माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आजपासून बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी या विषयी पत्र सूचना कार्यालयाचा वेबिनार संपन्न
नेमबाजी आणि तिरंदाजी क्रीडाप्रकारातील पदकांची उणीव अॅथलिट भरुन काढतील- सहभागी क्रीडा तज्ञांचा विश्वास
Posted On:
28 JUL 2022 3:35PM by PIB Mumbai
मुंबई/पणजी, 28 जुलै 2022
आजपासून बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे सुरु होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 च्या पार्श्वभूमीवर पत्र सूचना कार्यालय, महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022: भारतीय खेळांडुपुढील आव्हाने आणि संधी या विषयावर एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा पत्रकार विनायक राणे, मुक्त पत्रकार शैलेश पाटील आणि क्रीडा पत्रकार प्रज्ञा जांभेकर यांनी वेबिनारमध्ये सहभागी होत भारतीय क्रीडापटूंची गेल्या काही स्पर्धांमधील उल्लेखनीय कामगिरी आणि त्यादृष्टीने राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांची असलेली संधी यावर चर्चा केली.
वेबिनारचे प्रास्ताविक पत्र सूचना कार्यालय पश्चिम विभागाच्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती स्मिता वत्स-शर्मा यांनी केले. क्रीडा स्पर्धा या देशांना जोडणाऱ्या असतात. राष्ट्रकुल स्पर्धेविषयी भारतीयांमध्ये विशेष उत्साह असतो. पदक जिंकल्यानंतर एखादा खेळाडू पोडियमवर जातो, त्या अभिमानाच्या क्षणाचे वर्णन शब्दातीत आहे, असे त्या म्हणाल्या.
भारताला हमखास पदक मिळवून देणारे नेमबाजी आणि तिरंदाजी हे क्रीडाप्रकार यंदा या स्पर्धेतून वगळण्यात आले आहेत मात्र पदकांची ही उणीव अॅथलिट भरुन काढतील असा विश्वास पत्रकार शैलेश पाटील यांनी व्यक्त केला. यावर्षी टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस प्रकारात भारताला चांगली संधी असल्याचे ते म्हणाले.
24 वर्षानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा आणि प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला क्रिकेटपटूंची नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी आणि ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धेत खेळल्यामुळे मिळालेल्या अनुभवाचा लाभ त्यांच्या कामगिरीत दिसून येईल, असे क्रीडा पत्रकार विनायक राणे म्हणाले.
प्रज्ञा जांभेकर यांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील महाराष्ट्रातील खेळाडूंच्या कामगिरीवर प्रकाश टाकला. स्टीपल चेस अॅथलिट प्रकारात अविनाश साबळेकडून मोठ्या अपेक्षा असल्याचं त्या म्हणाल्या. बर्मिंगहॅममध्ये स्पर्धा होत आहे, त्यामुळे भारतीय क्रीडापटूंना मिळणारे समर्थन चांगले असेल, यामुळे खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.
पत्र सूचना कार्यालयाचे अधिकारी समरजीत ठाकूर यांनी केंद्रीय क्रीडा व युवहार मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेल (MOC) आणि टू द ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) योजनांचा खेळाडूंना होत असलेल्या लाभावर प्रकाश टाकला. वेबिनारच्या समन्वयक सहायक संचालक श्रीमती जयदेवी-पुजारी स्वामी यांनी आभार प्रदर्शन केले तर केंद्रीय संचार ब्युरोच्या अधिकारी शिल्पा पोफळे यांनी वेबिनारचे सूत्रसंचालन केले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा-2022 ला आजपासून बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे सुरुवात होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 11.30 वाजता स्पर्धेचा स्वागतसोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधु स्वागत सोहळ्यात भारतीय चमूची ध्वजधारक आहे.
भारताने आपला 322 सदस्यीय चमू राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पाठवला आहे, यात 215 अॅथलिट आणि 107 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील 14 क्रीडापटू आहेत. 2018 साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारत 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 कांस्य पदकांसह ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर होता. भारतीय खेळाडू 15 क्रीडा प्रकारांमध्ये आणि चार पॅरास्पर्धेत सहभागी होणार आहेत.
वेबिनार पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा :
* * *
PIB Mumbai | Jaydevi PS/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1845830)
Visitor Counter : 427