नौवहन मंत्रालय
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते रोजगार भरती मेळाव्या अंतर्गत गोवा विभागातील पहिल्या तुकडीला नियुक्तीपत्रे प्रदान
रोजगार भरती मेळाव्यांतर्गत 75,000 नियुक्त्यांपैकी गोवा विभागातील 266 तरूणांना नियुक्तीपत्रे मिळाली
Posted On:
22 OCT 2022 3:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणाली द्वारे रोजगार मेळ्याला सुरूवात केली. विविध केंद्र सरकारी विभागांमध्ये 10 लाख नव्या उमेदवारांची भरती पुढील वर्षभरात करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजच्या समारंभात देशभरातील नवीन भरती झालेल्या 75,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी रोजगार भरती मेळ्यांतर्गत गोवा विभागातील पहिल्या तुकडीला नियुक्तीपत्रे प्रदान केली.
गोवा राज्यात 266 उमेदवारांना विविध सरकारी पदांवर नियुक्त्य़ा देण्यात आल्या असून 141 उमेदवार पणजीतील कार्यक्रमास उपस्थित होते. तर 25 जणांना केंद्रीय राज्यमंत्र्यांकडून त्यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली. 266 उमेदवारांपैकी 204 उमेदवारांची भरती ही भारत सरकारच्या टपाल खात्याने केली असून उर्वरित उमेदवारांची भरती विविध विभागांमध्ये करण्यात आली आहे.
या कार्यक्रमप्रसंगी बोलताना, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी ज्या उमेदवारांना आज नियुक्तीपत्रे मिळाली, त्या सर्व नवीन उमेदवारांचे अभिनंदन केले. नाईक यांनी केंद्र सरकारने विविध उपक्रमांद्वारे व्यावसायिकता आणि रोजगार निर्मितीची परिसंस्था कशी विकसित केली गेली, याचे विवेचन केले. ते म्हणाले की, या उपाययोजनेमुळे देशाची अर्थव्यवस्था आणि देशावरच अनेक पटींनी सकारात्मक परिणाम होणार आहे. सरकार कालबद्ध मर्यादेत 10 लाख रोजगार देण्याचे आपले उद्दिष्ट साध्य़ करण्यात यशस्वी होईल, असे आश्वासन देतानाच, नाईक यांनी एकूण परीक्षांची कमी केलेली संख्या, कागदपत्र पडताळणीची सुटसुटीत केलेली प्रक्रिया आणि भरती करताना तंत्रज्ञानाची घेतलेली मदत यामुळे देशात सरकारी पदभरती करताना एकंदर लागलेला वेळ कसा घटला आहे, हे स्पष्ट केले.
गोवा विभागाचे पोस्टमास्तर जनरल सय्यद रशिद यांनी तिकिट संग्रहसंबंधी आणि माय स्टँप्स या दोन विषयांवरील टपाल तिकीटे उपस्थित मान्यवरांना भेट दिली. मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी नवीन नियुक्त झालेल्यांचे अभिनंदन केले आणि नियुक्तीपत्रांनी त्यांचे आयुष्य देश दिवाळीत जसा उजळून निघतो, तसे उजळून जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवंटे यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि केंद्र सरकारच्या इतर विभागांमधील अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
***
S.Thakur/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1870237)
Visitor Counter : 176