सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एमएसएमई क्षेत्रात विकास, वाढीव उत्पादन आणि निर्यातीसाठी, गुणवत्ता तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी उद्योग संघटनांनी पाठबळ द्यावे असे केंद्रीय एमएसएमई मंत्र्यांचे आवाहन


"देशाच्या विकासासाठी उद्योगांचा पाठिंबा महत्त्वाचा"

Posted On: 11 OCT 2022 5:33PM by PIB Mumbai

मुंबई, 11  ऑक्टोबर  2022

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रात विकास, वाढीव उत्पादन आणि निर्यातीसाठी, गुणवत्ता तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले. ते आज मुंबईत भारतीय औद्योगिक महासंघाने (सीआयआय) आयोजित केलेल्या एमएसएमई परिषद आणि प्रदर्शन 2022 मध्ये बोलत होते. सीआयआय सारख्या उद्योग संघटनांनी देशाच्या एमएसएमई क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. "उद्योग क्षेत्रातील सीआयआयची क्षमता आणि अनुभव लक्षात घेता, सीआयआयची मदत एमएसएमईच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी महत्त्वपूर्ण आहे", असे ते म्हणाले.

एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांची संख्या सुमारे 6 कोटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने एमएसएमई मंत्रालय या क्षेत्रातील उद्योजकता, उत्पादन, रोजगार आणि सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे ते एमएसएमई क्षेत्राविषयी बोलताना म्हणाले.

औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, मात्र देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न उद्योगांच्या सहकार्यानेच पूर्ण होऊ शकते. देशाच्या विकासासाठी उद्योगांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे, असे केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांनी सांगितले.

5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे  उद्दिष्ट साध्य करण्यासाठी  भारत सरकार सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला महत्त्व देत आहे, असे सीआयआयचे  पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुनील चोरडिया यांनी सांगितले. कमी गुंतवणूक, लवचिक कार्यान्वयन  आणि उत्तम  स्थानिक तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या मूलभूत गोष्टींच्या माध्यमातून सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राने भारताला नवीन उंचीवर नेले आहे, असे त्यांनी सांगितले.  सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग  हे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहेत आणि त्यांनी देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच, हे क्षेत्र देशातील ग्रामीण आणि अल्पविकसित क्षेत्रांच्या प्रगतीसाठी मदत करते, असे ते म्हणाले.

सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योगांना पर्यावरणीय शाश्वतता, वित्त पुरवठा , व्यवसाय सातत्य आणि निर्यातीसंदर्भातील  कठीण समस्या सोडवण्याच्या अनुषंगाने   मदत करण्यासाठी आणि  नवीन उपायांचा अवलंब करून या उद्योगांची  भरभराट करण्याच्या उद्देशाने सीआयआयने  (पश्चिम ) एमएसएमई  परिषद  आणि प्रदर्शन 2022 च्या 8 व्या पर्वाचे आयोजन केले आहे .

 

 S.Patil/Vinayak/Sonal C/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 


(Release ID: 1866868) Visitor Counter : 248


Read this release in: English