माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा: कामगार मंत्री सुरेश खाडे


राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेवर आधारित केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

Posted On: 31 OCT 2022 2:37PM by PIB Mumbai

मिरज, 31 ऑक्टोबर 2022

 

एक देश, एक ध्वज आणि एक संविधानाची हाक देणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी झटत आहेत. सरदार पटेल यांचे जीवन चरित्र सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे आणि अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून यासाठी खूप मदत होऊ शकेल, असे हे आगळे वेगळे प्रदर्शन आयोजित करणाऱ्या केंद्रीय संचार ब्युरोचे कौतुक करावे लागेल असे महाराष्ट्राचे कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले. 

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि मध्य रेल्वे पुणे मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या विभागस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन मिरज जंक्शन येथे संपन्न झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी मंत्री महोदयांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी केली तसेच टपाल विभाग, रेल्वे चाइल्ड हेल्पलाइन तसेच जिल्हा निवडणूक कार्यालय यांच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉल्सना भेट दिली. प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यानंतर खाडे यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतेची शपथ दिली. हे प्रदर्शन 2 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले आहे.

   

यावेळी विविध कलापथकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील माहिती मल्टीमीडिया माध्यमातून उपस्थितांना घेता येईल. भव्य कट आउट तसेच सेल्फी बूथ देखील प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार असलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनाची सर्वसामान्यांना दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती घेता यावी या उद्देशाने हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. एक भारत श्रेष्ठ भारत योजनेनुसार या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्राचे जोडीदार राज्य असलेल्या ओदिशा राज्याची माहिती चित्र तसेच व्हिडिओच्या माध्यमातून या प्रदर्शनामध्ये देण्यात आली आहे. 

नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी आणि इतर विद्यार्थ्यांनी या विभागस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांनी केले आहे.

 

* * *

PIB Kolhapur | M.Chopade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1872252) Visitor Counter : 143


Read this release in: English