दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबत जनतेला अधिक माहिती देण्यासाठी टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळाकडून विविध उपक्रमांचे आयोजन
महाराष्ट्रातील टपाल कार्यालयांना, 6,18,000 हून अधिक राष्ट्रध्वज पुरवले, आतापर्यंत 2,86,000 ध्वजांची विक्री, 24 प्रभात फेऱ्यांचे होणार आयोजन
‘हर घर तिरंगा अभियान’ : देशातील प्रत्येक टपाल कार्यालयाचे कामकाज येत्या स्वातंत्र्यदिनापर्यंत सर्व सुटीच्या दिवसांसह दररोज सुरु राहणार
तुमच्या जवळच्या टपाल कार्यालयातून तिरंगा ध्वज खरेदी करा आणि हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हा
Posted On:
06 AUG 2022 10:09PM by PIB Mumbai
‘हर घर तिरंगा’ अर्थात घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत राष्ट्रध्वजांची विक्री तसेच वितरण प्रक्रिया सुलभतेने पार पाडता यावी म्हणून महाराष्ट्रासह देशातील सर्व टपाल कार्यालयांचे कामकाज या वर्षीच्या स्वातंत्र्य दिनापर्यंत सुटीच्या दिवसांसह दररोज सुरु राहणार आहे. महाराष्ट्र परिमंडळाचा विस्तार लक्षात घेतला तरी या मंडळातील 10,939 टपाल कार्यालयांना विक्रीसाठी राष्ट्रध्वज पुरविण्यात येणार आहेत. या टपाल कार्यालयांना सुमारे सहा लाख अठरा हजारांहून अधिक राष्ट्रध्वज पुरवण्यात आले असून त्यापैकी दोन लाख शहाऐंशी हजार ध्वजांची आतापर्यंत विक्री देखील झाली आहे. राज्यात डाव्या विचारसरणीच्या कट्टरपंथीयांचा प्रभाव असलेल्या भागातील टपाल कार्यालयांना देखील तिरंगा ध्वजाच्या विक्री मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
लोकांना या अभियानात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध टपाल कार्यालयांमध्ये हर घर तिरंगा अभियानाची माहिती देणारे फलक तसेच सेल्फी बोर्ड लावण्यात आले आहेत. महाराष्ट्र तसेच गोवा येथील नागरिकांना हर घर तिरंगा अभियानाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी टपाल विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे 24 प्रभात फेऱ्यांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
या सार्वजनिक अभियानाला पाठींबा देण्यासाठी देशभरातील सर्व टपाल वितरण कार्यालये तसेच टपाल विभागाच्या इतर महत्त्वाच्या कार्यालयांचे कामकाज देखील विशिष्ट मर्यादेसह सुरु राहील.
या कालावधीत, 7, 9 आणि 14 ऑगस्ट रोजी येत असलेल्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी देखील, प्रत्येक टपाल कार्यालयातील किमान एक खिडकी सुरु ठेवून जनतेला राष्ट्रध्वजाची विक्री करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व टपाल वितरण कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजांच्या वितरणासाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1849209)
Visitor Counter : 153