विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
गोव्यात सागरतज्ञ आणि जलतज्ञांच्या पहिल्या परिषदेचे आयोजन
Posted On:
16 NOV 2022 7:01PM by PIB Mumbai
पणजी , 16 नोव्हेंबर 2022
कोलंबो सुरक्षा परिषदेच्या अधिपत्याखाली 15 नोव्हेंबर 2022 रोजी गोव्यातील एनआयओ अर्थात राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेत देशातील पहिल्यावहिल्या सागरतज्ञ आणि जलतज्ञांच्या परिषदेला सुरुवात झाली. ही परिषद 15 ते 18 नोव्हेंबर या कालावधीत गोवा तसेच हैदराबाद येथे आयोजित करण्यात आली आहे. समुद्रशास्त्र तसेच जलशास्त्र या विषयांतील नावाजलेल्या राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्था (एनआयओ), राष्ट्रीय जलशास्त्र संस्था (एनआयएच), राष्ट्रीय ध्रुवीय आणि सागरी संशोधन केंद्र (एनसीपीओआर) या संस्था गोवा येथील परिषदेचे तर भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती सेवा केंद्र (आयएनसीओआयएस) ही प्रथितयश संस्था हैदराबाद येथील परिषदेचे यजमानपद भूषवत आहे.
“आपले सागर हेच आपले भविष्य” ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी, बांगलादेश,भारत,मालदीव,मॉरिशस आणि श्रीलंका या देशांतील समुद्रशास्त्र आणि जलशास्त्र विषयक संस्थांच्या प्रमुखांनी या क्षेत्रातील अद्ययावत माहिती आणि सर्वोत्तम पद्धतींच्या माहिती सामायिक करण्यासंदर्भात चर्चा केली. सागरांशी संबंधित प्रादेशिक आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्यात्मक दृष्टीकोन स्वीकारण्याच्या व्यापक उद्दिष्टासह सागरी निरीक्षण, सागरविषयक नमुन्यांची निर्मिती, जलशास्त्रविषयक सर्वेक्षणे आणि सागरी माहिती आणि सल्लागार सेवा यांच्या क्षेत्रात प्रत्येक देशाचे सामर्थ्य आणि क्षमता यांची माहिती करून घेण्यात आली.
हिंदी महासागर प्रदेशात किनारपट्टीवर असलेल्या देशांतील प्रचंड लोकसंख्येच्या उपजीविकेवर थेट प्रभाव टाकण्यात हिंद महासागराची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणूनच, सागरशास्त्राबाबत अधिक सखोल माहिती करून घेणे गरजेचे आहे.केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.एम रविचंद्रन त्यांच्या भाषणात सुरुवातीला म्हणाले की, “आपल्याला जे माहित आहे” त्या माहितीची इतरांसोबत देवाणघेवाण करणे आणि “आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे” ते ओळखणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
संयुक्त राष्ट्रांनी 2021-30 हे विद्यमान दशक शाश्वत विकासासाठी सागरी विज्ञानाचे दशक म्हणून जाहीर केल्यामुळे नुकतीच सुरु झालेली ही परिषद म्हणजे हिंद महासागरी प्रदेशासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ‘सागर’ अर्थात ‘प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षितता आणि विकास’ साधण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले स्वप्न देखील कोलंबो सुरक्षा परिषदेतील देशाच्या सागरशास्त्र आणि जलशास्त्रविषयक सहकार्यात्मक प्रयत्नांच्या मदतीने प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने ही परिषद कार्य करत आहे.
कोलंबो सुरक्षा परिषद हा प्रादेशिक सुरक्षाविषयक आव्हानांचा सामूहिकरित्या सामना करण्यासाठी उभारलेला बहुपक्षीय मंच आहे. या परिषदेमध्ये भारतासह मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. बांगलादेश आणि सेशेल्स या देशांकडे सध्या या मंचावरील निरीक्षकाची भूमिका सोपविण्यात आली आहे.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1876574)
Visitor Counter : 221