आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था-नागपूर, सोमवार, 19 सप्टेंबर रोजी चौथा स्थापना दिवस साजरा करत आहे


“सर्वोत्कृष्टतेचा ध्यास हे ब्रीद जपत चार वर्षांत चांगली प्रगती साधली”

Posted On: 18 SEP 2022 10:31AM by PIB Mumbai

नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था  (AIIMS), सोमवार, 19 सप्टेंबर 2022 रोजी आपला चौथा वर्धापन दिन साजरा करणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी, उपस्थित असतील. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आणि एम्स नागपूरचे अध्यक्ष, प्राध्यापक डॉ पी.के.दवे, यांची समारंभ सोहळ्यासाठी उपस्थिती असणार आहे.

 'पॅशन फॉर एक्सलन्स' म्हणजेच सर्वोत्कृष्टतेचा ध्यास, हे ब्रीदवाक्य असलेल्या  एम्स नागपूर, या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेनं, आपल्या स्थापने नंतर 4 वर्षांत रुग्णसेवा, शिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रात चांगली प्रगती साधली आहे.  व्यापक विशेष रोग निदान सुविधांसह, विविध सुपर-स्पेशालिटी सेवाही आता इथे उपलब्ध आहेत.  संस्थेनं अलीकडेच, बर्न्स आणि प्लास्टिक सर्जरी विभाग, न्यूरोसर्जरी, हेमॅटोलॉजी, कार्डिओ-थोरॅसिक आणि व्हॅस्क्युलर सर्जरी (CTVS), सर्जिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, यूरोलॉजी आणि रिनल ट्रान्सप्लांटेशन, अशा विविध सुपर-स्पेशालिटी सेवांची भर घातली आहे,   कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, निओनॅटोलॉजी, पल्म्युनरी मेडिसिन आणि बालरोग शस्त्रक्रिया या विद्यमान सुपर-स्पेशालिटी विभागांच्या बाह्यरुग्ण आणि आंतररुग्ण सेवा पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत.  अत्याधुनिक असे प्रशस्त रुग्णकक्ष, जागतिक दर्जाची ऑपरेशन थिएटर्स आणि वैद्यकीय, सर्जिकल, बालरोग आणि नवजात शिशुंसाठीचा अतिदक्षता विभाग, यांनी परिपूर्ण असलेल्या  IPD म्हणजेच अंतर रुग्ण विभाग संकुलाची निर्मिती आणि कार्यान्वयनाची सुरुवात आता  अखेरच्या टप्प्यात आहे.  बाह्य रुग्ण सेवांव्यतिरिक्त, सर्व क्लिनिकल विभागांसाठी आंतररुग्ण सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. ही संस्था, प्रशंसनीय दर्जेदार रोग निदान आणि उपचार सुविधा, तसंच किचकट शस्त्रक्रियांसाठी ख्यातकीर्त आहे आणि या संस्थेमधून या सेवांचा लाभ घेतलेले किंवा घेत असलेले रुग्ण नेहमीच या बद्दल संस्थेचं कौतुक करत असतात.   संस्थेमध्ये विविध सरकारी वैद्यकीय योजना लागू झाल्यापासून, सुमारे 4 हजार लाभार्थींसह, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) आणि प्रधानमंत्री जन आरोग्य  योजनांच्या माध्यमातून हजारो रुग्णांनी कॅशलेस (रोख रक्कम विरहित) सुविधेचा लाभ घेतला आहे.

AIIMS नागपूरमध्ये नेफ्रोलॉजी (मूत्रपिंडशास्त्र) विभागाअंतर्गत एक  हेमोडायलिसिस सेवा (गेल्या 6 महिन्यांत 1426) प्रदान करणारं  डायलिसिस युनिट देखील आहे. तीव्र स्वरुपाचे किडनी म्हणजेच मूत्रपिंडाचे रोग आणि कोविड ग्रस्त रुग्णांसाठी हेमोडायलिसिस सेवा प्रदान करणार्‍या मोजक्या संस्थांपैकी ही एक संस्था आहे. गुडघा आणि खुबा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया, MJPJAY अंतर्गत मोफत श्रवण यंत्रांची तरतूद, त्वचाविज्ञान विभागांतर्गत फोटोथेरपी सेवा आणि मानसोपचार विभागांतर्गत मॉडिफाइड इलेक्ट्रो-कन्व्हल्सिव्ह थेरपी (MECT) यांसारख्या इतर नवीन सेवाही आता इथे उपलब्ध आहेत.  हाय एनर्जी लिनियर एक्सलरेटर इलेक्टा व्हर्सा एचडी, 4डी सीटी सिम्युलेटर सोमॅटम आरटी आणि सर्व कर्करोगांवर कमीत कमी खर्चात उपचार देऊ शकणारं एचडीआर ब्रेकीथेरपी फ्लेक्सिट्रॉन, अशा  अत्याधुनिक उपकरणांनी इथला रेडिओथेरपी विभाग सुसज्ज आहे.   कर्करोगासाठी पीईटी स्कॅन सुविधा आता न्यूक्लियर मेडिसिन विभागांतर्गत ऑगस्टच्या मध्यापासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.  रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या रक्ताची गरज स्वयंसिद्धतेनं भागवता येईल असं एक स्वतंत्र रक्त केंद्र देखील, संस्थेनं स्थापन केलं आहे.

