सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत देशातील 'असमाविष्ट क्षेत्रातील उद्योगां’च्या वार्षिक सर्वेक्षणाची तिसरी फेरी घेण्यात येणार

Posted On: 21 SEP 2022 9:03PM by PIB Mumbai

मुंबई, 21 सप्टेंबर 2022

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ)म्हणजेच पूर्वीचे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (एनएसएसओ) हे केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अखत्यारीतील अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र सर्वेक्षण कार्यालय आहे. या कार्यालयातर्फे येत्या 1 ऑक्टोबर 2022 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत असमाविष्ट  क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाची तिसरी फेरी घेण्यात येणार आहे.

असमाविष्ट  क्षेत्रातील उद्योगांच्या परिचालनविषयक आणि आर्थिक पैलूंविषयी माहिती संकलित करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश आहे. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उद्योगांची संख्या मोठी आहे तसेच या उद्योगांतून अकुशल/अर्धकुशल/कुशल व्यक्तींना मिळणाऱ्या रोजगाराचा आवाकादेखील मोठा आहे आणि त्याचबरोबर या उद्योगांचे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात  असणारे योगदान देखील लक्षणीय आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार करता सदर सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योगांसंदर्भातील नियोजन आणि धोरण निश्चितीसाठी त्यांच्याविषयीची विश्वसनीय आणि समग्र माहिती संकलित केलेली असणे गरजेचे आहे.

या सर्वेक्षणाची तपशीलवार माहिती देताना एनएसओच्या उपमहासंचालक सुप्रिया रॉय यांनी सांगितले की या फेरीत बिगर-शेती उत्पादन क्षेत्र, व्यापार तसेच सेवा क्षेत्रातील असमाविष्ट  आस्थापनांचे सर्वेक्षण केले जाणार आहे.  या सर्वेक्षणाच्या आधारावरून मिळविण्यात आलेली सांख्यिकी मानके नियोजन आणि धोरण निश्चितीसाठी आवश्यक आहेत. या सर्वेक्षणातून हाती आलेले निष्कर्ष सरकारला राष्ट्रीय लेख्यातील  महत्त्वाच्या घटकांची गणना करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या महाराष्ट्र (पश्चिम) विभागात कार्यरत क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणविषयक प्रशिक्षण देण्यासाठी मुंबईच्या प्रदेश कार्यालयाने 21 सप्टेंबर 2022 ते 23 सप्टेंबर 2022 अशा तीन दिवसांचे विभागीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले आहे. नवी मुंबईत सीबीडी बेलापूर येथील सीजीओ संकुलात असलेल्या विभागीय कार्यालयात हे प्रशिक्षण होत आहे. कार्यालयातील, सर्वेक्षणाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणे हा या शिबिराचा उद्देश आहे. हे प्रशिक्षण शिबीर आगामी सर्वेक्षणाशी संबंधित गुंतागुंतीच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी मंच देखील उपलब्ध करून देईल.

या विभागीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन एनएसओ (एफओडी अर्थात क्षेत्रीय परिचालन विभाग) मुंबई कार्यालयातील उपमहासंचालक सुप्रिया रॉय यांनी केले. एनएसओ (एफओडी) मुंबई कार्यालयातील सहाय्यक संचालक एस.जी.देवळीकर आणि एनएसओ (एफओडी)नागपूर कार्यालयातील सहाय्यक संचालक संतोष बोडा हे देखील या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहणार आहेत.

 एनएसओविषयी माहिती

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ)म्हणजेच पूर्वीचे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (एनएसएसओ) हे वर्ष 1950 पासून देशाच्या सेवेत कार्यरत आहे. देशव्यापी नमुना सर्वेक्षणातून विविध सामाजिक तसेच आर्थिक मानकांची माहिती देणारा सशक्त माहितीकोष विकसित करण्यात या कार्यालयाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कार्यालयाने सर्वेक्षणातून संकलित केलेली माहिती केंद्र सरकारला तसेच राज्य सरकारांना नियोजन आणि धोरण निश्चितीच्या कार्यासाठी उपयुक्त ठरणारी असते. गरिबी, किंमत निर्देशांक निश्चिती, विविध कार्यक्रमांचे घरगुती वापराच्या नमुन्यावर आणि पातळीवर होणारे परिणाम, व्यय, रोजगार-बेरोजगारीची परिस्थिती, कृषीक्षेत्रात कार्यरत नागरिकांचे राहणीमान, स्थलांतर, आरोग्य तसेच शिक्षणविषयक सेवांचा वापर, देशांतर्गत पर्यटन, इत्यादीसंदर्भात अंदाज बांधण्यासाठी भारतातील तसेच परदेशातील विविध संस्था एनएसएसच्या माहितीचा वापर करत असतात. असमाविष्ट निर्मिती  तसेच सेवा क्षेत्रातील आस्थापनांविषयी एनएसओने उपलब्ध करून दिलेली माहिती योजनाकार आणि धोरणकर्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरते.

 

 

S.Kulkarni/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1861322) Visitor Counter : 145


Read this release in: English