माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर तीन दिवसांच्या मल्टीमीडिया प्रदर्शनाचे मडगाव रेल्वे स्थानकावर उद्घाटन
मोफत कोविड-19 लसीकरण शिबिराला मिळाला उत्तम प्रतिसाद
प्रदर्शनाच्या ठिकाणी ‘हर घर तिरंगा’या संकल्पनेवर उभारण्यात आला आहे सेल्फी-बूथ
Posted On:
05 AUG 2022 7:07PM by PIB Mumbai
पणजी, 5 ऑगस्ट 2022
केंद्रीय संचार ब्युरो, गोवा यांच्या वतीने (सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशन) कोकण रेल्वेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित तीन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनाचे उदघाटन कोकण रेल्वेचे प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक बी. बी. निकम यांच्या हस्ते आज झाले.यावेळी विभागीय प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू आणि कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे उपस्थित होते.

“गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असून मडगाव हे सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे, जेथे स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देत असतात.त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यलढ्यावरील मल्टीमीडिया प्रदर्शनासाठी हे योग्य ठिकाण आहे. या प्रदर्शनामुळे अभ्यागतांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबद्दल आणि आपल्या शूर क्रांतिकारकांच्या अमूल्य बलिदानाबद्दल माहिती जाणून घेण्यास मदत होईल,” असे बी. बी. निकम यांनी उदघाटनप्रसंगी माध्यमांना संबोधित करताना सांगितले.

प्रदर्शनाचा एक भाग म्हणून, गोवा सरकारच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने मोफत कोविड-19 लसीकरणासाठी तीन दिवसीय शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर भारत सरकारच्या 75 दिवसीय अमृत महोत्सव कोविड-19 लसीकरण मोहिमेचा एक भाग आहे.आज पहिल्या दिवशी सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 या वेळेत सुरू असलेल्या या शिबिरात सुमारे 50 जणांनी लसीकरण करून घेतले. शिबिरात लसीकरणाच्या पहिल्या, दुसऱ्या, तसेच वर्धक मात्रा मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.

केंद्रीय संचार ब्युरोने देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारने सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून लसीची मात्रा घेतलेल्यांना ‘तिरंगा’ ध्वजाचे वाटप केले.

कार्यक्रमस्थळी एक सेल्फी-बूथ उभारण्यात आला असून तो देखील लोकांना ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेवर आधारित स्वतःचे छायाचित्र घेण्यासाठी आकर्षित करत आहे. हे प्रदर्शन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर 5 ते 7 ऑगस्ट, 2022 या कालावधीत सर्वांसाठी खुले रहाणार आहे. केंद्रीय संचार ब्युरोने जनतेला या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन केले आहे.

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1848869)
Visitor Counter : 116