कृषी मंत्रालय
रब्बी हंगाम 2022-23 साठी राष्ट्रीय कृषी परिषदेचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले उद्घाटन
Posted On:
07 SEP 2022 8:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2022
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज नवी दिल्ली येथे 2022-23 च्या रब्बी मोहिमेसाठी कृषी विषयक राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.
चौथ्या अग्रीम अंदाजानुसार (2021-22),देशात 3157 लाख टन अन्नधान्याचे उत्पादन अपेक्षित आहे जे 2020-21 मधील अन्नधान्याच्या उत्पादनापेक्षा 50 लाख टन अधिक आहे. 2021-22 मध्ये एकूण डाळी आणि तेलबियांचे विक्रमी उत्पादन अनुक्रमे 277 आणि 377 लाख टन इतके असल्याचा अंदाज आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रितपणे कृषी क्षेत्रात आपली जबाबदारी पार पाडत आहेत. उत्पादनाच्या बाबतीत देशात बरेच काम झाले आहे, त्यामुळे अन्नधान्य, डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. आज कृषी क्षेत्रापुढील आव्हाने हाताळणे आणि त्यांचे निराकरण करणे हे प्राधान्य आहे, असे तोमर यांनी पुढे सांगितले.
या संदर्भात त्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा उल्लेख केला. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी नुकसानभरपाई म्हणून 1.22 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या कक्षेत आणले पाहिजे. यामुळे विशेषतः लहान शेतकऱ्यांना सुरक्षित वाटेल, असे तोमर पुढे म्हणाले. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होत आहे, त्यामुळे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर नैसर्गिक शेतीवरही आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार कृषी क्षेत्राला पुढे नेत आहे. कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातूनही त्याचा विस्तार करण्यात येत आहे. राज्य सरकारांनीही या दिशेने अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मोहरी उत्पादन मोहिमेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दोन वर्षात मिळालेल्या यशाबद्दल मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले. मोहरीचे उत्पादन गेल्या दोन वर्षात 91.24 वरून 29% ने वाढून 117.46 लाख टन झाले आहे. उत्पादकता 1331 वरून 1458 kg/h वर 10% वाढली. रेपसीड आणि मोहरीचे क्षेत्र 2019-20 मध्ये 68.56 वरून 17% वाढून 2021-22 मध्ये 80.58 लाख हेक्टर झाले आहे. या कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांनी शेतकरी आणि राज्य सरकारांचे कौतुक केले. वाढलेल्या मोहरी उत्पादनामुळे पाम आणि सूर्यफूल तेलाच्या आयातीची तफावत भरून निघण्यास मदत होईल. सरकार आता मोहरी मिशनच्या धर्तीवर विशेष सोयाबीन आणि सूर्यफूल मिशन राबवत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळावा यासाठी केंद्र सरकारने शेतकरी आणि सरकारमधील दरी कमी करण्यासाठी डिजिटल शेतीचे काम सुरू केले आहे. डिजिटल कृषी मिशनवरही एकत्र काम करण्याची गरज आहे. पंतप्रधानांच्या प्रयत्नाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाईल, असेही ते म्हणाले. संपूर्ण जगात भारत या कार्यक्रमाचे नेतृत्व करणार आहे. भरड धान्याचे उत्पादन व निर्यात वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांनी राज्यांमध्ये पौष्टिक तृणधान्यांचा प्रचार करण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. यावेळी कृषीमंत्र्यांच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
2022-23 या वर्षासाठी एकूण अन्नधान्य उत्पादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट 3280 लाख टन ठेवण्यात आले असून त्यात रब्बी हंगामाचा वाटा 1648 लाख टन असेल. आंतरपीक, पीक वैविध्य आणि अधिक उत्पादन देणार्या जाती (HYVs), कमी उत्पादन देणाऱ्या प्रदेशात योग्य कृषी पद्धतींचा अवलंब, जमिनातील ओलावा, लवकर पेरणी आणि रब्बी पिकांसाठी संजीवनी सिंचनाचा वापर करून क्षेत्र वाढवणे, पीक विविधीकरण आणि उत्पादकता वाढवणे याद्वारे क्षेत्र वाढवणे ही धोरणे राबविली जातील असेही तोमर यांनी सांगितले.
G.Chippalkatti /P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1857630)
Visitor Counter : 232