वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस हे भ्रष्टाचारमुक्त व आत्मनिर्भर भारताच्या उभारणीचे एक प्रभावी माध्यम; जास्तीत जास्त व्यावसायिकांनी त्याचा लाभ घ्यावा: अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू शर्मा
Posted On:
14 SEP 2022 4:11PM by PIB Mumbai
पुणे, 14 सप्टेंबर 2022
जेम अर्थात गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस यांच्यातर्फे आज पुण्यामध्ये ‘सेलर संवाद’ आयोजित करण्यात आला होता. भारतभरामध्ये 150 पेक्षा जास्त प्रमुख शहारामधून आजपासून पंधरा दिवसांची ही मोहीम सुरू होत आहे, त्याची सुरुवात आज पुण्यात झाली. ग्राहक असलेली सरकारी कार्यालये व विक्रेते यामधील दुवा म्हणून काम करणाऱ्या जेम द्वारे भारतभरातील विक्रेत्यांमध्ये जेम पोर्टलविषयी संपूर्ण माहिती मिळावी त्यांच्या अडचणींना उत्तर द्यावे, त्यांना अधिक कोणते लाभ मिळू शकतात याबद्दल माहिती द्यावी, सोबतच जेमने आत्तापर्यंत काय प्रगती केली आहे आणि जेम आणखी कोणकोणत्या सुविधा विक्रेत्यांना देऊ शकतात, याबद्दल एका सादरीकरणाद्वारे उपस्थित विक्रेत्यांना माहिती दिली गेली. अवघ्या सहा वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या जेम या ऑनलाईन आणि त्यामुळेच पारदर्शी ठरलेल्या पोर्टलच्या माध्यमातून आजघडीला सुमारे 3 लाख कोटी पेक्षा अधिक रकमेचा व्यापार होत असून आगामी काळात त्याचे प्रमाण आणखी वाढावे त्यासाठीच सेलर संवाद सारख्या या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. पुण्यातील 14 कंपनीच्या प्रतिनिधींनी या संवादामध्ये सहभाग नोंदवला. यामध्ये माय लॅब सारखी स्टार्ट अप कंपनी तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग कंपन्यांचा अधिक सहभाग होता.
या कार्यक्रमामध्ये जेम दिल्ली कार्यालयाच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू शर्मा तसेच संचालक अनुप धनविजय, अर्पित वाजपेयी, विक्रमजीत शर्मा, महाराष्ट्राचे व्यवसाय समन्वयक निखिल पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजू शर्मा यांनी माहिती देताना सांगितले, विक्रेत्यांना जागृत करण्यासाठी तसेच जेम पोर्टल वापरण्यासाठी सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित व शिक्षित करण्याच्या उद्देशाने 'सेलर संवाद' आयोजित केला जातो. कोविड परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षात असा संवाद होऊ शकला नव्हता. यंदा त्याची पुन्हा सुरुवात करत आहोत. महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर येथे असे संवाद कार्यक्रम आयोजित केले आहेत. सर्व राज्यातील अधिकाधिक विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. या माध्यमातून आम्ही त्यांच्या अडचणी सोडवू शकतो. त्यांना अधिक लाभ देऊ शकतो आणि नवीन सोयीसुविधांची माहितीदेखील देऊ शकतो. प्रत्यक्ष संवादामुळे हे सर्व काम अधिक व्यवस्थित होऊ शकते, असा आमचा अनुभव आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जेमविषयी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, जेम हे एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळण्याचे ठिकाण आहे. सर्वसामावेशक पोर्टल आहे, ज्यामध्ये महिला, पुरुष, तृतीयपंथी, दिव्यांग असे सर्व लोक सहभागी होऊ शकतात; तसेच या पोर्टलवर सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने चालवला जातो. केंद्र राज्य सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्ये जेमद्वारे खरेदी केली जाते. सरकारी कार्यालयांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या गोष्टी जेमद्वारे विक्रेते सहज देऊ शकतात. खूप विविध पद्धतीच्या वस्तू येथे उपलब्ध असून छोट्या गावांपासून मोठ्या शहरांपर्यंतचे सर्व विक्रेते यामध्ये सहभागी होऊ शकतात. छोट्या पेनापासून हेलिकॉप्टरपर्यंतच्या गोष्टी या पोर्टलवर उपलब्ध आहेत. जेमतर्फे आम्ही आणखी सुधारित तसेच देशातील सर्व भाषांमध्ये जनजागृती व्हिडिओ, जेमविषयी माहिती देणारे प्रचार साहित्य तयार करत आहोत. प्रत्येक शुक्रवारी हे व्हिडिओ वेबसाईट अर्थात संकेतस्थळावर टाकले जातात. राज्यस्तरीय संपर्क कार्यालयाद्वारे सुद्धा आम्ही ग्राहक आणि विक्रेते यांच्या संपर्कात आहोत. ज्यांच्याकडे इंटरनेटची सोय नाही, जेमविषयी माहिती नाही, त्या लोकांसाठी जेमने देशात ठिकठिकाणी उपलब्ध असलेल्या माहिती सेवा केंद्रांशी सामंजस्य करार केलेला आहे. दुर्गम भागातील लोकांसह, सर्वांना स्थानिक भाषेमध्ये या केंद्रात जेमवर नोंदणी करण्यासाठी मदत मिळू शकते, अशी माहिती मंजू शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माय लॅब या पुणे स्थित स्टार्टअपचे प्रतिनिधी उपस्थित होते. 2018 मध्ये जेम पोर्टलवर नोंदणी केल्यापासून कंपनीने 300 कोटींचा व्यवसाय मिळवला आहे इतर कुठल्याही ई-कॉमर्स पोर्टलपेक्षा जेमची प्रगती खूप मोठी आहे. सर्व स्तरातील विक्रेते एका मंचावर असलेले हे केवळ एक वाणिज्य पोर्टल नसून सामाजिक मंच आहे. ई-सहाय ही सर्वात आवडती सुविधा असल्याचे त्यांनी नमूद केले. पुण्यातीलच दीड वर्षांपूर्वी जेमवर दाखल झालेला श्री महावीर स्टेशनर्सच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, एका पेनापासून आम्ही सुरुवात केली आणि दीड वर्षातच आम्ही दीडशे ऑर्डर्स पूर्ण केलेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही ही सेवा देऊ शकत आहोत. पुण्याच्या स्वारगेट येथील मिलक्स कंट्रोल गिअर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका मानसी बिडकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले. जेमसोबत आमचा अनुभव खूप चांगला आहे. कार्यालयीन पातळीवर देखील आम्हाला चांगली मदत झालेली आहे. ऑर्डर्सकरिता एसएमएस, ई-मेल यासारख्या छोट्या, पण महत्त्वाच्या सुविधांमुळे खूप मोठे काम होते. आतापर्यंत आम्हाला जेमवर काम करताना कुठलीही अडचण आली नाही. आर्थिक बाबतीतही आम्हाला कधीही त्रास झाला नाही. आपल्या ऑफिसमध्ये बसूनच आम्ही भारतभरातल्या गव्हर्मेंट सरकारी ऑर्डर्स घेऊ शकतो. 'सेलर संवाद' सारख्या कार्यक्रमांमधून अधिक माहिती मिळवून आम्ही आमचा व्यवसाय वाढवू शकतो, असा आत्मविश्वास आला आहे, असे त्यांनी सांगितले.
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
PIB Pune/S.Kulkarni /S.Pophale/P.Malandkar
(Release ID: 1859197)
Visitor Counter : 292