गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2023 साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


31 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करता येतील

Posted On: 27 JUL 2022 4:50PM by PIB Mumbai

मुंबई, 27 जुलै 2022

 

भारतात, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने “सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार” या नावाच्या पारितोषिकांची सुरुवात केली आहे. या पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तीचे आपत्ती प्रतिबंध, आपत्तीचे उपशमन, सुसज्जता, बचाव, प्रतिसाद, मदत, पुनर्वसन, संशोधन अथवा नाविन्यपूर्ण शोध किंवा आपत्तीचा जलद इशारा या क्षेत्रांमध्ये दिलेले योगदान लक्षात घेतले जाते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 2018 या वर्षीपासून हे पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे.

“सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार 2023” साठीचे अर्ज 31 ऑगस्ट 2022 पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे.

महान देशभक्त आणि क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या येत्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारी रोजी वर्ष 2023 साठीच्या पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात येईल.

व्यक्ती आणि संस्था यांमधून तीन विजेत्यांची निवड करण्यात येईल.

पुरस्कारप्राप्त संस्थेला प्रमाणपत्र आणि रोख 51 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. विजेत्या संस्थेला बक्षीस म्हणून मिळालेल्या रोख रकमेचा वापर, आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कार्यासाठी करणे अनिवार्य असेल.

हा पुरस्कार मिळविणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र आणि रोख 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल.

 

या पुरस्कारासाठी कोण पात्र आहे?

  1. केवळ भारतीय नागरिक आणि भारतीय संस्थाच या पुरस्कारासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  2. संस्थांच्या श्रेणीत, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट संस्था, शैक्षणिक अथवा संशोधन कार्य करणाऱ्या संस्था, प्रतिसाद अथवा एकीकृत दले अथवा इतर कोणत्याही संस्था या पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात.
  3. अर्ज करणाऱ्या उमेदवाराने भारतात आपत्ती प्रतिबंध, आपत्तीचे उपशमन, सुसज्जता, बचाव, प्रतिसाद, मदत, पुनर्वसन, संशोधन अथवा नाविन्यपूर्ण शोध किंवा आपत्तीचा जलद इशारा या क्षेत्रांमध्ये कार्य केलेले असावे.
  4. पुरस्कारासाठी सादर करण्यात येणाऱ्या अर्जासोबत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा तपशील सादर केला पाहिजे तसेच खालील क्षेत्रापैकी कोणत्याही एका अथवा अधिक क्षेत्रांमध्ये केलेल्या कामगिरीचा ठळक उल्लेख देखील अर्जात केला पाहिजे:
    1. लोकांचा जीव वाचविणे
    2. जीवितहानी, पशुपक्षांच्या जीविताची हानी, मालमत्तेची हानी तसेच समाजावरील सामाजिक-आर्थिक परिणाम यांचा प्रभाव कमी करण्यासाठी केलेले प्रयत्न 
    3. आपत्तीच्या काळात परिणामकारक प्रतिसादासाठी केलेले प्रयत्न आणि साधनसंपत्तीची तरतूद
    4. आपत्तीने प्रभावित भाग आणि समुदायांमध्ये तातडीने मदतकार्याची सुरुवात
    5. आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्याही क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि नाविन्यपूर्ण वापर
    6. धोकादायक भागांमध्ये आपत्ती उपशमन विषयक उपक्रम राबविणे
    7. प्रतिसाद आणि धोका कमी करण्यासाठी समुदायांमध्ये क्षमता निर्मिती
    8. जनतेला लवकरात लवकर आपत्तीचा इशारा देणाऱ्या यंत्रणा आणि वास्तविक स्वरुपात आपत्तीच्या धोक्याच्या माहितीचे प्रसारण
    9. आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्याही क्षेत्रात शास्त्रीय/ तंत्रज्ञानविषयक संशोधन आणि नवोन्मेष
    10. आपत्ती-पश्चात काळात परिस्थिती पूर्वपदावर आणणे आणि पीडितांचे पुनर्वसन
    11. आपत्तीच्या काळात महत्त्वाच्या पायाभूत सुविधा तसेच मुलभूत सेवांची अखंडित उपलब्धता
    12. आपत्तीविरुध्द सज्ज राहण्यासाठी सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे
    13. आपत्तीच्या धोक्याचे व्यवस्थापन करण्याशी संबंधित इतर कोणतेही क्षेत्र

 

अर्ज कोणी करावा?

कोणतीही व्यक्ती अथवा संस्था या पुरस्कारासाठी एकाद्या व्यक्ती अथवा संस्थेचे नामनिर्देशन करू शकते.

 

निवड प्रक्रिया

सादर करण्यात आलेल्या अर्जांच्या छाननीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या सदस्य सचिव अथवा सदस्यांची निवड समिती स्थापन करण्यात येते. ही समिती पात्रता आणि संपूर्णतेच्या निकषानुसार अर्जांचे मूल्यमापन करते. ही समिती उमेदवारांनी दावा केलेल्या कार्याच्या अस्सलपणाची सत्यता तपासून घेऊ शकते. त्यानंतर, ही समिती छाननी केलेले अर्ज परीक्षकांसमोर सादर करते.
या संदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया https://awards.gov.in/Home/AwardLibrary येथे क्लिक करा.   


* * *

PIB Mumbai | S.Tupe/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1845404) Visitor Counter : 355


Read this release in: English