रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

सार्वजनिक वाहतुकीकडे नागरिकांना वळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आवश्यकता- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


बेस्ट प्रशासनाने नरिमन पाँईंट येथे पाण्यावर आणि हवेत चालणाऱ्या डबलडेकर बससंदर्भात विकास आराखडा तयार करण्याची नितीन गडकरी यांची सूचना

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BES & T) च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संबोधन

Posted On: 18 AUG 2022 9:25PM by PIB Mumbai

मुंबई, 18 ऑगस्‍ट 2022

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम (BES & T) च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमाला आज संबोधित केले.

याप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला, त्यावेळेसच बेस्टचा अमृत महोत्सव साजरा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री या नात्याने प्रदूषणमुक्त वाहनांना माझे प्राधान्य आहे. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक वाहतुकीचा खर्च खूप कमी आहे. केंद्र सरकार 5 हजार इलेक्ट्रॉनिक बस घेत आहे, यामुळे प्रदुषणाबरोबरच खर्च कमी होणार आहे.

जास्तीत जास्त नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळवावे यासाठी आता अत्याधुनिक पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तिकीटांचे डिजीटलीकरण करण्यासाठी ​अ‍ॅप​​ वापरासाठी केंद्राकडून 70 टक्के अनुदान मिळते, त्यामुळे लवकरच सर्व कारभार डिजीटल करावा, असे गडकरी यांनी बेस्ट प्रशासनाला आवाहन केले.

मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बहुमजली पूल उभारण्याचा प्रस्ताव नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवला आहे. यामुळे वाहनांना नरिमन पाँईंट (मुंबई) ते दिल्ली महामार्गाने 12 तासाचा प्रवास होणार. यासाठी राज्य सरकारचे सहकार्य हवे, असे गडकरी म्हणाले.

नवी मुंबई विमानतळाला जोडण्यासाठी वॉटर टॅक्सी सुरु केल्या तर अवघ्या 17 मिनिटांत पोहचता येईल आणि प्रदुषण कमी होईल. हा प्रकल्प बेस्टने आपल्या हातात घेतला तर 100 सीटर फास्ट स्पीड बोट केली तर लाभ होईल.  

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय लवकरच कायदा करुन गाड्यांचे हॉर्न भारतीय वाद्य तबला, बासरी, हार्मोनिअम अशाप्रकाराचे आवाज गाड्यांच्या हॉर्नमध्ये असतील.

बेस्टच्या सर्व बसेस लवकरच इलेक्ट्रीक करा, त्यामुळे तुमचा तोटा लवकर भरुन निघेल, अशी गडकरी यांची बेस्टला सूचना. हायड्रोजनचा वापर करण्यावर सरकारने विचार करावा. फ्लेक्स इंजिन गाड्यांना सुरुवात झाली आहे. तसेच इथेनॉलवरील गाडी पुढच्या आठवड्यात लाँच केली जाणार आहे. या गाड्यांची निर्मिती महाराष्ट्रात सर्वात जास्त होत आहे. मुंबईतील टॅक्सी आणि अटोरिक्षा इलेक्ट्रॉनिक किंवा फ्लेक्स इंजिनवर आल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. पेट्रोलवरील खर्च कमी होऊन यामुळे आर्थिक लाभही मिळेल.

इलेक्ट्रीक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायोसीएनजी आणि ग्रीन हायड्रोजन याकरिता महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, असे गडकरी म्हणाले.

रोपवे, केबल कार, फेनाक्युलर रेल्वेसाठी महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवावेत. देशभर अशा 165 योजना याअंतर्गत मंजूर केल्या आहेत. मुंबई येथे नरिमन पॉईंटवरुन रोपवे पीलर टाकून पाण्यावर आणि हवेत चालणारी डबलडेकर बस फिलीपाईन्समध्ये चालते, तशी मुंबईत सुरु करता येईल. यासंदर्भात बेस्टला विकास आराखडा (डिपीआर) तयार करण्याबाबत गडकरी यांची राज्य सरकारला सूचना. बेस्टच्या वाहतुकीने आतापर्यंत देशाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. येणाऱ्या काळातही बेस्टचे काम आणखी अत्याधुनिक होऊन विस्तारेल अशी आशा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.  

बेस्टच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांचे संबोधन:


* * *

PIB Mumbai | S.Thakur/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1853000) Visitor Counter : 181


Read this release in: English