शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात पोलाद उत्पादनाचे अभिनव पद्धतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी आयआयटी मुंबई आणि जेएसडब्ल्यू उद्योग समूह यांच्यात भागीदारी करार

Posted On: 18 AUG 2022 7:45PM by PIB Mumbai

मुंबई, 18 ऑगस्‍ट 2022

 
भारतात पोलाद उत्पादनाचे अभिनव पद्धतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र उभारण्यासाठी आयआयटी मुंबई आणि जेएसडब्ल्यू उद्योग समूह यांच्यात भागीदारी करार करण्यात आला आहे.

केंद्रीय पोलाद मंत्रालय तसेच उद्योगक्षेत्रातील इतर भागीदार यांच्या सहकार्याने आयआयटी, म्हणजेच भारतीय तंत्रज्ञान संस्था या मुंबईच्या नामांकित शिक्षण संस्थेने सीओईएसटी अर्थात पोलाद तंत्रज्ञानाचे उत्कृष्टता केंद्र स्थापन केले आहे. कार्बन उत्सर्जनाची पातळी  विहित मर्यादे अंतर्गत राखतानाच दर्जेदार पोलाद उत्पादन प्रकियेचा वेगाने विस्तार करण्याच्या महत्त्वाच्या उद्दिष्टासह या उत्कृष्टता केंद्राच्या अखत्यारीत जेएसडब्ल्यू तंत्रज्ञान केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. आयआयटी मुंबई या संस्थेशी केलेल्या भागीदारीमुळे जेएसडब्ल्यू समूहाला भारतीय उद्योग जगतासाठी पोलाद तंत्रज्ञान क्षेत्रात स्पर्धात्मक क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात संशोधन आणि विकास विषयक उपक्रम हाती घेऊन त्यांच्या कार्याचा वेग वाढविणे शक्य होणार आहे. जेएसडब्ल्यू तंत्रज्ञान केंद्र हा जेएसडब्ल्यू उद्योगसमूहाच्या पोलाद क्षेत्राव्यतिरिक्त होणाऱ्या संशोधनविषयक उपक्रमांसाठी नोडल बिंदू ठरणार आहे.

आयआयटी मुंबई या संस्थेचे संचालक प्रा.शुभाशिष चौधरी यांनी सांगितले की, “आमच्या सीओईएसटी केंद्राकडे जागतिक पातळीवर आघाडीचे क्षेत्र म्हणून घडविण्याच्या दिशेने  भारतीय पोलाद क्षेत्राला अधिकाधिक मदत करण्याचे  उद्दिष्ट आहे. जेएसडब्ल्यू उद्योगसमूहासोबत झालेला हा करार या दिशेने सुरु असलेल्या आमच्या प्रयत्नांना अधिक बळकटी देईल. या भागीदारी कराराच्या माध्यमातून, कार्बन उत्सर्जनाची पातळी विहित मर्यादेच्या आत राखून भारताला त्याचे शाश्वतता ध्येय गाठण्याची क्षमता प्राप्त करून देण्यासोबतच दर्जेदार पोलाद उत्पादन प्रक्रिया अधिक वेगवान करणे हे आमचे ध्येय आहे.”

आयआयटी मुंबई आणि जेएसडब्ल्यू उद्योग समूह यांच्यात झालेल्या करारानुसार खालील बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत:

  • पोलाद निर्मिती आणि त्याच्या वापराच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि विकासविषयक उपक्रम हाती घेण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी युक्त जेएसडब्ल्यू तंत्रज्ञान केंद्र स्थापन करून त्याची उभारणी करण्यासाठी आवश्यक आर्थिक तसेच तंत्रज्ञानविषयक पाठींबा जेएसडब्ल्यू उद्योगसमूहाकडून देण्यात येईल. जेएसडब्ल्यू कंपनीच्या एफई550डी दर्जाच्या 8 मिलीमीटर ते 36 मिलीमीटर या श्रेणीत व्यास असलेल्या निओस्टील रेबार्सचा वापर करून हे केंद्र उभारण्यात येईल. आयआयटी मुंबई या संस्थेने आर्थिक वर्ष 2028 पर्यंत या जेएसडब्ल्यू तंत्रज्ञान केंद्राची उभारणी करावी असे अपेक्षित आहे.
  • यांनी संयुक्तपणे पोलाद निर्मिती आणि त्याचे उपयोग यांच्या विविध पैलूंच्या संदर्भात आंतर-शाखीय संशोधन प्रकल्प आणि तंत्रज्ञान उपक्रम यासाठी आयआयटी मुंबई आणि जेएसडब्ल्यू समूह, जेएसडब्ल्यू तंत्रज्ञान केंद्राशी सांगड घालतील.
  • तंत्रज्ञान क्षेत्रातील या भागीदारीने आयआयटी मुंबई आणि जेएसडब्ल्यू यांना पेटंट असलेल्या औद्योगिक प्रणाली आणि साधने विकसित करण्यासाठी संशोधन तसेच प्रशिक्षण प्रकल्प हाती घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. भविष्यात या औद्योगिक प्रणाली कार्यान्वित करण्याच्या तसेच त्यांचे व्यावसायिकीकरण करण्याच्या बाबतीत जेएसडब्ल्यू निर्णय घेऊ शकेल.
  • यासाठी आयआयटी, मुंबई आणि जेएसडब्ल्यू पोलाद उद्योग यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेली संयुक्त सुकाणू समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती या दोन्ही संस्थांच्या दरम्यान असलेल्या तंत्रज्ञानविषयक सहयोगी संबंधांना योग्य दिशादर्शन करेल.
  • पोलाद उत्पादनासंदर्भातील नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात लक्ष्यीत प्रशिक्षण आणि संशोधन शक्य व्हावे म्हणून आयआयटी मुंबई या संस्थेत सज्जन जिंदाल अध्यासन देखील स्थापन करण्यात आले आहे. संशोधनात सतत प्रगती करून, उद्योगक्षेत्र, समाज तसेच सरकार यांच्या अनुप्रयोग-आधारित मागण्या पूर्ण करण्यासाठी हे अध्यासन आयआयटी मुंबई या संस्थेला आंतर-शाखीय, सहयोगात्मक, समन्वयक आणि अनुवादात्मक दृष्टीकोन स्वीकारण्यासाठी मदत करेल. सध्या उपलब्ध ज्ञानाचा लाभ करून देणे आणि यापुढील अभिनव संशोधन तसेच प्रमाण यांच्यासाठी मंच पुरविणे यासंदर्भात हे अध्यासन काम करेल.


* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1852973) Visitor Counter : 167


Read this release in: English