माहिती आणि प्रसारण मंत्रालय
स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान तरुणांसाठी प्रेरणादायी - केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील
हर घर (घरोघरी ) तिरंगा या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे - कपिल पाटील
Posted On:
12 AUG 2022 4:00PM by PIB Mumbai
पुणे , 12 ऑगस्ट 2022
महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यातील ऐतिहासिक राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून देशाला सामर्थ्यशाली बनवणारी सुदृढ पिढी निर्माण व्हावी अशी अपेक्षा केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज व्यक्त केली . देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य तरूण पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे. देशाप्रति अभिमानाची भावना व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी हर घर ('घरोघरी ) तिरंगा या अभियानात सहभागी व्हावे,असे आवाहन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुण्यातील बापू सदन या इमारतीत असलेल्या राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्रात राष्ट्रध्वजारोहण आणि स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमाला पंचायत राज मंत्रालयाचे आर्थिक सल्लागार विजयकुमार बेहरा, संस्थेच्या निदेशक के . सत्य लक्ष्मी. यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते .
या निसर्गोपचार संस्थेमधून महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचा विचार देशाला दिला, तसेच निरोगी तरुण घडवण्याचा संदेशही दिला . त्यामुळं या संस्थेत होणाऱ्या या कार्यक्रमाला वेगळे महत्व असून महात्मा गांधीजींचे देश निर्माण चे अपुरे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने केल्याचे श्री पाटील यांनी सांगितले . निसर्गोपचार ही गांधीजींची संकल्पना होती आणि योगदिनाच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगात त्याचा प्रसार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले .या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा निश्चितपणे मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या त्यागातून स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या या देशाला आता पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या पिढीची आहे ती आपण सारे मिळून पार पाडू या , येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घराघरावर तिरंगा फडकवा असे आवाहन श्री पाटील यांनी यावेळी केले.
गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार विजेते डॉ. आर. के. मुटाटकर यांच्यासह अन्य स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या वारसांचा यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
MI/Somani/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851248)
Visitor Counter : 270