उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आत्मनिर्भर होण्याच्या भारताच्या मोहिमेत ‘बिनीच्या उद्योजकांची’ भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे : उपराष्ट्रपती


कृषी क्षेत्रातील विकासाला चालना देण्याच्या उद्योग क्षेत्राच्या विशेष जबाबदारीवर उपराष्ट्रपतींनी दिला भर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते एआयएमएच्या 49व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनाचे उद्‌घाटन

Posted On: 20 SEP 2022 4:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर 2022

आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने सुरु केलेल्या मोहिमेत देशातील प्रमुख व्यापार आणि उद्योगांनी सक्रीय भूमिका घ्यावी, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले आहे. एआयएमए अर्थात अखिल भारतीय व्यवस्थापन संघटनेच्या 49व्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनाचे आज नवी दिल्ली इथे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.   भारतीय उद्योगक्षेत्राची स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता यांच्यावर दृढविश्वास व्यक्त करत धनखड म्हणाले की, ‘नवे उद्योग, नवे रोजगार, नवनव्या प्रकारची निर्यात आणि विकासात्मक समस्यांवर नवे उपाय शोधून देशाच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या उद्योजक पिढीकडे भारत आशेने बघत आहे. उपराष्ट्रपतींनी कृषी क्षेत्राच्या दर्जात्मक उत्थानाला देखील चालना देण्याबाबत उद्योग क्षेत्रावर असलेल्या महत्त्वाच्या जबाबदारीवर भर दिला. भारतीय शेतकऱ्यांची प्रगती झाली तरच भारताची प्रगती होईल, असं ते म्हणाले.

मानवी कौशल्यात वाढ करण्यासाठी आणि ‘भारताच्या उद्योगांना आणि कार्यबळाला जागतिक दर्जाच्या पातळीवर नेण्यासाठी’ केंद्र सरकारने सुरु केलेल्या विविध उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत उपराष्ट्रपती धनखड यांनी कामगारवर्गाला अत्याधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन आणि अद्ययावत सुविधा पुरविण्याची जबाबदारी उद्योगांनी घ्यावी असे आवाहन केले.

‘भारतातील स्टार्ट-अप उद्योग क्षेत्र जगातील सर्वोत्तम स्टार्ट-अप क्षेत्र आहे’,अशी प्रशंसा करून उपराष्ट्रपतींनी देशाच्या लहान नगरांतून आणि ग्रामीण भागातून देखील आता डिजिटल क्षेत्रातील उद्योजक कशा प्रकारे उदयाला येत आहेत याबाबत निरीक्षण नोंदविले. ते पुढे म्हणाले की, भारताच्या समृद्ध मनुष्यबळाला आज जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळाले आहे आणि  जागतिक पटलावर भारताची अधिकाधिक आगेकूच करायची असेल तर या मनुष्यबळाचा अधिकाधिक वापर करून घेण्याची गरज आहे.

या दशकाच्या समाप्तीपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश जगातील पहिल्या तीन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्हावा यासाठी भारत प्रयत्नशील आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये सरकारतर्फे करण्यात आलेल्या  पद्धतशीर सुधारणांमुळे व्यापार करण्यातील सुलभतेत चांगलीच सुधारणा झाली आहे याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

जेव्हा प्रशासन व्यवस्थेमध्ये प्रत्येक पातळीवर पारदर्शकता आणि विश्वासार्हता दिसून येते तेव्हा लोकशाही आणि अर्थव्यवस्था यांची कशी भरभराट होते याबद्दल निरीक्षण नोंदवत उपराष्ट्रपतींनी भारताच्या भूतकाळातील समृध्दता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता यांच्यात आणखी सुधारणा व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.

उपराष्ट्रपतींनी या कार्यक्रमात भारतीय वित्त आयोगाचे माजी अध्यक्ष विजय केळकर, भारतीय महसूल सेवेतील अधिकारी रामन के.गर्ग तसेच एआयएमएचे माजी अध्यक्ष हर्षपती सिंघानिया यांना एआयएमएची फेलोशिप प्रदान केली. तसेच त्यांनी या अधिवेशनाच्या स्मरणपत्रिकेचे देखील अनावरण केले. देशातील उद्योग समुदायाला एकत्र आणण्यासाठी आणि विकास साधण्यासाठी भारताकडे असलेल्या क्षमतांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी एआयएमएने केलेल्या प्रयत्नांची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

एआयएमएचे अध्यक्ष सी.के.रंगनाथन, एआयएमएच्या महासंचालक रेखा सेठी, एआयएमएचे उपाध्यक्ष निखील सोहनी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

 

R.Aghor /S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1860873) Visitor Counter : 217


Read this release in: English , Tamil , Urdu , Hindi