रेल्वे मंत्रालय
रेल्वेच्या अखत्यारितील परिसरात स्वच्छता राखण्याची आणि कार्यालयीन प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्याची मध्य रेल्वेने दिली ग्वाही
Posted On:
28 OCT 2022 6:05PM by PIB Mumbai
मुंबई, 28 ऑक्टोबर 2022
भारत सरकारने 2 ऑक्टोबर 2022 पासून सुरू केलेल्या विशेष अभियान 2.0 अंतर्गत आजवर 646 स्वच्छता मोहिमांची अंमलबजावणी करून मध्य रेल्वेने हे अभियान राबविण्यात आघाडी घेतली आहे. रेल्वे स्थानके, रेल्वेच्या अखत्यारितील परिसर, रेल्वे रूळ, रेल्वेचे कारखाने, रेल्वेच्या वसाहती इत्यादी ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. तसेच, कार्यालयीन प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्याकडे लक्ष पुरविले आहे.
विशेष अभियान 2.0 चा उद्देश लक्षात घेऊन मध्य रेल्वेने 466 रेल्वे स्थानकांमध्ये स्वच्छता मोहिमा हाती घेतल्या आहेत. रेल्वे स्थानकांची यांत्रिक उपकरणाच्या सहाय्याने साफसफाई करताना रेल्वे गाड्या आणि स्थानकांमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.


या अभियानाअंतर्गत नियोजित ध्येयापेक्षा जास्त - 646 हून अधिक स्वच्छता मोहिमा मध्य रेल्वेने आजवर राबविल्या आहेत. या मोहिमांमध्ये रेल्वे स्थानके, कार्यालये, कारखाने, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहती आदींची साफसफाई करण्यात आली आहे. अभियानाचा भाग म्हणून इतरही काही उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रलंबित प्रकरणांवर ऑनलाईन माध्यमातून कार्यवाही करून ही प्रकरणे मार्गी लावण्यासाठी माहिती-तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली विकसित करण्याचा उपक्रमाचा त्यात समावेश आहे.
तसेच, जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाण्यांवर ‘रेल मदद पोर्टल’च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे. या पोर्टलमार्फत तक्रारींच्या निवारणाच्या सद्यस्थितीवर लक्ष ठेवणे शक्य आहे. विशेष अभियान 2.0 अद्याप सुरू असून स्वच्छता राखणे व कार्यालयीन प्रलंबित प्रकरणे निकालात काढण्यावर भर दिला जात आहे.
S.Kane/R.Bedekar/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1871624)
Visitor Counter : 193