अर्थ मंत्रालय
156 वी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक आज औरंगाबाद येथे संपन्न
तीन जनसुरक्षा योजनांतर्गत सर्व पात्र खातेदारांची व्याप्ती वाढवण्याबद्दल झालेल्या प्रगतीबद्दल बँकर्सनी केली चर्चा
Posted On:
05 SEP 2022 10:25PM by PIB Mumbai
औरंगाबाद, 5 सप्टेंबर 2022
केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत आज औरंगाबाद येथे राज्यस्तरीय बँकर्स समितीची 156 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत, वार्षिक कर्ज योजना(ACP), विविध आर्थिक समावेशक योजना, पीक कर्ज वाटप, किसन क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायातील लाभार्थ्यांची परिपूर्णता मोहीम, जून 2022 ला संपलेल्या तिमाहीत प्राधान्य क्षेत्रात कर्ज देण्याच्या उपलब्धींचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय बैठकीदरम्यान पंतप्रधानांच्या प्रमुख योजना, वार्षिक कर्ज योजनेंतर्गत उपलब्धी, नवीन शाखा उघडणे अशा अनेक बाबींच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. मराठवाडा विभागात बँकिंग सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्यामुळे आणि या विभागात बँकांच्या शाखांचे जाळे अधिक पसरवणे आवश्यक असल्यामुळे मराठवाडा विभागात नवीन शाखा उघडण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. योग्य विचारविनिमयानंतर, विविध सरकार अनुदानित योजना तळागाळात रुजवण्यासाठी बँकांनी मराठवाडा विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाखा उघडण्याचे आश्वासन दिले.
नेहमी चर्चेसाठी येणाऱ्या पीक कर्ज वितरण, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसाठी दिल्या जाणारे कर्ज या मुद्यांसह प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), प्रधानमंत्री मुद्रा योजना(PMMY), स्टँड अप इंडिया, बचत गट(SHG), पर्यायी गुंतवणूक निधी (AIF), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना, (PMFME) पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय करणार्या शेतकर्यांची कृष्णा किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत परिपूर्णता, परवडणार्या घरांसाठी कर्ज पुरवठा, सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत दाव्यांची स्थिती यासारख्या आत्मनिर्भर भारत आर्थिक मदत आणि सरकार अनुदानित योजनांच्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या भाषणादरम्यान, 2 ऑक्टोबर, 2021 पासून सुरू झालेल्या परिपूर्णता मोहिमेचा भाग म्हणून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सर्व पात्र खातेधारकांना तीन जन सुरक्षा योजना (PMJJBY, PMSBY आणि APY) अंतर्गत कव्हरेज दिले जाईल अशी घोषणा केली होती. या दिशेने झालेल्या प्रगतीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला आणि बँकांना 30 सप्टेंबर 2024 च्या नियोजित तारखेपूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कार्यसूचीनुसार, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक तसेच महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समिती बैठकीचे संयोजक विजय कांबळे यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समितीचे सहाय्यक महाव्यवस्थापक भारत बर्वे यांनी आभार मानले.
या बैठकीला महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव आणि वित्तीय सेवा विभागाचे संचालक सुशील कुमार सिंह उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी देखील बैठकीत सहभागी झाले होते.
* * *
PIB Mumbai | R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1856955)
Visitor Counter : 163