विदर्भातील 53 प्राथमिक आरोग्य केंद्रं, 2 उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण विदर्भातील 11 ग्रामीण रुग्णालयांमध्ये ई-वैद्य एम्स नागपूर या अ‍ॅप्लिकेशनदवारे रुग्णांना रुग्णचिकित्सा सेवा तसेच ई-संजीवनी सेवा या टेलिमेडिसिन सेवा तज्ज्ञांद्वारे पुरवल्या जात आहेत.


अखिल भारतीय आयुर्विज्ञान विज्ञान संस्था, नागपूर विभागाच्या (AIIMS) शैक्षणिक कॅम्पसमधील पदवीपूर्व विद्यार्थ्यांची संख्या 50 वरून 125 विद्यार्थ्यांपर्यंत वाढली आहे. 16 विभागांमध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि 11 विभागांमध्ये पीएचडी कार्यक्रम सुरू केल्यामुळे भारतातील अनेक विद्यार्थ्यांना एम्स, या राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेशी संलग्न होऊन शिक्षणाची संधी मिळाली आहे. एम्स नागपूरने यावर्षी नर्सिंग कॉलेजमध्ये 40 नर्सिंग विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचला  प्रवेश देऊन बी. एस्सी. नर्सिंग प्रशिक्षण कार्यक्रमाला आरंभ केला आहे.

 

 संस्थेच्या चौथ्या स्थापना दिनाच्या समारंभात "अभिज्ञानम्" या अंकाचे प्रकाशनही केले जाईल. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात येणार आहे. एमबीबीएस या अभ्यासक्रमाचे  विद्यार्थी आशुतोष साहू यांना शरीरशास्त्रात (Anatomy) सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल "श्री विद्या दत्त सुवर्ण पदक" आणि पुस्तके पारितोषिक स्वरूपात दिली जातील. आदित्य गुप्ता आणि आशुतोष साहू यांना  "श्रीमती राम प्यारी दत्त सुवर्ण पदक" आणि फिजिओलॉजी मध्ये सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल पुस्तकांच्या स्वरूपात पारीतोषिक विभागून देण्यात येईल. आशुतोष साहू यांना पहिल्याच व्यावसायिक वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल "उमा मिश्रा सुवर्ण पदक" आणि श्री तुषार पवार यांना द्वितीय क्रमांकाचे "श्री. वृंदा प्रसाद मिश्रा पदक" प्रदान केले जाईल. तुषार बन्सल, शिवाली आणि प्रियांका यांच्यासह काही इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल पुरस्कार आणि रोख पारितोषिके दिली जातील.


 एम्स नागपूर विदर्भातील आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांसाठी वेळोवेळी रोगनिदान शिबिरे आयोजित करून रुग्ण शिक्षण आणि आरोग्य जागृती कार्यक्रम आयोजित करत असते. रुग्णालयाने कायकल्प मुल्यांकन कार्यक्रमात देखील सहभाग घेतला आहे आणि त्याला रुग्णालये आणि आरोग्य सेवा राष्ट्रीय संलग अधिकार मंडळाची (NABH) मान्यता मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.


 निद्रा प्रयोगशाळा, (स्लीप लॅब), नेत्रपेढीची स्थापना आणि अस्थिमज्जा आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांची सुरुवात करण्यासाठी पूर्वतयारीची सुरूवात झाली आहे. शवागाराच्या सुविधा सुरू करण्यात येणार असून त्याची सुरुवात वर्षअखेरीस लवकरच सुरू होईल.


अत्याधुनिक सुविधा आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे एम्स नागपूर मुळे खऱ्या अर्थाने वैद्यकीय पर्यटनाला चालना मिळेल.

*** 

S.Thakur/A.Save/S.Patgaonkar/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860340) Visitor Counter : 240


Read this release in: English