नौवहन मंत्रालय
भारतीय सागरी विद्यापीठ आयएमयूकडून माजी विद्यार्थ्यांच्या पहिल्या मेळाव्याचे नवी मुंबईत आयोजन
भारताला एक सर्वोच्च सागरी राष्ट्र आणि जागतिक सागरी शक्ती बनवणे हे उद्दिष्ट आहे – आयएमयूच्या कुलगुरू डॉ. मालिनी शंकर
Posted On:
15 NOV 2022 5:30PM by PIB Mumbai
मुंबई, 15 नोव्हेंबर 2022
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या भारतीय सागरी विद्यापीठ (इंडियन मेरिटाइम युनिव्हर्सिटी-IMU) या केंद्रीय विद्यापीठाने 14 नोव्हेंबर 2022 रोजी नवी मुंबई येथील संकुलात पहिला माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता.
भारतीय सागरी विद्यापीठाची स्थापना 2008 मध्ये झाली. पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंट, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पोर्ट मॅनेजमेंट आणि इतर संस्थांचा समावेश करून या विद्यापीठात देशातील सागरी प्रशिक्षण आणि शिक्षणाचे क्षितिज विस्तारित करण्यात आले. आयएमयू, नवी मुंबई पूर्वी प्रशिक्षण जहाज चाणक्य म्हणून ओळखले जात असे. टी.एस. चाणक्य हे प्रशिक्षण जहाज राजेंद्र आणि भारतीय नौवहन क्षेत्रात प्रदीर्घ काळ सेवा बजावणारे प्रशिक्षण जहाज डफरिन यांचा प्रशिक्षणाचा वारसा पुढे चालवणारे किनारपट्टीवरील प्रशिक्षण जहाज आहे. भारतातील मर्चंट नेव्ही ऑफिसर्सचे प्रशिक्षण 1927 मध्ये डफरिनमध्ये सुरू झाले. सध्या नवी मुंबई, मुंबई, कोलकाता, चेन्नई (मुख्यालय), विशाखापट्टणम, कोची या ठिकाणी आयएमयू संकुले आहेत. आयएमयू सुरुवातीला जहाजबांधणी मंत्रालयाच्या मुंबईच्या नौवहन महासंचालनालयाच्या अंतर्गत येत होते.
ही संस्था सागरी अभियांत्रिकी आणि समुद्री विज्ञान या मुख्य विषयांमध्ये अभ्यास, प्रशिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्य करते आणि सागरी व्यवस्थापन, नौदल आर्किटेक्चर, ओशनोग्राफी इत्यादी अभ्यासक्रम चालवते. भविष्यात सागरी जीवशास्त्र, सागरी कायदे, सागरी सुरक्षा, सागरी सांख्यिकी इत्यादी उदयोन्मुख क्षेत्रांवर भर देणे हे आमच्या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे भारताला एक सर्वोच्च सागरी राष्ट्र आणि जागतिक सागरी शक्ती बनवणे हेही लक्ष्य आहे, असं आयएमयूच्या कुलगुरू डॉ. मालिनी शंकर म्हणाल्या.
भारत हे एक सागरी राष्ट्र आहे आणि त्याला उभारी देण्याची गरज आहे. मेरीटाइम इंडिया व्हिजन 2030 आणि मेरीटाइम इंडिया व्हिजन 2047 चा एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेत भारताची पत वाढावी यासाठी संशोधन आणि मार्गदर्शन, शैक्षणिक-उद्योग परस्परसंवाद आणि सागरी धोरणावर आयएमयू भर देत असल्याचे त्यांनी सांगितले.
* * *
PIB Mumbai | S.Patil/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876158)
Visitor Counter : 163