वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईच्या विणकर सेवा केंद्रात आठवा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा


भारतीय विणकरांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रम आणि योजनांची माहिती देण्यासह या क्षेत्राला भेडसावणाऱ्या आव्हांनावरही चर्चा

Posted On: 07 AUG 2022 3:01PM by PIB Mumbai

 

मुंबई येथील विणकर सेवा केंद्रात आज आठवा राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात आला. विणकरांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. मलबार विधानसभेचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी जे प्रमुख उपक्रम हाती घेण्यात आले, त्यांची माहिती देण्यासाठी विणकर सेवा केंद्राने सुविधा केंद्र म्हणून भूमिका बजावली. यात तालुका स्तरावरील समूह, हँडलूम मार्क, मुद्रा योजना, विमा योजना, ई-वाणिज्य, ई-धागा, जीआय आदी उपक्रमांचा समावेश होता. स्थानिक विणकरांच्या यशोगाथांवरही या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली.

विणकरांच्याविविध वस्त्ररचना, नमुने आणि उत्पादने यांचे प्रदर्शनही मुंबईच्या केंद्राच्या इमारतीत आयोजित करण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी विणकरांशी संवाद साधला आणि त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली.

हातमाग वस्त्ररचनांचे पुनरूज्जीवन करण्याच्या तंत्राच्या मुंबई इथल्या तज्ञ सल्लागार बेला संघवी यांनी विणकर आणि केंद्राच्या कर्मचाऱ्यांना, हातमाग उत्पादनांची रचना तयार करणे, त्याचे विपणन आणि जाहिरात करण्याबाबत माहिती दिली.

गेल्या तीन वर्षांत मुंबई येथील विणकाम सेवा केंद्राने खालील प्रमुख उपक्रम राबवले आहेत.

  • झरोखा या नावाने हातमाग रचनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले ज्यात 44 कारागीरांनी भाग घेतला. त्याद्वारे 32 लाख रूपयांच्या उत्पादनांची विक्रमी विक्री नोंदवण्यात आली.
  • सोलापूर, येवला आणि पैठण येथे 21 कौशल्य सुधार प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यात आले. त्यात विणकाम करताना वरचा आणि खालचा धागा स्वतंत्र करणाऱ्या लायटनिंग आणि वैयक्तिक शेड्सची सुविधा देण्यात आली होती.
  • 22 समर्थ प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडले असून त्याचा लाभ 435 लाभार्थींनी घेतला.
  • सलगर, वागदरी, सोलापूर, मैंदर्गी आणि येवला येथे 14 कामाचे युनिट्स उभारण्यात आले.
  • हातमागावरील विणकामासाठी त्याच्या उत्कृष्ट कौशल्याबद्द्ल राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी 3 विणकरांची निवड करण्यात आली.
  • आगामी काळात 13 इलेक्ट्रॉनिक मागांचे वितरण करण्यात येणार आहे.

 

राष्ट्रीय हातमाग दिनाविषयी

स्वातंत्र्यलढ्याच्या काळात, 7 ऑगस्ट 1905 रोजी स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आली, या चळवळीने स्वदेशी उद्योगांना विशेषतः हातमाग विणकरांना आधार दिला होता. या चळवळीचे स्मरण म्हणून, दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस, ‘राष्ट्रीय हातमाग दिनम्हणून साजरा करण्याचा निर्णय 2015 साली केंद्र सरकारने घेतला. पहिल्या राष्ट्रीय हातमाग दिनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेन्नई येथे करण्यात आले. देशातल्या हातमाग विणकर समुदायांप्रती सन्मान व्यक्त करणे, त्यांच्या कलेचा गौरव आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात या क्षेत्राने दिलेल्या योगदानाची यथोचित दखल घेण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. हातमाग कलेतल्या भारताच्या  समृद्ध सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करण्याचा आणि हातमाग विणकर तसेच कामगारांना अधिक मोठ्या संधी देऊन सक्षम करण्याचा निर्धार, या निमित्ताने अधिक बळकट केला जातो.

***

R.Aghor/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1849404) Visitor Counter : 247


Read this release in: English