कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाने केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा प्रचार करण्यासाठी सुरु केली देशव्यापी मोहीम
निवृत्ती वेतन धारकांना केवळ एका बटणावर क्लिक करून डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र दाखल करता येणार
Posted On:
15 NOV 2022 6:26PM by PIB Mumbai
मुंबई, 15 नोव्हेंबर 2022
भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाने केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांच्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र योजनेचा प्रचार करण्यासाठी देशव्यापी मोहीम सुरु केली आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्याही अँड्रॉइड मोबाइल फोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या फेस ऑथेंटिकेशन (चेहरा प्रमाणीकरण) तंत्रज्ञान योजनेचा प्रारंभ केला. आता, चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल माध्यमातून जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची जाहिरात करण्यासाठी विभागाने देशव्यापी विशेष मोहीम सुरु केली आहे.

सर्व नोंदणीकृत निवृत्ती वेतन धारक संघटना, निवृत्ती वेतन वितरण बँका, भारत सरकारची मंत्रालये आणि सीजीएचएस वेलनेस सेंटर यांना निवृत्तीवेतनधारकांच्या ‘जीवन सुलभीकरणा साठी’ विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी, डिजिटल जीवन प्रमाणपत्र/चेहरा प्रमाणीकरण तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या शृंखलेत, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे केंद्र सरकारचे पथक अंबरनाथला भेट देणार आहे, 16 नोव्हेंबर 2022 रोजी अंबरनाथ शाखेमध्ये आणि 17 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबई येथे केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी ही मोहीम आयोजित केली जाईल. आपले जीवन प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून दाखल करण्यासाठी सर्व निवृत्ती वेतन धारक केंद्राला भेट देऊ शकतील.
यापूर्वी, जीवन प्रमाणपत्र प्रत्यक्ष दाखल करावे लागत होते आणि त्यासाठी निवृत्ती वेतन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता, नवीन प्रणालीच्या मदतीने निवृत्ती वेतन धारक आपल्या घरी आरामात बसून डिजिटल माध्यमातून केवळ एक बटण क्लिक करून आपले जीवन प्रमाणपत्र दाखल करू शकतील. मोबाईलवरून चेहरा प्रमाणीकरणाद्वारे केवळ सुरुवातीलाच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत, आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील देणे आवश्यक आहे. राज्य सरकारच्या कर्मचार्यांना आणि वितरण प्राधिकरणाला राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात ही सुविधा उपलब्ध आहे.
केंद्रीय पथकाने विनंती केली आहे की, सर्व निवृत्ती वेतन धारकांनी DOPPW_INDIA OFFICIAL विभागाच्या अधिकृत युट्युब चॅनेलला भेट द्यावी. या ठिकाणी चेहरा प्रमाणीकरणाद्वारे जीवन प्रमाणपत्र दाखल करण्याची पद्धत सोप्या भाषेत स्पष्ट करण्यात आली आहे.
* * *
PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1876203)
Visitor Counter : 311