सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईत ‘तिरंगा यात्रा’

Posted On: 16 AUG 2022 6:14PM by PIB Mumbai

मुंबई  - दि. 17 ऑगस्ट]  2022


देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी मुंबईतल्या खादी आणि कुटिरोद्योग कार्यालयाच्या प्रांगणामध्ये राष्ट्रध्वज फडकवला.
 


याप्रसंगी आयोजित कार्यक्रमामध्ये प्रमुख भाषण करताना मनोज कुमार म्हणाले, अमृत महोत्सव देशवासियांना एका धाग्यामध्ये जोडून देशभक्तीची भावना आणखी दृढ करेल. महात्मा गांधींजींना विश्वास होता की,  आपली लहान गावे, खेडी मजबूत झाली तरच राष्ट्र मजबूत होईल. यासाठी आपण अथक प्रयत्न करून गांधींजींचे स्वप्न पूर्ण करण्याचा आज संकल्प करूया. यावेळी ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर खादीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून इतक्या मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदाच होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ‘मन की बात’ या नभोवाणीवरील कार्यक्रमामध्ये तसेच इतरही कार्यक्रमांमध्ये खादीला प्रोत्साहन देतात, याचाही मनोजकुमार यांनी उल्लेख केला.  

     
खादी ग्रामोद्योग आयोगा आता आर्थिक विकासावर लक्ष केंद्रीत करून या क्षेत्राला अधिक बळकट करणार आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोग ही एक बहुआयामी संस्था आहे. या संस्थेमध्ये समाजातल्या सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, असेही मनोजकुमार यावेळी म्हणाले.

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये केव्हीआयसीच्या मुंबई कार्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाद्यवृंद, कठपुतळी कार्यक्रम, सूतकताईवरील कथाकथन, आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

खादीच्या वापराविषयी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी केव्हीआयसीच्या वतीने चर्चगेट रेल्वे स्थानक ते मरीन ड्राइव्ह या मार्गावर ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. यामध्ये केव्हीआयसीचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह हजारो खादी कारागीर, खादी कामगार सहभागी झाले होते. याआधी, 11 ऑगस्टपासून देशभरातल्या केव्हीआयसीच्या सर्व प्रादेशिक कार्यालयांच्यावतीने ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली.


***

SonalT/SuvarnaB/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852506) Visitor Counter : 208


Read this release in: English