माहिती आणि प्रसारण मंत्रालय
येत्या 14 ऑगस्टपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या विविध पैलूंना समोर आणणारी 75 भागांची मालिका सुरु होणार
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील अनाम वीरांच्या साहस आणि बलिदानाच्या इतिहासाची ‘स्वराज’ भावी पिढ्यांना जाणीव करून देण्याबरोबरच पुढे जाण्याची प्रेरणा देईल : अभिनेते आणि ‘स्वराज’ मालिकेचे सूत्रधार मनोज जोशी
दूरदर्शन सुरू करणार जय भारती, कॉर्पोरेट सरपंच, ये दिल मांगे मोअर आणि स्टार्ट अप चँपियन्स 2.0 या नव्या मालिका
Posted On:
12 AUG 2022 6:16PM by PIB Mumbai
मुंबई, 12 ऑगस्ट 2022
इतिहास भविष्य घडवत असतो. अनाम वीरांचे शौर्य आणि त्याग यांचा सन्मान करणारी स्वराज ही मालिका आपल्याला आपल्या इतिहासाची जाणीव करून देण्याबरोबरच भावी पिढ्यांना हा इतिहास लक्षात ठेवण्याची आणि पुढे वाटचाल करण्याची प्रेरणा देइल,असे प्रतिपादन सुप्रसिध्द अभिनेते मनोज जोशी यांनी केले.
येत्या 14 ऑगस्टपासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’या मालिकेची माहिती देण्यासाठी मुंबई दूरदर्शन केंद्र इथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. सुप्रसिध्द अभिनेते आणि या मालिकेतील सूत्रधार मनोज जोशी, पत्र सूचना कार्यालय ,महाराष्ट्र आणि गोवा च्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी या मालिकेसंदर्भात तसेच दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या इतर नविन कार्यक्रमांची माहिती यावेळी दिली.
मनोज जोशी यांनी पुढे सांगितले कि, परदेशी राजवटीकडून होणारी भारताची लूट थांबवण्यासाठी आणि त्यांचा साम्राज्यविस्तार थांबवण्यासाठी असंख्य लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्या स्वातंत्र्याची भेट या लोकांनी दिलेली आहे.
स्वराज ही मालिका नव्या भारतातील दूरदर्शनचे नवे चित्र दाखवत आहे, एक वर्षापेक्षा जास्त काळाचा हा प्रयत्न आहे आणि उच्च निर्मिती मूल्य असलेली ही मालिका आहे असे मनोज जोशी म्हणाले.
या मालिकेसंदर्भात अधिक माहिती देताना स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितले की या मालिकेचे प्रसारण 14 ऑगस्ट 2022 पासून दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून(डीडी नॅशनल) होणार आहे. दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांच्या( मराठी, तामिळ, तेलगु, कन्नड, मलयाळम, गुजराती, बंगाली, ओडिया, आसामी) माध्यमातून ही मालिका प्रादेशिक भाषेतही येत्या 20 ऑगस्टपासून सुरू होणार आहे असे त्या म्हणाल्या.
स्वराज ही मालिका इंग्रजीतून देखील डब केली जात आहे. स्वराज या मालिकेचा प्रत्येक नवा भाग रविवारी रात्री 9 ते 10 या वेळेत डीडी नॅशनलवरून प्रसारित करण्यात येईल आणि त्याचे पुनःप्रसारण मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी करण्यात येईल. या मालिकेच्या श्राव्य(ऑडियो) आवृत्तीचे प्रसारण ऑल इंडिया रेडियो(आकाशवाणी)च्या वाहिन्यांवरून शनिवारी सकाळी 11 वाजता करण्यात येईल असे स्मिता वत्स शर्मा म्हणाल्या.
‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’या मालिकेविषयी
स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ही 75 भागांची मालिका म्हणजे ,भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा 15 व्या शतकापासून म्हणजे वास्को द गामाचे भारतात आगमन झाल्याच्या कालखंडापासून सुरू झालेल्या संघर्षमय इतिहासाचे दर्शन घडवणारा एक भव्य कार्यक्रम आहे. ही मालिका भारतीय इतिहासाच्या विविध पैलूंना समोर आणणार आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत मोलाचे योगदान देऊनही फारसे माहीत नसलेल्या अनाम वीरांचे आयुष्य आणि त्याग या मालिकेतून समोर येणार आहे.
