संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्र्यांनी उत्तराखंडमध्ये सशस्त्र दल आणि आयटीबीपीच्या जवानांसोबत साजरी केली विजयादशमी
प्रगतीसाठी आवश्यक सुरक्षित वातावरण पुरवल्याबद्दल राजनाथ सिंह यांनी सैनिकांचे केले कौतुक
उत्तराखंडमधल्या औली येथे संरक्षणमंत्र्यांनी केली शस्त्रपूजा
Posted On:
05 OCT 2022 7:28PM by PIB Mumbai
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज उत्तराखंडमधील औली येथे सशस्त्र दलाचे जवान आणि आयटीबीपीच्या (भारत-तिबेट सीमा पोलीस दल) जवानांसोबत विजयादशमी साजरी केली. आपल्या भेटीदरम्यान संरक्षणमंत्र्यांनी शस्त्रपूजन केले आणि देशाची सुरक्षा आणि आर्थिक प्रगती सुनिश्चित करण्यात सशस्त्र दल आणि निमलष्करी दल देत असलेल्या योगदानाचे कौतुक केले.
जवानांना उत्स्फूर्तपणे संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, सुरक्षा दलांमधल्या स्त्री-पुरुषांशी संवाद साधणे नेहमीच प्रेरणादायी असते. आपल्या जवानांच्या क्षमतेवर आणि देश सुरक्षित ठेवण्यासाठी ते देत असलेल्या योगदानाबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आणि विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. बाह्य धोक्यांपासून देशाला सुरक्षित ठेवण्यात सैन्य बजावत असलेल्या भूमिकेचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले. "या सुरक्षित वातावरणामुळे भारताला आर्थिक विकासासाठी काम करण्यास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीची नवीन शिखरे गाठण्यास सक्षम केले आहे," असे ते म्हणाले.
गलवानमधील घटनेदरम्यान आपल्या जवानांच्या अतुलनीय शौर्याचे आणि धैर्याचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले.भारत, "संपूर्ण जग एक कुटुंब आहे" या तत्त्वावर विश्वास ठेवणारा आहे परंतु बाह्यशक्तींनी वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला योग्य प्रत्युत्तर दिले जाते. अशा शौर्यामुळे संपूर्ण जगाने भारताच्या वाढत्या महत्त्वाची दखल घेतली आहे आणि महत्त्वाच्या सर्व आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर निर्णय घेणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक म्हणून भारत उदयास आला, असेही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे मत सन्मानाने ऐकले जाते, असे त्यांनी नमूद केले.
राजनाथ सिंह यांनी शस्त्रपूजेचे महत्त्व सांगितले आणि एकात्मितेवर भर देणाऱ्या भारतीय संस्कृतीच्या परंपरा आणि वैशिष्ठ्यांवर प्रकाश टाकला. आपले संरक्षण करण्यात साहाय्य करणाऱ्या शस्त्रांसह आपण आपल्या जीवनात योगदान देणाऱ्या सजीव आणि निर्जीव अशा सर्व गोष्टींप्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे, अशी शिकवण त्यातून मिळत असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
त्यानंतर विजयादशमी उत्साहात साजरी करणाऱ्या जवानांशी संरक्षणमंत्र्यांनी संवाद साधला आणि ते समारंभातही सहभागी झाले. यावेळी जवानांनी देशभक्तीपर गीते गायली.
यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, जीओसी-इन-सी सूर्य कमांड लेफ्टनंट जनरल योगेंद्र डिमरी, सशस्त्र दले आणि आयटीबीपीचे वरिष्ठ अधिकारी आणि जवान उपस्थित होते.
***
A.Chavan/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865406)
Visitor Counter : 209