सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) देशभरातील स्मारकांना 5 ते 15 ऑगस्ट या कालावधीत भेट देण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणद्वारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक स्थळांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन

Posted On: 11 AUG 2022 7:14PM by PIB Mumbai

मुंबई,11 ऑगस्ट 2022

भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या गौरवशाली प्रसंगी सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या  भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तिकीट लागू असलेल्या सर्व ऐतिहासिक स्मारके आणि स्थळांवर 5 ते 15 ऑगस्ट या कालावधीत   सर्व नागरिकांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्रालयाने पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सांस्कृतिक जागरुकता निर्माण करण्यासाठी घेतला आहे. 

यासाठी 2 ते 15 ऑगस्ट या काळात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या मुंबई मंडळाअंतर्गत असलेल्या (मुंबई विभागातील सर्व, अकरा उप-मंडळ कार्यालये: मुंबई उपनगरीय, वसई, एलिफंटा, पुणे, जुन्नर, अलिबाग, जंजिरा, कोल्हापूर, विजयदुर्ग आणि सोलापूर) येथील पंचावन्न केंद्रीय संरक्षित स्मारकांची निवड करण्यात आली आहे. ऐतिहासिक स्मारके आणि वस्तूंच्या स्वच्छता मोहिमेत स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले आहेत.

जल धरोहर अभियानाअंतर्गत, एएसआय  पश्चिम महाराष्ट्रातील (कोकण प्रदेश) मध्यवर्ती संरक्षित 11 प्राचीन जलसंरचनांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवनामध्ये सहभागी आहे. या अभियानाअंतर्गत विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन या विषयावर माहितीची नोंद करून त्याचे फलक तयार केले आहेत. त्याचे प्रदर्शन सोलापूरचा किल्ला, पायरीची विहीर, कराडमधील पंताचा कोट, अंबरनाथ मंदिर ठाणे येथील  बावडी(विहीर), पाताळेश्वर लेणी पुणे येथील कुंड, महाबळेश्वर येथील कृष्णामाई मंदिरातील कुंड, मुंबईमधील  मंडपेश्वर लेणी, जयगड किल्ल्यावरील बावडी(विहीर), जिजामाता वाड्यातील बावडी (विहीर), पाचड, तळा किल्ल्यावरचे टाके, कान्हेरी लेण्यांमधील टाकी   आणि मुंबई येथील सायन किल्ल्यावरील तळे  या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्विक्षण विभागाद्वारे या जल कुंभांची स्वच्छता आणि जतन केले जात आहे. तसेच भविष्यात वापर करण्याच्या दृष्टीने या जल स्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे नियोजन देखील आहे. 

जल धरोहर अभियान हे अमृत सरोवर-जल धरोहर संरक्षण अभियानाचा भाग असून, जल संवर्धनाबाबत  जन जागृती करण्यासाठी भारत सरकारच्या  शहर विकास मंत्रालयाद्वारे सुरु केलेली एक विशेष मोहीम  आहे.  

हर-घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियाना अंतर्गत, एएसआयच्या सर्व महत्त्वाच्या स्मारकांवर ध्वजारोहणाचे नियोजन करण्यात आले आहे आणि विजयदुर्ग किल्ला, सोलापूर किल्ला, मुंबईमधील मंडपेश्वर लेणी, पालघर जिल्ह्यातील वसई किल्ला आणि पुणे येथील आगाखान पॅलेस या पाच ऐतिहासिक स्मारक स्थळांवर 15 मीटर उंच ध्वज स्तंभ उभारण्यात येत आहेत. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा प्रमुख कार्यक्रम पुण्यामधील आगाखान पॅलेस येथे 15 ऑगस्ट रोजी (सकाळी 9 ते 11.45) येथे आयोजित करण्यात आला आहे. पद्मश्री पुरस्काराने  सन्मानित प्राध्यापक  के. पद्दय्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  ज्येष्ठ गांधीवादी प्रदीप मुनोत यांना  गांधी स्मारक निधी, पुणेच्या इतर सदस्यांसह सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. 

(संदर्भ: एएसआय- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग)

 

 

 

 

S.Kulkarni/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1851017) अभ्यागत कक्ष : 234
Read this releasein: English