नौवहन मंत्रालय
नौवहन महासंचालनालयाने साजरा केला 'जागतिक सागरी दिवस 2022'
“हरित नौवहनासाठी नवीन तंत्रज्ञान- वर्ष 2022 साठी आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने निवडली संकल्पना
आधुनिक तंत्रज्ञान हरित नौवहनाकडे वेगाने घेऊन जात असल्याचा नौवहन मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Posted On:
26 SEP 2022 10:12PM by PIB Mumbai
मुंबई, 26 सप्टेंबर 2022
‘जागतिक सागरी दिवस 2022' आज (सप्टेंबर 26, 2022) रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी नौवहन उद्योग क्षेत्रातील भागधारक, सरकारी अधिकारी, भारत आणि परदेशातील नाविक आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “हरित नौवहनासाठी नवीन तंत्रज्ञान” ही आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (IMO) 2022 या वर्षासाठी निवडलेली संकल्पना आहे.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष (AYUSH) मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आपल्या सदिच्छा संदेशात हा विश्वास व्यक्त केला की नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे आगमन सागरी परिसंस्थेत मोठ्या सुधारणा घेऊन येईल आणि आपल्याला हरित नौवहनाच्या दिशेने वेगाने प्रगती करायला मदत करील.
आयएमओचे सरचिटणीस, किटॅक लिम यांनी एका व्हिडीओ संदेशात म्हटले आहे की, हरित नौवहनासाठीचे नवीन तंत्रज्ञान नौवहनाची दिशा आणि अधिक शाश्वत भविष्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबाबतचा व्यापक संवाद खुला करते.
या संमेलनाला संबोधित करताना नौवहन महासंचालक आणि एनएमडीसीच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष अमिताभ कुमार यांनी जागतिक सागरी दिनाचे महत्व सांगितले आणि भारत सरकारने सागरी क्षेत्र, विशेषतः हरित नौवहन क्षेत्रातील भविष्यासाठी केलेल्या सुधारणांची माहिती दिली. सागरी भारत दृष्टीकोन-2030, राष्ट्रीय हायड्रोजन मिशन, जैवइंधनावरील राष्ट्रीय धोरण, जहाज मालकांना नवीन अथवा पर्यायी इंधन आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी नियामक व्यवस्था, QUAD देशांबरोबर हरित कॉरिडॉर, IMO-Norway Green Voyage 2050 सारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभाग या द्वारे हरित नौवहनाकडे सुरळीत संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी अभ्यासावर आधारित विविध भविष्यवादी धोरणे स्वीकारणे यासारख्या विविध घडामोडींचा त्यांनी उल्लेख केला. त्यांनी माहिती दिली की, IMO-Norway Green Voyage, 2050 प्रकल्पासाठी भारताची पायोनियर पायलट कंट्रीज (PPCs) म्हणून निवड करण्यात आली आहे आणि ग्रीन व्हॉयेज अंतर्गत ग्रीन शिपिंग प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवणारा पहिला देश म्हणूनही भारताची निवड करण्यात आली आहे.
* * *
PIB Mumbai | S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1862387)
Visitor Counter : 194