माहिती आणि प्रसारण मंत्रालय

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे राज्यातील रेल्वे स्थानकांवर स्वातंत्र्य लढ्याची  विविधांगी माहिती देणाऱ्या  चित्र प्रदर्शनाचे आयोजन


‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘मोबाईल व्हॅन’ च्या माध्यमातून प्रचार मोहिम सुरु

Posted On: 11 AUG 2022 12:50PM by PIB Mumbai

मुंबई-पुणे  दि. 11 ऑगस्ट 2022


माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्यावतीने ‘आझादी का अमृत महोत्सव’ व ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.


 या अभियानाअंतर्गत औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नांदेड आणि सोलापूर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य लढ्याची विविधांगी माहिती देणाऱ्या चित्र प्रदर्शनासह विविध कार्यक्रम होणार आहेत. रेल्वे, मेट्रो तसेच स्थानिक प्रशासनाच्या सहायाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 
औरंगाबाद रेल्वे स्थानकात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष प्रचार कार्यक्रम आणि स्वातंत्र्य लढ्याची माहिती देणारे चित्र प्रदर्शन भरविले जाणार आहे. या मुख्य कार्यक्रमाशिवाय व्याख्यान, क्रीडा, प्रश्नमंजूषा, चित्रकला, रांगोळी अशा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे देखील छत्रपती शाहू टर्मिनन्स रेल्वे स्थानकात चित्र प्रदर्शन लावण्यात येईल. या प्रदर्शनात 1700 ते 1947 या काळातील भारतीय स्वातंत्र्य संग्राम दर्शविण्यात येईल. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट या काळात नागरिक हे प्रदर्शन पाहू शकतील. 

 


 नागपूरच्या सिताबर्डी मेट्रो स्टेशनवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रदर्शन लावण्यात येणार आहे. 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान नागरिक हे प्रदर्शन पाहू शकतील. नागपूर महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी कोविड लसीकरण शिबिर घेण्यात येणार आहे. याशिवाय नागपूर आणि परिसरात राष्ट्रीय  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या विकासकामांची माहिती देणारे छायाचित्र प्रदर्शन देखील लावण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त स्थानिक नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. 

 
या अभियानाअंतर्गत नांदेड इथेही रेल्वे स्थानकावर देखील चित्र प्रदर्शन लावण्यात येत आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हे प्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी  खुले राहिल.


मध्य रेल्वे विभाग व सद्भावना सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर कार्यालय सोलापूर रेल्वे स्थानकात अमृत महोत्सवी चित्र प्रदर्शनाचे आयोजन करत आहे. येत्या 15 व 16 ऑगस्ट रोजी हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवावर आधारित माहिती कक्ष देखील येथे असतील. यानिमित्ताने शहरात भव्य आकाराचे होर्डिंग देखील लावण्यात येणार आहेत.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी ‘मोबाईल व्हॅन’ च्या माध्यमातून प्रचार मोहिम सुरु 


अमृत  महोत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाची खेड्यापाड्यापर्यंत जनजागृती व्हावी, राज्यातील सर्व नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे म्हणून केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्यावतीने ‘मोबाईल व्हॅन’ अर्थात फिरत्या गाड्यांवर प्रचार मोहिम देखील सुरू केली आहे. महाराष्ट्र व गोवा राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये ही फिरती वाहने ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा संदेश आणि माहिती पोहचवत आहेत.


येत्या स्वातंत्र्य दिनापर्यंत केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे कार्यालयाची 11 क्षेत्रीय कार्यालये ही मोहिम राबवित  आहेत.अमरावती, अकोला, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, नागपूर, नांदेड, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर , वर्धा आणि  पणजी या तेरा जिल्ह्यात ही प्रचार मोहिम राबविली जात आहे.


*****


JaydeviPS/Shilpa N/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1850840) Visitor Counter : 331