संरक्षण मंत्रालय
सिकंदराबाद इथे 80 वा ईएमई कॉर्प्स दिवस साजरा
Posted On:
16 OCT 2022 6:35PM by PIB Mumbai
सिकंदराबाद, 16 ऑक्टोबर 2022
कॉर्प्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल इंजिनियर्स (ईएमई) अर्थात लष्कराच्या इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल अभियंता पथकानं सिकंदराबाद इथं काल 15 ऑक्टोबर 2022 रोजी आपला 80 वा कॉर्प्स दिवस साजरा केला. या दिवसानिमित्त हुतात्म्यांच्या स्मरणार्थ, कमांडंट, एम सी ई एम ई आणि कर्नल कमांडंट,कॉर्प्स ऑफ ईएमईचे, लेफ्टनंट जनरल जे. एस. सिदना, यांनी सिकंदराबाद इथल्या ईएमई युद्ध स्मारकात पुष्पचक्र अर्पण करुन, राष्ट्रासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाला, सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त अधिकारी, जेसीओ आणि ईएमईचे इतर अधिकारी, त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते. हुतात्म्यांचं शौर्य राष्ट्राच्या स्मरणात चिरंतन कोरलं जाईल, तसच त्यांचं धैर्य आणि शौर्य भविष्यातील पिढ्यांना राष्ट्राच्या प्रादेशिक अखंडत्व आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी काहीही झालं तरी प्रेरणा देत राहील, या प्रत्येक सैनिकानं आपल्या हुतात्मा बांधवांना दिलेल्या वचनाचं, हा सोहळा स्मरण करतो.
या समारंभानंतर विशेष सैनिक संमेलन झालं. या संमेलनात, लेफ्टनंट जनरल जे.एस. सिदना यांनी सर्व अधिकाऱ्यांना, आपलं सर्वोत्तम योगदान देण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आणि ‘कर्म ही धर्म’ (‘काम हीच पूजा’) हे कॉर्प्सच्ं ब्रीदवाक्य शब्दशः जगण्याचं आवाहन केलं. गेल्या आठ दशकांमध्ये, EME च्या कॉर्प्सनी, भारतीय सैन्याच्या शस्त्रास्त्र आणि इतर उपकरणांच्या संपूर्ण ताफ्याची देखभाल, तंत्रज्ञान आत्मसात करणं, आत्मनिर्भर भारत उपक्रमा अंतर्गत लष्करी साधनसामुग्रीचं स्वदेशीकरण (स्वदेशी बनावट), क्रीडा आणि साहस किंवा अशा इतर कोणत्याही क्षेत्रात, म्हणजे जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
कॉर्प्स डे दरवर्षी, ईएमईच्या कॉर्प्सचा म्हणजेच लष्करी अभियंत्यांच्या गौरवशाली इतिहास आणि पराक्रमाला उजाळा देण्यासाठी साजरा केला जातो आणि त्यातून सध्याच्या पिढीला प्रेरणा मिळते. MCEME मधील अशा सोहळ्यांमधून, सर्व श्रेणीच्या अधिकाऱ्यांमधला फक्त जोम, उत्साह आणि बंधुभावच दिसत नाही, तर कॉर्प्सना वैभवाच्या नवीन शिखरांवर आणि सर्वोत्कृष्टतेच्या उच्च शिखरांवर नेण्याचा ‘ईगल्स’ समूहाचा दृढसंकल्प देखील प्रतिबिंबित होतो.
R.Aghor/A.Save/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1868318)
Visitor Counter : 157