दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेतर्फे डिजिटल जीवन प्रमाणपत्र आणि सामान्य विमा या सेवा ग्राहकांच्या दारी उपलब्ध
Posted On:
16 NOV 2022 5:26PM by PIB Mumbai
मुंबई, 16 नोव्हेंबर 2022
आयपीपीबी अर्थात इंडिया पोस्ट पेमेंट बँक बँकिंगशी संबंधित इतर सर्व सुविधांसह निवृत्तीवेतन धारकांच्या सोयीसाठी जीवन प्रमाण सेवा पुरवत आहे. निवृत्तीवेतन सुरळीतपणे मिळण्यासाठी आवश्यक असलेली जीवन प्रमाण सेवा म्हणजेच डिजिटल स्वरूपातील हयातीचा दाखला निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या राहत्या ठिकाणी उपलब्ध करून देणे शक्य व्हावे यासाठी आयपीपीबीने केंद्रीय निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाच्या सहकार्याने नवा उपक्रम हाती घेतला आहे. आधार क्रमांकाच्या मदतीने बायोमेट्रिक प्रमाणीकरणावर आधारित असलेली ही सेवा वयोवृद्ध निवृत्तीवेतन धारकांसाठी अत्यंत सोयीची आहे. आतापर्यंत देशातील 11 लाख निवृत्तीवेतन धारकांनी जीविताचा दाखला सादर करण्यासाठी आयपीपीबीच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र मिळण्याच्या सेवेचा लाभ घेतला आहे.
“तुमची बँक, तुमच्या दारी”या घोषवाक्यासह आपल्या देशातील सर्वात सुलभपणे उपलब्ध, किफायतशीर आणि विश्वसनीय बँक म्हणून ओळखली जावी या ध्येयासह आयपीपीबी कार्यरत आहे. देशातील जनतेला बँकिंग सेवेत अंतर्भूत सर्व सुविधा सुलभतेने उपलब्ध व्हाव्या यासाठी आयपीपीबीने 1 लाख 37 हजारांहून अधिक टपाल कार्यालयांच्या राष्ट्रीय पातळीवरील जाळ्याचा लाभ करून घेतला असून त्यापैकी 1 लाख 10 हजार टपाल कार्यालये ग्रामीण भारतात आहेत. ग्राहकांना त्यांच्या घरातच सर्व बँकिंग सेवा पुरवता याव्या यासाठी आयपीपीबीने 1 लख 89 हजारहून अधिक पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवकांना स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक साधनांनी सुसज्ज केले आहे. साडेपाच कोटींहून अधिक ग्राहकांना बँकिंग सेवा पुरवत असलेल्या आणि त्यातील बहुतांश ग्राहक ग्रामीण भारतातील असलेल्या,आयपीपीबीने स्वतःला व्यापक आर्थिक समावेशाला चालना देणारी आणि ग्राहकांचे सर्वाधिक प्राधान्य तसेच विश्वास असलेली बँक म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. टपाल विभागाची 100%मालकी असलेल्या आणि विभागाकडून प्रोत्साहन दिली गेलेली आयपीपीबी ही रिझर्व्ह बँकेकडून शेड्युल्ड बँकेचा दर्जा मिळविणारी देशातील पहिली पेमेंट्स बँक देखील आहे.
सर्वसामान्य विमा
गेल्या काही वर्षांमध्ये आयपीपीबीने ग्राहकांना स्पर्धात्मक दरांमध्ये दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारीचा स्वीकार केला आहे. आयपीपीबीने ग्राहकांना व्यक्तिगत विमा तसेच सामान्य गटविमा सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टाटा आणि बजाज यांसारख्या मोठ्या उद्योगांशी सहकारी संबंध स्थापित केले आहेत. संयुक्त उपक्रमाद्वारे आयपीपीबीच्या ग्राहकांमध्ये विम्याविषयी जागरुकता निर्माण केली आणि त्यातून अनुक्रमे 399 आणि 396 रुपयांच्या अगदी स्वस्त विमा हप्त्यामुळे ग्राहकांनी विकत घेतलेल्या विमा पॉलिसीजच्या संख्येत अभूतपूर्व वाढ दिसून आली. संपूर्ण भारतभरात एकूण 72 कोटी 88 लाख रुपयांची विमाविषयक उलाढाल झाली आणि त्यात महाराष्ट्रातील ग्राहकांनी काढलेल्या 30 कोटी 66 लाख रुपयांच्या विमा पॉलिसीजचा समावेश आहे. अखिल भारतीय स्तरावर सामान्य विमा विक्रीत महाराष्ट्र परिमंडळ सर्वोच्च स्थानी आहे.
आयपीपीबीने ग्राहकांना किफायतशीर दरात दर्जेदार सेवा पुरविण्यावर लक्ष केंद्रित केले असून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात बँकिंग सेवा पोहोचावी यासाठी आयपीपीबी कटिबद्ध आहे.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876518)
Visitor Counter : 230