दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
एक्स्प्रेस कॉर्गो सेवेमुळे सुरळीत कनेक्टीव्हिटी तसेच वस्तू आणि पार्सले यांच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीकरिता जलद वितरण व्यवस्था
महाराष्ट्र टपाल परिमंडळाने एक्स्प्रेस कॉर्गोची पहिली खेप आज मुंबईहून अहमदाबादला केली रवाना
प्रविष्टि तिथि:
28 JUL 2022 6:52PM by PIB Mumbai
मुंबई, 28 जुलै 2022
नव्याने सुरु करण्यात आलेल्या एक्स्प्रेस कॉर्गो सेवेच्या माध्यमातून 22953 अप गुजरात अतिजलद एक्स्प्रेस गाडीने महाराष्ट्र टपाल परिमंडळाच्या मालाची पहिली खेप आज 5 वाजून 45 मिनिटांनी मुंबई येथून अहमदाबादसाठी रवाना करण्यात आली. ‘भारतीय टपाल विभाग आणि भारतीय रेल्वे यांचा संयुक्त उपक्रम’ असलेली आज सुरु करण्यात आलेली ही नवी सेवा मुंबई, नवी मुंबई, सुरत, बडोदा आणि अहमदाबाद या शहरांच्या परिसरातील औद्योगिक केंद्रांकडून वस्तू आणि कॉर्गो सामानाचे वितरण वेळेवर होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

वस्तू तसेच पार्सले यांच्या मोठ्या प्रमाणातील वाहतुकीकरिता सुरळीत जोडणी सेवा पुरविण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरु केलेल्या “रेल टपाल गतिशक्ती” उपक्रमाचा भाग म्हणून टपाल विभाग आणि भारतीय रेल्वे यांच्यातील सहयोगासह ई-वाणिज्य मंचावरील उद्योजक आणि एमएसएमई यांच्याकरिता समर्पित विशिष्ट मालवाहतूक विषयक योजना म्हणून “एक्स्प्रेस कॉर्गो सेवा” विकसित करण्यात आली आहे.

आज रवाना करण्यात आलेल्या मालाच्या खेपेच्या गाडीला महाराष्ट्र परीमंडळाच्या मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा आर.श्रीनिवास आणि पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी.व्हि.एल. सत्यकुमार यांनी झेंडा दाखविला. पोस्टमास्तर जनरल (मेल्स आणि बीडी) अमिताभ सिंग यांनी टपाल विभाग आणि भारतीय रेल्वे यांच्यातील समन्वयाची जबाबदारी पार पाडली. एक्स्प्रेस कॉर्गो सेवेला समर्पित विशेष टपाल तिकिटाचे अनावरण देखील या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य पोस्टमास्तर जनरल वीणा आर.श्रीनिवास म्हणाल्या की, एका पावतीवर दीर्घ अंतरावर प्रवास करणे शक्य करून देण्याची भारतीय रेल्वेची क्षमता आणि व्यक्तिगत ग्राहकांकडून वस्तू आणि पार्सले गोळा करणे आणि देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सेवा देणे हा भारतीय टपाल सेवेला लोकप्रियता देणारा गुणधर्म यांच्या संयोगातून ‘एक्स्प्रेस कॉर्गो सेवा’ निर्माण करण्यात आली आहे. भारतीय रेल्वे आणि दळणवळण या दोन्ही विभागांचे केंद्रीय मंत्री असलेल्या अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे असे त्या पुढे म्हणाल्या. मात्र, या सेवेतून मिळणाऱ्या महसुलाच्या विभागणीचे प्रमाण निश्चित करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही अशी माहिती त्यांनी दिली.

पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक जी.व्हि.एल. सत्यकुमार म्हणाले की, 2022-23 च्या अर्थसंकल्पामध्ये भारतीय रेल्वे आणि टपाल विभाग यांच्यातील सहयोगी संबंधातून एकात्मिक मालवाहतुक सेवेचा विकास करण्यासाठी तरतूद करण्यात आली होती.त्या आधारावर, मुंबई येथून ही सेवा सुरु करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. वाराणसी आणि सुरत यांच्या दरम्यान प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. ही सेवा आता 118 दिवस सुरु असून या कालावधीत एक्स्प्रेस कॉर्गो सेवेचा वापर करून पाठविल्या जाणाऱ्या वस्तू आणि पार्सले यांचे प्रमाण वाढलेले आढळून आले असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. आगामी काळात मुंबईहून सुरु झालेल्या या सेवेमध्ये आकारमान , आणि प्रमाण यांच्या संदर्भात वाढ होत राहील असा विशास त्यांनी व्यक्त केला.पालघर ते दिल्ली आणि इतर ठिकाणांसाठी अशाच प्रकारची सेवा सुरु करण्याचे काम प्रगतीपथावर आहे असे ते पुढे म्हणाले.
व्यापार ते ग्राहक आणि व्यापार ते व्यापार या बाजाराचे उद्दिष्ट ठेवून, बाजारांतील कल लक्षात घेत, किफायतशीर दरांसह ई-वाणिज्य आणि एमएसएमई बाजारांवर लक्ष केंद्रीत करून 35 किलो ते 100 किलो या वजनाच्या मालाच्या वाहतुकीसाठी भारतीय टपाल विभाग आणि भारतीय रेल्वे यांच्या सहभागातून ही संयुक्त पार्सल सेवा विकसित करण्यात आली आहे. टपाल विभागातर्फे या सेवेचा प्रारंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यांच्या ठिकाणी पार्सल हाताळणी म्हणजेच ग्राहकांच्या ठिकाणाहून पार्सल घेणे, बुकिंग, वितरण आणि वाहतूक यासाठी भारतीय रेल्वेने निश्चित कलेल्या स्थानकांचा वापर करणे ही या सेवेची मुलभूत संकल्पना आहे.
या महिन्यात बेंगळूरू ते विशाखापट्टणम या शहरांदरम्यान देखील एक्स्प्रेस कॉर्गो सेवेची सुरुवात करण्यात आली आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1845953)
आगंतुक पटल : 184
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English