डॉक्यु-ड्रामा स्वरुपात सादर होत असलेल्या या मालिकेसाठी नामवंत इतिहासकारांच्या टीमने सखोल अभ्यास केला आहे. लोकप्रिय चित्रपट कलाकार मनोज जोशी या मालिकेच्या सूत्रधार या महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
‘स्वराज’या मालिकेचा आकाशवाणी भवनमध्ये केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी प्रारंभ करण्यात आला.
‘स्वराज’अर्थात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या प्रयासांच्या इतिहासाचे दृक-श्राव्य सादरीकरण करणे हा या मालिकेचा उद्देश आहे. छायाचित्रे, चित्रपट, मौखिक इतिहास, वैयक्तिक आठवणी, आत्मचरित्रे, जीवनचरित्र, बहुभाषिक प्रादेशिक साहित्य बऱ्याचदा दुर्लक्षित राहते आणि ते जगासमोर येत नाही. अशा गोष्टी, मानबिंदू, घटना, संघटना यांच्याविषयीची दृकश्राव्य निर्मिती ‘स्वराज’ च्या शोधाच्या या व्यापक सर्वसमावेशक चौकटीमध्ये केली जाणार आहे.
भारतामध्ये ‘स्वराज’ चा शोध आणि स्थापनेचा पडद्यावरील ऐतिहासिक कथनाच्या माध्यमातून अतिशय व्यापक आढावा घेतल्यामुळे देशातील आणि परदेशातील प्रेक्षकांना देशाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षामागील भावना एका अगदी नव्या दृष्टीकोनातून लक्षात घेता येणार आहे आणि ज्यांच्याविषयी आतापर्यंत कोणाला माहीत नव्हते अशा अनाम वीरांच्या महान त्यागाचा योग्य सन्मान होणार आहे.
नवीन मालिकांच्या माध्यमातून डीडी नॅशनल वाहिनीचे पुनरुज्जीवन
दूरदर्शन आणखी चार मालिकांचा प्रारंभ स्वराजसोबतच करत आहे,अशी माहिती स्मिता वत्स शर्मा यांनी दिली. यामध्ये " जय भारती", " कॉर्पोरेट सरपंच" आणि " ये दिल मांगे मोअर" यांचा समावेश आहे. देशभक्ती आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देणाऱ्या या मालिका आहेत. 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू होणाऱ्या या मालिकांचे प्रसारण डीडी नॅशनलवरून सोमवार ते शुक्रवार करण्यात येणार आहे.
याशिवाय “सूरों का एकलव्य" रियालिटी म्युझिक शो म्हणून मोठ्या प्रमाणावर मनोरंजन असलेली आणि बप्पी लाहिरी यांना आदरांजली अर्पण करणारी आणखी एक मालिका 14 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेचे प्रसारण शनिवार आणि रविवारी रात्री 8 ते 9 या प्राईम टाईममध्ये होणार आहे.
स्टार्ट अप्सची संकल्पना आणि कामगिरी यावर भर देणारा एक कार्यक्रम देखील डीडी नॅशनल आणि डीडी न्यूजवर सुरू होणार आहे,असे श्रीमती शर्मा यांनी सांगितले. " स्टार्ट अप चॅम्पियन्स 2.0" नावाच्या या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 46 स्टार्टअप्स प्रवास आणि त्यांचे यश यांचे दर्शन घडणार आहे. डीडी न्यूजवर शनिवारी रात्री 9 वाजता आणि डीडी नॅशनलवर रविवारी दुपारी 12 वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. आपल्या देशात कशा प्रकारे उद्यमशील वृत्ती वाढीला लागत आहे याची अतिशय रोचक माहिती या कार्यक्रमात मिळणार आहे. या कार्यक्रमाच्या इंग्रजी आवृत्तीचे प्रसारण डीडी इंडिया या वाहिनीवर दर शनिवारी रात्री 10 वाजता होणार आहे.
दूरदर्शनची आघाडीची वाहिनी असलेल्या डीडी नॅशनल वाहिनीचे या नव्या मालिकांमुळे खूप मोठ्या प्रमाणात पुनरुज्जीवन होणार आहे.
JPS/SP/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851322)
Visitor Counter : 333