रेल्वे मंत्रालय

76व्या स्वातंत्र्यदिनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या हस्ते मुंबईतील मुख्यालयात ध्वजारोहण

Posted On: 15 AUG 2022 5:40PM by PIB Mumbai

मुंबई, 15 ऑगस्‍ट 2022

 

76 व्या स्वातंत्र्यदिनी आज मुंबईत मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असलेल्या मुख्यालयाच्या प्रांगणात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना लाहोटी यांनी सर्व रेल्वे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि इतर मान्यवरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात देशाच्या एकीकरणात आणि नेते आणि स्वातंत्र्य सैनिकांना देशात ये-जा सुलभ करण्यात रेल्वेनं महत्त्वाची भूमिका बजावली. रेल्वेचा परिसर आणि रेल्वेगाड्या देखील स्वातंत्र्य संग्रामातील अनेक महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार बनल्या, असे त्यांनी सांगितले.

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी देखील ‘ हर घर  तिरंगा’ मोहिमेचा भाग म्हणून आपल्या घरांवर तिरंगी ध्वज फडकवले आहेत, असे ते म्हणाले. 2021-22 या वर्षातील आणि 2022-23 या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यातील कामगिरीची त्यांनी उपस्थितांना माहिती दिली.

आरपीएफ, मुंबईच्या उपनिरीक्षक जयश्री पाटील आणि सहाय्यक उपनिरीक्षक सुनील भागवत,जळगाव आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक चौधरी यांचे त्यांनी भारतीय पोलिस पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा एक भाग म्हणून 75 वर्षे वयाचे अब्बास मुन्तासिर आणि निवृत्त कार्यालय अधीक्षक इरीनेव वाझ या दोन निवृत्त कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनिल कुमार लाहोटी आणि मध्य रेल्वेच्या महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्ष  मीनू लाहोटी यांनी भायखळा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडक स्मृती रुग्णालयात विविध सुविधांचे उद्घाटन केले. यावेळी आरपीएफच्या श्वानपथकाने फलाटांवर आणि रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची सुरक्षा राखण्यासाठी कार्यक्षम पद्धतीने ते वापरत असलेल्या कौशल्याचे दर्शन घडवले.

मध्य रेल्वेच्या सांस्कृतिक अकादमीच्या कलाकारांनी “राष्ट्र वतन सदैव प्रथम”  हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. मध्य रेल्वेच्या महिला कल्याण संघटनेच्या(CRWWO) अध्यक्ष मीनू लाहोटी आणि CRWWO चे इतर सदस्य, अतिरिक्त महाव्यवस्थापक आलोक सिंग, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग शलभ गोयल, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या या सोहळ्याचे मध्य रेल्वेचे फेसबुक पेज, ट्वीटर आणि यूट्युब वाहिनीवर थेट प्रसारण करण्यात आले.


* * *

PIB Mumbai | S.Kane/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1852065) Visitor Counter : 116


Read this release in: English