आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष मंत्रालयाची लोकप्रियता, विश्वासार्हता आणि स्वीकार्यता जागतिक पातळीवर वाढली आहे


आयुष क्षेत्राची बाजारपेठ जगभरात 18 अब्ज 2 कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचण्यात यशस्वी - केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल

Posted On: 05 NOV 2022 2:49PM by PIB Mumbai

 

वेगवेगळ्या वैद्यकीय शाखांनी अनेक आजारांवर यशस्वीपणे मात केल्यामुळे आज आयुष मंत्रालयाची लोकप्रियता, विश्वासार्हता आणि स्वीकार्यता जागतिक पातळीवर वाढली आहे, असे आज केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले. त्यांनी आज पुण्यातील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेला भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

परंपरागत चिकित्सा पद्धतीला लोकांनी जोडलेले राहणे आणि त्यांचे आरोग्य चांगले राहणे हा 'हर दिन हर घर आयुर्वेद' या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. निसर्गात जी संपदा, आणि शक्ती आहे त्याची माहिती लोकांना व्हावी हेही त्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती सोनोवाल यांनी दिली. ही पाच हजार वर्षे जुनी उपचार पद्धत असून आज आयुष क्षेत्राने जी मानवसेवा केली आहे त्याला तोड नाही असे ते म्हणाले. 2014 पर्यंत आयुष क्षेत्राची बाजारपेठ फक्त 3 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या मर्यादित आकाराची होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने आणि निष्ठापूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे आणि त्यांनी त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केल्यामुळे आज हा उद्योग जगभरात 18 अब्ज 2 कोटी अमेरिकन डॉलर्सवर पोहोचला आहे. आयुष मंत्रालयाची अन्य उत्पादने असतील किंवा औषधे असतील लोकांना त्यामार्फत दिलासा मिळाला आहे आणि त्यांचा विश्वास वाढला आहे, असे त्यांनी नमूद केले. या मंत्रालयाशी संबंधित सर्व घटकांनी एका कुटुंबासारखे काम करत 2027 पर्यंत  आत्मनिर्भर भारताच्या दिशेने जायचा त्यांचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आजारांवर मात करणे आणि आरोग्याला चालना देणे हे आयुष मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे समान लक्ष्य असल्यामुळे ही दोन मंत्रालये सध्या एकत्र काम करत असल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.

संस्थेच्या संचालक डॉ. के. सत्यलक्षमी यांनी सोनोवाल यांना संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. संस्थेच्या विविध विभागांना भेट देऊन सोनोवाल यांनी कामकाजाची माहिती घेतली आणि इथे उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांशी संवाद साधला. केंद्रीय मंत्री सोनोवाल यांनी संस्थेच्या आवारात असलेल्या बापू भवन मधील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

पुण्यातील आसामी नागरिकांनी यावेळी सोनोवाल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. आसामचे विख्यात गायक भारतरत्न दिवंगत भूपेन हजारिका यांच्या छायाचित्राला यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. आज हजारिका यांचा स्मृतिदिन असून त्यानिमित्त अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांनाही सोनोवाल यांनी हजेरी लावली.

***

MI/ST/PJ/PK

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1873926) Visitor Counter : 280


Read this release in: English