नौवहन मंत्रालय
बंदरांच्या परिसरातील पायाभूत सुविधा
Posted On:
22 JUL 2022 4:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने वर्ष 2047 मधील सुविधांच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी 25 एप्रिल 2022 रोजी बंदरांसाठी सर्वसमावेशक महायोजना तयार करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 2047 च्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या सर्व बंदरांच्या योजनांना एकत्रित करून सर्व प्रमुख बंदारांसाठी समावेशक योजना आणि अहवाल तयार करण्याच्या सूचना देशातील सर्व प्रमुख बंदरांची शिखर संस्था असलेल्या भारतीय बंदरे संघटनेला देण्यात आल्या आहेत.
भारताला लाभलेला सागरकिनारा आणि जलमार्ग यांच्या क्षमतेचा संपूर्ण वापर करून घेण्याच्या उद्देशाने सागरमाला हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या मालवाहतुकीचा खर्च कमी करणे तसेच किनारपट्टीलगत बंदरांच्या माध्यमातून औद्योगिक आणि पायाभूत सुविधा विकासाला चालना देणे ही केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या या महत्त्वाच्या उपक्रमाची मुख्य संकल्पना आहे.
सागरमाला प्रकल्पाचा भाग म्हणून सुमारे साडेपाच लाख कोटी रुपये खर्चाचे 800 हून अधिक प्रकल्प निश्चित करण्यात आले असून 2015 ते 2035 या कालावधीत त्यांची अंमलबजावणी होत आहे. तसेच, किनारपट्टी भागातील जिल्ह्यांचा समग्र विकास करण्यासाठी, 58,000 कोटी रुपये खर्चाच्या एकूण 567 प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. “बंदरांच्या माध्यमातून विकास” ही संकल्पना आणि त्या अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये बंदरांचे आधुनिकीकरण, बंदरांच्या ठिकाणी उत्तम संपर्क व्यवस्था, बंदरांशी संबंधित औद्योगिकीकरण, किनारपट्टी परिसरातील समुदायांचा विकास आणि किनारी नौवहन तसेच अंतर्गत जल वाहतूक या घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात येईल.
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1843870)