सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी सुविधा चोखपणे उपलब्ध करून द्याव्यात - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


चैत्यभूमी स्तूप आणि परिसराच्या विकासासाठी सीआरझेडच्या परवानगीसंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्र्याशी चर्चा करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

Posted On: 01 NOV 2022 5:07PM by PIB Mumbai

मुंबई, 1 नोव्हेंबर 2022

 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या मुंबईतील चैत्यभूमी येथील स्तूप आणि परिसराच्या विकासासाठी सीआरझेडच्या परवानगीसंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करू, असे आश्वासन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मुंबईत घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, त्यामुळे प्रशासनाने अनुयायांसाठी सर्व सोयी सुविधा चोखपणे उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सूचनाही आठवले यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की चैत्यभूमी हे पवित्र ठिकाण आहे. चैत्यभूमीवर कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था चोख असावी. अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे, मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी चांगल्या प्रकारे पूर्वतयारी करावी, असे ते म्हणाले. चैत्यभूमी येथील स्तुप मोठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे त्यांनी नमूद केले. या परिसराच्या सुशोभिकरणासाठी लोकप्रतिनिधींच्या सूचना व महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या सूचना लक्षात घेवून काम करावे. रेल्वेने येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे प्रशासनानेही सहकार्य करावे. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली असून, चैत्यभूमी परिसरात भारताचा राष्ट्रध्वज उभारावा. चैत्यभूमीवर उभारण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची अंमलबजावणी काटेकारपणे करावी अशा सूचना यावेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. आठवले यांनी यावेळी दिल्या.

 

S.Tupe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872735) Visitor Counter : 263


Read this release in: English