अर्थ मंत्रालय

वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाने केला 185 कोटी रुपयांच्या बनावट वस्तू आणि सेवा कराच्या पावत्या तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Posted On: 23 JUL 2022 9:17PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी बनावट वस्तू आणि सेवा कराच्या पावत्या तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने सुमारे 22 कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा करावरचा इनपुट टॅक्स क्रेडिट बुडवण्यासाठी 185 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या तयार केल्या होत्या. आयुक्तालयाने करचोरीमध्ये सहभागी असलेल्या दोघांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण आदित्य एंटरप्रायझेस या वाळकेश्वर स्थित आस्थापनेचा मालक आहे. त्याने आर्थिक फायद्यांच्या बदल्यात ही आस्थापना तयार करण्यासाठी आणि वापरण्यासाठी आपली ओळख वापरण्यास मान्यता दिली होती. दुसरी व्यक्ती त्याचा मित्र आहे जो बनावट वस्तू आणि सेवा कर पावत्या प्राप्त करण्यासाठी आणि जारी करण्यासाठी ही आस्थापना चालवत असे.

एका विशिष्ट स्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाच्या चोरीविरोधी शाखेने या आस्थापनेविरुद्ध तपास सुरू केला. व्यवसायाचा सांगितलेला पत्ता हा निवासी परिसर असून तिथे कोणत्याही व्यावसायिक घडामोडी होत नसल्याचे तपासादरम्यान आढळून आले. तपासात असेही समोर आले आहे की, या आस्थापनेने 11.01 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता आणि 10.96 कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त केला होता. या कर क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आणि तो पास करण्यासाठी 185 कोटी रुपयांच्या बोगस पावत्या, कोणत्याही वस्तूंचा पुरवठा किंवा पावती न घेता, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या तरतुदींचे घोर उल्लंघन करून तयार करण्यात आल्या होत्या. या कर फसवणूकीच्या प्रकरणात दिल्ली, मुंबई, कानपूर, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांसह विविध राज्यांतील 250 हून अधिक व्यावसायिक संस्थांचा सहभाग आहे. पुढील तपास आणि कर वसुलीची कारवाई प्रगतीपथावर आहे.

तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्याच्या आधारे आणि या कर फसवणुकीतील आरोपींच्या भूमिकेची दखल घेत, दोन्ही आरोपींना 22.07.2022 रोजी, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल, वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली. या आरोपींना माननीय अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले गेले. दंडाधिकाऱ्यांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

2021-22 या आर्थिक वर्षात, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाने 949 कोटी रुपयांची वस्तू आणि सेवा कर चोरी पकडली, 18 कोटी रुपयांची कर वसूली केली आणि 9 करचोरी करणाऱ्यांना अटक केली. चालू आर्थिक वर्षात, वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेले हे पाचवे अटकसत्र आहे.

वस्तू आणि सेवा कर अधिकारी संभाव्य फसवणूक करणार्‍यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. हे प्रकरण, वस्तू आणि सेवा कर विभागाच्या मुंबई क्षेत्रात कर फसवणूक करणारे आणि बनावट ITC नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. वस्तू आणि सेवा कर अधिकारी करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम येत्या काही दिवसांत अधिक तीव्र करणार आहेत.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844288) Visitor Counter : 184


Read this release in: English