अर्थ मंत्रालय
455 कोटी रुपयांच्या बनावट वस्तू आणि सेवा कर पावत्या बनवणाऱ्या टोळीचा केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मुंबई (दक्षिण) आयुक्तालयाद्वारे छडा
एकाला अटक
Posted On:
11 AUG 2022 9:34PM by PIB Mumbai
मुंबई, 11 ऑगस्ट 2022
सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कर प्रधान आयुक्त कार्यालय आणि सीएक्स अर्थात उत्पादन शुल्क (अबकारी कर), मुंबई (दक्षिण) यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार सीजीएसटी मुंबई (दक्षिण) आयुक्तालयाच्या अधिकार्यांनी बनावट जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर पावत्या बनवणाऱ्या टोळीचा छडा लावला आहे. 455 कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचा उपयोग 27.59 कोटी रुपये बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविण्यासाठी केला गेला होता. या प्रकरणात मे. एमी इंटरनॅशनल जर्नल (OPC) प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे.
एका विशिष्ट स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी विरोधी शाखेने या आस्थापनेविरुद्ध तपास सुरू केला. तपासादरम्यान असे आढळून आले की, करदाता नोंदणीकृत ठिकाणी व्यवसाय करत नव्हता. कंपनीचे संचालक तपासात सहभागी झाले नाहीत आणि गेल्या काही महिन्यांपासून ते फरार होते. तथापि, ते 10.08.2022 रोजी तपासात सामील झाले आणि त्यांचा जबाब नोंदवण्यात आला ज्यामध्ये त्यांनी या कर फसवणुकीत आपली भूमिका मान्य केली.
या आस्थापनाने 14.15 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता आणि अस्तित्वात नसलेल्या विविध कंपन्यांच्या नावे 13.44 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट वळवले होते. सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे घोर उल्लंघन करून, मालाचा प्रत्यक्ष पुरवठा किंवा पावती न देता फसव्या पद्धतीने, अस्वीकार्य इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी 455 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या जारी केल्या होत्या.
तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे आणि या कर फसवणुकीतील त्याच्या कबुलीनुसार, आरोपी व्यक्तीला सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल 10.08.2022 रोजी सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. त्याला माननीय अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
2021-22 या आर्थिक वर्षात, सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाने 949 कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा कर चुकवेगिरीचा छडा लावला. 18 कोटी रुपयांची वसुली केली आणि 9 करचोरी करणाऱ्यांना अटक केली. चालू आर्थिक वर्षात सीजीएसटी मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या अधिका-यांनी केलेली ही सहावी अटक आहे.
संभाव्य फसवणूक करणार्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकारी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. हे प्रकरण, सीजीएसटी मुंबई झोनने कर फसवणूक करणारे आणि बनावट आयटीसी नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे.केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकारी, करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम येत्या काही दिवसांत अधिक तीव्र करणार आहेत.
S.Kulkarni/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1851087)
Visitor Counter : 198