कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्र सरकारी निवृत्तीवेतनधारकांसाठी पुण्यामध्ये 13 नोव्हेंबर 2022 रोजी देशव्यापी शिबिराचे आयोजन
Posted On:
12 NOV 2022 1:48PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी कोणत्याही ऍन्ड्रॉईड मोबाईल फोनद्वारे फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी अर्थात चेहऱ्याचे प्रमाणीकरण करण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अतिशय महत्त्वाच्या योजनेचा शुभारंभ केला होता. आता या विभागाने जीवन प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून उपलब्ध करण्याच्या योजनेचा प्रचार करण्यासाठी आणि फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान योजनेची लोकप्रियता वाढवण्यासाठी एक देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक संघटना, निवृत्तीवेतन वितरण बँका, भारत सरकारची मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विषयक केंद्रांना विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र / फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच मालिकेंतर्गत निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे एक पथक पुण्याला भेट देणार आहे. त्याअंतर्गत 13 नोव्हेंबर 2022 रोजी केंद्र सरकारी निवृत्तीवेतन धारकांसाठी एसबीआय, पुणे मुख्य शाखा, डॉ. आंबेडकर रोड, कलेक्टर ऑफिस कंपाऊंड, पुणे-411001 या ठिकाणी या शिबिराचे आयोजन होणार आहे. आपली जीवन प्रमाणपत्रे डिजिटल साधनांच्या माध्यमातून जमा करण्यासाठी सर्व निवृत्तीधारकांसाठी येथे सोय करण्यात आली आहे.
यापूर्वी जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वयोवृद्ध निवृतीवेतनधारकांना तासनतास बँकेच्या बाहेर रांग लावून ताटकळत उभे राहावे लागत होते. आता आपल्या घरीच केवळ एक बटण क्लिक करून ही सोय उपलब्ध झाली आहे. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक इत्यादी संबंधित तपशील केवळ सुरुवातीला एकदाच देणे आवश्यक आहे. ही सुविधा राज्य सरकारी कर्मचारी आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरुपात वितरण अधिकाऱ्यांमार्फत देखील उपलब्ध आहे.
केंद्रीय पथकाने सर्व निवृत्तीवेतनधारकांना या केंद्राला भेट देऊन आपली जीवन प्रमाणपत्रे डिजिटल माध्यमातून सादर करण्याचे आवाहन केले आहे.
***
M.Pange/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1875414)
Visitor Counter : 206