अणुऊर्जा विभाग

गणित आणि विज्ञानावरच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी जिंकली 3 सुवर्ण आणि 11 रौप्य पदके

Posted On: 22 JUL 2022 2:12PM by PIB Mumbai

मुंबई, 22 जुलै 2022

 

भारतीय विद्यार्थ्यांनी गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्रातील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये 3 सुवर्ण आणि 16 रौप्य पदके पटकावली. गणित ऑलिम्पियाड नॉर्वेमध्ये आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड आर्मेनियामध्ये आयोजित करण्यात आली होती, तर इतर दोन म्हणजे स्वित्झर्लंड आणि चीनमधली ऑलिम्पियाड दूरदृश्य प्रणालीमार्फत आयोजित करण्यात आली.

 

आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड 2022

नॉर्वे मधील ऑस्लो येथे 6 ते 16 जुलै 2022 या कालावधीत झालेल्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड 2022 मध्ये भारतीय संघाने 1 सुवर्ण आणि 5 कांस्य पदके पटकावली. प्रांजल श्रीवास्तवने आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड मध्ये सलग तिसरे सुवर्ण पदक मिळवून हॅटट्रिक केली. आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड मध्ये 3 सुवर्णपदके जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. त्याच्या पदार्पणात, 2018 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी, त्याने रौप्य पदक जिंकले आणि 2019, 2021 आणि 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकले.

इतर सहभागी अर्जुन गुप्ता, आदित्य वेंकट गणेश मांगुडी, अतुल शतावर्त नाडिग, वेदांत सैनी, कौस्तव मिश्रा यांनी आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड 2022  मध्ये कांस्यपदक पटकावले. आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड 2022 मध्ये एकूण  589 स्पर्धक सहभागी झाले होते.

 

आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (IBO) 2022

आर्मेनियामधील येरेवन इथे 10 ते 18 जुलै 2022 या कालावधीत आयोजित 33 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड (IBO) 2022 मध्ये भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. भारताच्या चारही विद्यार्थ्यांनी पदके मिळवली. मयंक पंढरीने सुवर्णपदक, अमृतांश निगम, प्राची जिंदाल आणि रोहित पांडा यांनी रौप्य पदक मिळवले.

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये 62 स्पर्धक आणि 3 निरीक्षक देश सहभागी झाले होते. 

 

आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) 2022

फिजिक्स असोसिएशन ऑफ स्वित्झर्लंडने आयोजित केलेल्या 52 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) 2022 मध्ये भारताने चांगली कामगिरी केली. 10 जुलै ते 17 जुलै 2022 या काळात ऑनलाइन पद्धतीने या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील सर्व पाच भारतीय विद्यार्थ्यांनी मिळून 1 सुवर्ण आणि 4 रौप्य पदके जिंकली. देवयांशु मालूने सुवर्णपदक, अभिजीत आनंद, अनिलेश बन्सल, धीरज कुरुकुंदा आणि हर्ष जाखर यांनी रौप्यपदक पटकावले.

या स्पर्धेत 75 देशांतील एकूण 368 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. देशनिहाय पदकतालिकेत सिंगापूर आणि कझाकिस्तानसह भारत संयुक्तपणे अकराव्या स्थानावर होता.

 

आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (IChO) 2022

चीनने आयोजित केलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड (IChO) 2022 मध्ये सहभागी झालेल्या चारही भारतीय विद्यार्थ्यांनी पदके जिंकली. महित राजेश गढीवाला, निवेश अग्रवाल, तनिष्का रमेशचंद्र काबरा, चिन्मय खोकर या विद्यार्थ्यांनी रौप्यपदक पटकावले. 10 जुलै ते 18 जुलै 2022 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने ही ऑलिम्पियाड आयोजित करण्यात आली होती.

भारतातील चार लवाद सदस्यांनी आंतरराष्ट्रीय लवाद चर्चांमधे सहभाग घेतला: मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉ. नंदिता माधवन (आयआयटी बॉम्बे),  मार्गदर्शक म्हणून डॉ. इंद्राणी दास (एचबीसीएसइ), तर वैज्ञानिक निरीक्षक म्हणून डॉ. श्रद्धा तिवारी (आयसीटी, मुंबई) आणि व्ही. सुदर्शन (बीएआरसी) यांनी चर्चेत भाग घेतला.


* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Mukhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1843559) Visitor Counter : 315


Read this release in: English