्हेंबर रोजी मुंबईत अर्ध-मॅरॅथॉनचे आयोजन


संकल्पना: “स्वच्छ सागरकिनारे आणि स्वच्छ सागर, निरोगी आयुष्ये घडवतात”

Posted On: 18 NOV 2022 4:17PM by PIB Mumbai

 

नौदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा भाग नौदलाच्या पश्चिम विभागाने येत्या रविवारीमुंबईत, 20 नोव्हेंबर 2022 रोजी  इंडियन ऑईल डब्लूएनसी नेव्हल हाफ मॅरॅथॉन-2022 या शर्यतीचे आयोजन केले आहे. वर्ष 2016 पासून नौदलाच्या पश्चिम विभागाकडून अर्ध- मॅरॅथॉनच्या आयोजनाची सुरुवात झाली. तेव्हापासून या शर्यतीचा आवाका आणि आकारमान वाढतच गेले असून आता ही शर्यत भारतातील पाचव्या क्रमांकाची आणि मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावण्याची शर्यत मानली जाते.यावर्षी, अधिक मोठी, अधिक उत्तम आणि अधिक सशक्त स्वरूप घेण्याची आणि नवी उंची गाठण्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्धार आयोजनातून व्यक्त होतो आहे. ही शर्यत एयरक्राफ्ट कॅरियर रन(21 किमी), डिस्ट्रॉयर रन(10 किमी), आणि फ्रिगेट रन(5 किमी) अशा तीन श्रेणींमध्ये घेतली जाणार आहे.या शर्यतीची पूर्वतयारी म्हणून आणि त्यात भाग घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये तंदुरुस्ती आणि लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीबाबत जागरुकता निर्माण व्हावी म्हणून कुलाबा येथे 11 ते 13 नोव्हेंबर 2022 या कालावधीत रेस एक्स्पो प्रदर्शन भरविण्यात आले होते.

या प्रदर्शनाला अभूतपूर्व आणि जबरदस्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनाच्या ठिकाणी, शर्यतीच्या तयारीसाठी तसेच त्यातील वैद्यकीय पैलूंबाबत विविध तज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद, पदकांसोबत सेल्फी, नामांकित ब्रँडच्या कंपन्यांकडून सवलतीच्या दरात क्रीडासंबधी उत्पादने, स्पर्धेची स्मरणचिन्हे इत्यादी आकर्षणे  यांचा या एक्स्पोमध्ये समावेश होता. वर्ष 2016 मध्ये आयोजित पहिल्या शर्यतीपासून आतापर्यंत सहभागी स्पर्धकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून या वर्षी 15,000 धावपटूंनी सहभागासाठी नोंदणी केली आहे. यात भाग घेणाऱ्या स्पर्धकांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. या वर्षी नोंदणी केलेल्या स्पर्धकांपैकी 10,000 हून अधिक धावपटूंनी 21 किलोमीटर आणि 10 किलोमीटर या विभागातील शर्यतींसाठी नोंदणी केली असून त्यात पुरेशा गांभीर्याने आणि उत्साहाने भाग घेणाऱ्या धावपटूंची संख्या मोठी आहे हे यावरून दिसून येते. एम्सतर्फे प्रमाणित शर्यत मार्ग आणि यावर्षी प्रथमच मिळालेली क्रीडाविश्वातील प्रतिष्ठित एएफआय अर्थात भारतीय क्रीडा महासंघाची संलग्नता यामुळे यात भाग घेणारे धावपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बहुतेक सर्व नामांकित स्पर्धांसाठी पात्र ठरतील. सर्व नोंदणीकृत धावपटूंना स्पर्धेची तपशीलवार माहिती देणारी तसेच स्पर्धेच्या तयारीबाबत महत्त्वाच्या सूचना असलेली ई-पुस्तिका देखील देण्यात आली आहे. ज्या उत्सुक स्पर्धकांना नोंदणीच्या कालावधीत या स्पर्धेसाठी नोंदणी करता आली नाही त्यांच्यासाठी 14 नोव्हेंबर 2022 रोजी नो थ्रिल, ओन्ली फ्रिलप्रकारची मर्यादित नोंदणी देखील सुरु करण्यात आली होती.   

छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनसजवळील आझाद मैदानावर या स्पर्धेची सुरुवात होईल. स्वच्छ सागरकिनारे आणि स्वच्छ सागर, निरोगी आयुष्ये घडवितात या संदेशासह सुप्रसिध्द मरीन ड्राईव्ह ते हाजी अली या अंतरावर समुद किनाऱ्याच्या साथीने ही शर्यत संपन्न होईल. ही शर्यत पर्यावरण-स्नेही पद्धतीने आयोजित करण्यासाठी भारतीय नौदलाने अनेक उपक्रम हाती घेतले असून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी अनिवार्य, स्पर्धेच्या कालावधीत कागदी कप, ब्रँडीग साहित्य आणि खाद्यपदार्थांचे पॅकिंग देखील 100% पुनर्वापर करण्याजोग्या साहित्यापासून तयार करण्यात आले आहे. महामारी-पश्चात काळात मुंबईत आयोजित झालेली ही सर्वात मोठी शर्यत असल्यामुळे सर्व मुंबईकरांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झालेली स्पष्ट दिसून येते आहे.या स्पर्धेला महाराष्ट्र राज्य सरकार,मुंबई पोलीस,बृहन्मुंबई महानगरपालिका, युवा विभाग आणि इतर अनेक भागीदार आणि असंख्य स्वयंसेवकांचे संपूर्ण पाठबळ लाभले आहे.

***

S.Patil/S.Chitnis/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1877024) Visitor Counter : 185


Read this release in: English