संरक्षण मंत्रालय

1965 च्या युद्धात सहभागी झालेल्या महार रेजिमेंटच्या 9व्या बटालियनच्या शूर सैनिकांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ महार रेजिमेंटच्या ज्येष्ठ सैनिकांकडून भव्य समारंभाचे आयोजन

Posted On: 04 SEP 2022 7:39PM by PIB Mumbai

 

पुण्यातील महार रेजिमेंटच्या ज्येष्ठ सैनिकांनी 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान 03 सप्टेंबर रोजी महार रेजिमेंटच्या नवव्या बटालियनच्या शूर सैनिकांच्या शौर्य आणि पराक्रमाच्या सन्मानार्थ एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. याच दिवशी नऊ महार रेजिमेंटचे तत्कालीन कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल डीएन सिंग (नंतरचे ब्रिगेडियर) यांच्या नेतृत्वाखाली बटालियनने ऑपरेशन रिडल अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या अखनूर क्षेत्रातील ट्रोटीच्या जोखीम भरल्या युद्धभूमीवर  मातृभूमीचा यशस्वीपणे बचाव केला.

महार रेजिमेंटचे 9व्या बटालियनची 01 ऑक्टोबर 1962 रोजी सौगोर येथे एमएमजी बटालियन म्हणून स्थापना झाली. स्थापनेच्या एका वर्षानंतर, बटालियनचे इन्फंट्री बटालियनमध्ये रूपांतर करण्यात आले. या रूपांतरणामध्ये शस्त्रे, उपकरणे, प्रशिक्षण, संघटना आणि बटालियनच्या मूलभूत कार्यामधील   बदल समाविष्ट होते.

जून 1965 मध्ये, स्थापनेच्या अवघ्या तीन वर्षांत नऊ महार रेजिमेंटला जम्मू आणि काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये तैनात करण्यात आले. युद्धाच्या चकमकी सुरू झाल्यावर, बटालियनची रात्रभरात 41 माउंटन ब्रिगेडच्या अंतर्गत जौरियन, अखनूर येथे रवानगी करण्यात आली आणि मुख्य छांब-जौरियन मार्गावर वर्चस्व असलेल्या ट्रोटी भूभागाचे रक्षण करण्याचे आदेश देण्यात आले. 1/2 सप्टेंबर 1965 च्या मध्यरात्री ट्रोटीला पोहोचल्यावर, दुसऱ्या दिवशी सकाळी शत्रूकडून जोरदार हवाई हल्ल्यांना सामोरे जावे लागले तेव्हा बटालियनला बचावासाठी केवळ चार तास मिळाले. 3 सप्टेंबर 1965 रोजी, सकाळी सात वाजल्यापासून पाकिस्तानने हवाई दल, तोफखाना आणि नंतर रात्री पॅटन टँकच्या रेजिमेंटच्या सहाय्याने मोठ्या सैन्यासह शूर नऊ महार सैन्यावर हल्ला करून ट्रोटी ताब्यात घेण्यासाठी सर्व शक्ती वापरली.

लेफ्टनंट कर्नल डीएन सिंग आणि मेजर एस व्ही साठे आणि मेजर विक्रम चव्हाण यांसारख्या अधिका-यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखालील बटालियनने शत्रूच्या गोळीबाराचा सामना करून, प्रत्यक्ष लढाईत अग्रेसर होऊन आणि भूमिगत राहून हल्ल्याचा बिमोड केला. नऊ महार बटालियन दृढतेने उभी राहिली आणि त्यांनी शत्रूला एक इंचही ताबा दिला नाही. सलग तीन रात्री चाललेल्या या भयंकर युद्धात, सतरा शूर जवानांनी बलिदान दिले आणि युनिटला प्रतिष्ठित युद्ध सन्मान "जौरियन कलित" आणि "थिएटर ऑनर जम्मू आणि काश्मीर" मिळवून देण्यात मदत केली.

प्रतिकूल परिस्थितीतील या युद्धातील धाडसी नेतृत्वाचे उदाहरण असलेल्या मेजर एस व्ही साठे आणि लेफ्टनंट कर्नल विक्रम चव्हाण या दोन युद्धवीरांना सन्मानित करण्यासाठी मेजर जनरल पी शेर्लेकर आणि ब्रिगेडियर अरुण अधिकारी हे दोन्ही महार रेजिमेंटचे प्रतिष्ठित आणि आदरणीय ज्येष्ठ सैनिक यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, महार रेजिमेंटचे कर्नल लेफ्टनंट जनरल बन्सी पूनप्पा यांनी बटालियनसाठी एक सामाजिक व्हिडिओ संदेश देखील जारी केला आणि 'जौरियन कलित' च्या लढाईत महार रेजिमेंट आणि त्यांच्या सैनिकांच्या उत्तुंग कामगिरीचा गौरव केला.

***

G.Chippalkatti/V.Joshi/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1856683) Visitor Counter : 187


Read this release in: English