वस्त्रोद्योग मंत्रालय
मुंबईच्या एनआयएफटी संस्थेने पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 दिवसांच्या अभिमुखता कार्यक्रमाचे केले आयोजन
Posted On:
03 AUG 2022 9:09PM by PIB Mumbai
मुंबई, 3 ऑगस्ट 2022
एनआयएफटी म्हणजेच राष्ट्रीय फॅशन डिझायनिंग संस्थेने डिझाईन/तंत्रज्ञान या विषयांमध्ये पदवी घेण्यासाठी तसेच डिझाईन रिसर्च/ फॅशन मॅनेजमेंट या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी संस्थेत नव्याने प्रवेश घेतलेल्या 333 विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी 3 दिवसांचा अभिमुखता (ओरिएंटेशन ) कार्यक्रम आयोजित केला आहे.
एनआयएफटी संस्थेच्या खारघर येथील महाविद्यालयात आज या 3 दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी, खारघर संकुलाचे संचालक प्रा. डॉ.पवन गोडियावाला, माजी संस्था प्रमुख डॉ.शर्मिला दुआ,संयुक्त संचालक खुशाल जुनागडे आणि खारघर महाविद्यालयाचे शैक्षणिक समन्वयक डॉ.सुशील रातुरी यांनी या अभिमुखता कार्यक्रमाच्या औपचारिक समारंभाचे उद्घाटन केले.
खारघर संकुलाचे संचालक प्रा.पवन गोडियावाला यांनी मुंबईच्या एनआयएफटी संस्थेत नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. एनआयएफटीमधील काळाच्या कसोटीवर सिध्द झालेल्या अध्यापन कलेबद्दल त्यांनी माहिती दिली. डॉ.पवन गोडियावाला म्हणाले, “एनआयएफटी ही संस्था या विद्यार्थ्यांना नवे मार्ग चोखाळण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या व्यावसायिक कौशल्याला अधिक धारदार करेल.” शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी ही संस्था कटिबद्ध असून संस्थेची दूरदृष्टी तिच्या आकांक्षित विद्यार्थ्यांची जोपासना करण्यासाठी मजबूत पाया पुरविते याचा त्यांनी उल्लेख केला.
आजच्या दिवशी, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सायबर जागरूकता सत्रामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गवसाने यांनी ऑनलाईन आर्थिक तसेच समाज माध्यम फसवणुकीच्या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि असे गुन्हे रोखण्यासाठी काय करावे याबाबत मार्गदर्शन देखील केले.
एनआयएफटीचे संयुक्त संचालक आणि परीक्षा नियंत्रक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धतीची माहिती दिली. संस्थेच्या खारघर महाविद्यालयातील शैक्षणिक समन्वयकांनी एनआयएफटीच्या शैक्षणिक संरचनेची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरामध्ये फेरी मारून आपापल्या विभागांच्या कार्याची कल्पना येण्याच्या दृष्टीने विभागांना भेटी दिल्या.
* * *
PIB Mumbai | S.Kane/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1848097)
Visitor Counter : 116