पर्यटन मंत्रालय
ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी इंडिया टुरिझम मुंबई आणि क्रोमा स्टोअर्स यांची हातमिळवणी
Posted On:
23 SEP 2022 5:58PM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे 16 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत "स्वच्छता पखवाडा" अर्थात स्वच्छता पंधरवडा साजरा केला जातो आहे. या स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून, पश्चिम आणि मध्य क्षेत्रासाठी पर्यटन मंत्रालयाचे प्रादेशिक कार्यालय, इंडिया टुरिझम मुंबई, भारतातील टाटा समूहातील प्रतिष्ठित ओम्नी-चॅनल इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर असणारे क्रोमा यांच्यासोबत हातमिळवणी करणार आहेत. क्रोमाच्या जुहू स्टोअरमध्ये उद्या (24 सप्टेंबर) दुपारी तीन वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
एकीकडे चांगल्या जीवनशैलीसाठी ग्राहक नवीन उत्पादनांच्या वापराला प्राधान्य देत असताना, इंडिया टुरिझम आणि क्रोमा यांनी जबाबदार वापराच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे ध्येय निर्धारित केले आहे. ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टाटा उद्योगाच्या क्रोमा स्टोअर्स आणि इंडिया टुरिझम मुंबई यांनी हातमिळवणी केली आहे. ई-कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने उचललेले हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे.
देशातील सर्वात जास्त वेगाने वाढणाऱ्या कचऱ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कचरा अर्थात ई-कचऱ्याचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सातत्याने प्रगती होत असून त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापरही खूप वाढतो आहे. नवनव्या वैशिष्ट्यांमुळे इलक्ट्रॉनिक उत्पादने वेगाने कालबाह्य होत आहेत. त्याचबरोबर सातत्याने अपग्रेड होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमुळे ग्राहकांना जुनी उत्पादने टाकून द्यावी लागत आहेत. परिणामी घनकचरा वर्गात मोठ्या प्रमाणात ई-कचरा जमा होतो आहे. अशा ई-कचऱ्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक कचरा टाकून देताना उद्भवणारी आव्हाने विचारात घेऊन हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून ई-कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. क्रोमा स्टोअर्समध्ये ठेवले जाणारे “ई-कचरा संकलन खोके” हे या मोहिमेचे ठळक वैशिष्ट्य आहे. "Help us keep India as Incredible as ever" या टॅगलाईनसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील पन्नास पेक्षा जास्त क्रोमा स्टोअर्समध्ये हे वैशिष्ट्यपूर्ण “ई-कचरा संकलन खोके” ठेवले जाणार आहेत.
अलिकडच्या काळात वापरातील उपकरणे अपग्रेड करण्याची आणि नवी उपकरणे खरेदी करण्याची लोकांची हौस वाढली आहे. दरवर्षी लोक नवीन आणि अद्ययावत उपकरणे विकत घेतात आणि जुनी फेकून देतात. हे चक्र कोणी थांबवू शकत नाही. पण मग वापरातून हद्दपार केलेल्या अशा वस्तुंचे काय केले जाते, हा प्रश्न उरतोच. या समस्येच्या निराकरणात हातभार लावता यावा, यासाठी इंडिया टुरिझम मुंबई आणि क्रोमा यांनी आपल्या ग्राहकांच्या जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची विल्हेवाट लावण्यासाठी ‘जस्टडिस्पोज’ सोबत भागिदारी केली आहे. ‘जस्टडिस्पोज’ हा ई-कचऱ्याची सुरक्षित आणि पर्यावरणपूरक विल्हेवाट लावण्यात तज्ञ असणारा उपक्रम आहे. ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी या वैशिष्ट्यपूर्ण खोक्यामध्ये जुनी उपकरणे टाकणाऱ्या ग्राहकांच्या नावे क्रोमातर्फे एक झाड लावले जाईल. हे ‘अतुल्य भारत ई-कचरा संकलन खोके’ भारतभरातील क्रोमा स्टोअरमध्ये एका वर्षासाठी ठेवले जाणार आहेत.
वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्याबरोबरच ग्राहकांना जबाबदारीने ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित स्वच्छता पंधरवड्यात इंडिया टुरिझम मुंबई आणि क्रोमा यांनी संयुक्तपणे हाती घेतलेल्या या उपक्रमाबाबत, इंडिया टुरिझम मुंबईचे प्रादेशिक संचालक श्री डी वेंकटेशन यांनी आनंद व्यक्त केला. ई-कचर्याची सुरक्षित विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या लोकांना आणि ग्रहाला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने जनजागृती करणारा हा उपक्रम आहे, असे ते म्हणाले.
वेगवेगळी अद्ययावत उपकरणे, हा आधुनिक भारतातील नागरिकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. हे लक्षात घेत, ई-कचऱ्याचे शाश्वत पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करत असल्याचे, क्रोमा-इन्फिनिटी रिटेल लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविजित मित्रा यांनी सांगितले. अशा प्रकारच्या शाश्वत ई-कचरा व्यवस्थापन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या ग्राहकांचे सहाय्य करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही ते म्हणाले.
स्रोत: इंडिया टुरिझम मुंबई
***
N.Chitale/M.Pange/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1861780)
Visitor Counter : 198